मख़दूम समाचार
मुंबई (गुरुदत्त वाकदेकर) २९.६.२०२३
सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्यमहोत्सवाचा भाग म्हणून प्रथम पारितोषिक विजेत्या नाटकांचा महोत्सव रवींद्र नाट्य मंदिर, प्रभादेवी, मुंबई येथे दि. १० जुलै ते १४ जुलै या कालावधीत आयोजित करण्यात आला आहे. तर ११ जुलै, २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता ६० व्या महाराष्ट्र राज्य नाट्यस्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना पारितोषिके देऊन गौरविण्यात येईल.
. महोत्सवात हौशी मराठी नाट्य स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रथम आलेले नाटक “इन द सेल ऑफ सर्व्हायवल”, हिंदी नाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “मोक्षदाह”, संगीत नाट्य स्पर्धेत प्रथम नाटक “संगीत सुवर्णतुला”, संस्कृत नाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “मृगयाकलह:”, बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “प्रायश्चित” आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील प्रथम नाटक “वाचवाल का?” या सर्वोत्कृष्ट नाटकांचे सादरीकरण होणार आहे.
पारितोषिक वितरण समारंभात मराठी, हिंदी, संगीत, संस्कृत, बालनाट्य, आणि दिव्यांग बालनाट्य स्पर्धेतील पारितोषिक विजेत्यांना महाराष्ट्र राज्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि नाट्यक्षेत्रातील ज्येष्ठ मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक प्रदान करण्यात येणार आहेत.
महोत्सवातील सर्व नाटके व पारितोषिक वितरणाचा कार्यक्रम रसिकांसाठी विनामूल्य आहे. तरी रसिक प्रेक्षकांनी नाट्य महोत्सवास व पारितोषिक वितरण समारंभास जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद द्यावा, असे आवाहन राज्याच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयाने केले आहे.
إرسال تعليق