मख़दूम समाचार
श्रीरामपूर (प्रतिनिधी) ६.१०.२०२३
येथे कॉ.भि.र.बावके यांच्या स्मृती दिनानिमित्त आगाशे सभागृहात आयोजित कार्यक्रमात ९ वे पुष्प गुंफताना 'आयडिया ऑफ इंडिया' या विषयावर ॲड. निशा शिवूरकर बोलत होत्या. अध्यक्षस्थानी लाल निशाण पक्षाचे राज्य सरचिटणीस कॉ. भीमराव बनसोड होते. विचारमंचावर अहमदनगर जिल्हा शेतमजूर युनियनचे सरचिटणीस कॉ.बाळासाहेब सुरुडे, कॉ.गुजाबा लकडे, भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे कॉ.श्रीधर आदिक, कॉ.राजेंद्र बावके, कॉ.शरद संसारे, कॉ.मदिना शेख, कॉ.जीवन सुरुडे आदी उपस्थित होते.
शिवूरकर पुढे म्हणाल्या की, राजकीय परिस्थिती बदलली की कामगार कष्टकऱ्यांचे बळी जात आहे. राजकारणासाठी जाती धर्माच्या नावावर द्वेष वाढवून भय निर्माण केले जात असून फडणवीससारखे भिडेना गुरु मानत आहे, इतके वाईट दिवस राज्याला आले आहे. देशाची विविधता व धर्म निरपेक्षता आणि संविधान मोडीत काढण्याचे षड्यंत्र सुरु आहे. परंतु ते कदापीही यात यशस्वी होऊ शकत नाही व देशातील जनता त्यांना यशस्वी होऊ देणार नाही. जीवन जगण्यासाठी आचार आणि विचारांचे स्वातंत्र्य असावे लागते आणी समता येण्यासाठी डोक्यात विचार असावे लागतात त्यासाठी लढाऊ नेते व लढाऊ कार्यकर्ते असावे लागतील. अशावेळी कॉ.भि.र.बावके यांचा लढा आपल्यासाठी प्रेरणादायी ठरणार आहे, असे प्रतिपादन समाजवादी जनपरिषदेच्या राष्ट्रीय अध्यक्षा ॲड. निशा शिवूरकर यांनी केले.
यावेळी अध्यक्षीय भाषणात कॉ. भीमराव बनसोड म्हणाले की, आपल्यासमोरील आव्हानं सोपी नाहीत. गांधी की गोडसे यापैकी एक निवडा असा पर्याय सत्ताधारी पक्षांनी जनतेसमोर मांडत आहे. प्रत्यक्षात आरएसएसचा विचार हा कधीही देश व जनतेसाठी फायद्याचा नसून यामुळे सद्यस्थितीत देशाची राजकीय, सामाजिक व आर्थिक बिकट परिस्थिती पाहता देशा समोर मोठे संकट उभे राहिले असून या विरोधात संविधान प्रेमी नागरिकांनी जागृत होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्तविक कॉ.बाळासाहेब सुरुडे यांनी केले, तर आभार कॉ.राजेंद्र बावके यांनी मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन कॉ.श्रीकृष्ण बडाख यांनी केले. कार्यक्रमात उत्कृष्ट शेती करणाऱ्या कब्जेधारक शेतकऱ्यांचा कॉ.भि.र.बावके महिला स्वयंसाहाता बचतगटाच्या वतीने सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला.
कार्यक्रमास भगवान सरोदे, कॉ.उत्तम माळी, कवी आनंदा साळवे, प्रकाश भांड, राजेंद्र मुसमाडे, अरुण बर्डे, मिठूभाई शेख, अश्रू बर्डे, किरण मते, नितीन दरंदले, सुनील ठाकर, राजेंद्र भिंगारदिवे, विष्णू थोरात, योगेश अमोलिक, बाबासाहेब प्रधान, दत्तात्रय वक्ते, सुभान पटेल, अजय बत्तीशे, बाळासाहेब वाणी, संदीप बडाख, मन्नाबी शेख, ताराबाई बर्डे, राणूबाई माळी, हिराबाई बर्डे आदिंसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते.
إرسال تعليق