नंदुरबार: लहान वय हे खेळण्या-बागडण्याचे असते, मात्र नंदुरबारमधील दोन चिमुरड्या मुलींनी या वयात एक मोठा आदर्श समाजासमोर ठेवला आहे. अवघ्या ६ वर्षांच्या अरीबा दानिश अहमद बागवान आणि कशफ अश्फाक शेख या दोन मुलींनी दोन दिवस कडक रोजा (उपवास) पाळून अल्लाहची इबादत केली. त्यांच्या या जिद्दीचे आणि धैर्याचे सर्वत्र कौतुक होत आहे.भक्ती आणि संयमाचा अनोखा संगम, ज्या वयात मुले खेळण्यांमध्ये दंग असतात, त्या वयात अरीबा आणि कशफ यांनी दिवसभर अन्न-पाण्याचा त्याग करून पूर्ण सबुरीने रोजा पाळला. केवळ उपवासच नाही, तर त्यांनी पाचही वेळेची नमाज अदा करून धार्मिक शिस्त पाळली. इस्लाममध्ये रोजा म्हणजे केवळ उपाशी राहणे नव्हे, तर तो संयम, कृतज्ञता आणि सत्कर्माच्या मार्गावर चालण्याची शिकवण देतो. या चिमुरड्यांनी लहान वयातच ही शिकवण आत्मसात करून समाजाला 'इबादत'ची ओढ बालपणापासूनच असावी, असा संदेश दिला आहे.
सामाजिक संस्थेकडून गौरव
या दोन्ही मुलींच्या कौतुकासाठी 'इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशन' या सामाजिक व शैक्षणिक संस्थेच्या वतीने विशेष कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष एजाज भाई बागवान यांनी दोन्ही मुलींचे पुष्पहार घालून स्वागत केले. तसेच त्यांना रोख पारितोषिक आणि सायंकाळी रोजा सोडण्यासाठी (इफ्तार) मिठाईचे बॉक्स देऊन त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी दुवा केली.
यावेळी जनसेवा महिला स्वयंसहायता बचत गटाच्या अध्यक्षा रुकसाना बागवान, सामाजिक कार्यकर्ते सैयद मकसूद, इस्माईल दगू जनसेवा फाउंडेशनचे सचिव दानिश अहमद बागवान, सामाजिक कार्यकर्त्या हलीमा अश्फाक शेख आदी मान्यवर उपस्थित होते.
या चिमुरड्यांच्या प्रयत्नांनी येणाऱ्या पिढीसमोर एक प्रेरणा उभी केली असून, संपूर्ण परिसरात त्यांच्या कौतुकाची चर्चा आहे.
إرسال تعليق