मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १६.९.२०२३
विद्यार्थ्यांनी सतत जिज्ञासूवृत्ती ठेवावी. विद्यार्थी नेहमी शिक्षकांच्या प्रश्नांची उत्तरे देतात पण विद्यार्थ्यांना सतत वेगवेगळे प्रश्न पडले पाहिजेत. त्यांनी आपल्याला पडलेले प्रश्न सतत शिक्षकांना विचारले पाहिजेत. जर जिज्ञासूवृत्ती ठेवली तर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे चिरकाल टिकणारे ज्ञान मिळते. या ज्ञानाचा त्यांना आयुष्यभर उपयोग होतो. बालवयात ऐकलेल्या थोरामोठ्यांचे बोल मोठेपणी उपयोगी येतात. पालक शाळेपर्यंत आले तर शाळा समाजापर्यंत पोहचते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा विकास होते. ओंकारनगर शाळेचे मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी, सहशिक्षक शिवराज वाघमारे, सहशिक्षिका वृषाली गावडे यांनी विद्यार्थी विकासासाठी विविध उपक्रम राबवत शाळेचे नाव सर्वदूर पोहचवले आहे, असे जिल्हा परिषद नागपूरचे माजी शिक्षणाधिकारी अरुण धामणे म्हणाले.
अहमदनगर महानगरपालिकेच्या केडगाव येथील आयएसओ मानांकन प्राप्त ओंकारनगर प्राथमिक शाळेत आयोजित समग्रशिक्षा अभियान अंतर्गत मोफत गणवेश वाटप कार्यक्रमात ते अध्यक्षस्थानी होते. तर महाराष्ट्र बालक मंदिर शाळेचे माजी मुख्याध्यापक सुरेश शेवाळे हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी पालकांसाठी आयोजित पाककृती स्पर्धेचे पारितोषिक वितरण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. मुख्याध्यापक भाऊसाहेब कबाडी यांनी ओंकारनगर शाळेच्या यशाचा चढता आलेख उपस्थितांना सांगितला.
सध्याच्या काळात विद्यार्थी किती पुस्तके शिकला याला महत्त्व नाही तर तो किती संस्कार शिकला याला महत्त्व आहे. ओंकारनगर शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मला स्वयंशिस्त, स्वावलंबन, स्वच्छता हे गुण दिसून आले तसेच शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कारक्षम शिक्षण देत आहेत हे पाहून विशेष आनंद वाटला. अतिशय अल्पकाळामध्ये शाळेने शैक्षणिक क्षेत्रात आपला ठसा उमटवला आहे, असे महाराष्ट्र बालक मंदिर प्रशालेचे माजी विद्यार्थीप्रिय मुख्याध्यापक सुरेश शेवाळे आपल्या मनोगतात म्हणाले.
यावेळी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कविता वाघमारे, उपाध्यक्ष प्रियंका लोळगे, सदस्य कविता वर्तले, दुर्गा घेवारे, पुनम बडे, संध्या तोडमल, दिपाली साळवे, रोहिणी काळे, भावना पवार यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन भाऊसाहेब कबाडी यांनी केले तर सहशिक्षक शिवराज वाघमारे यांनी आभार मानले.
إرسال تعليق