गांधीजी हे मजबूतीचे नाव होते ना की मजबुरीचे. म्हणूनच संपूर्ण जगातील जे-जे महान नेते गांधीजींना आपले आदर्श मानतात ती त्यांची मजबूरी आणि गांधीजींची मजबूती आहे. जागतीक स्तरावर त्यांना महान मानले जाते, त्यांना glorify केले जाते हा काही त्यांचा दोष नाही. गांधींची अहिंसा व इतरांची अहिंसा यात मुलभूत फरक आहे तो आक्रमकतेचा गांधींनी अहिंसेला युद्धाशी वा संघर्षाशी जोडले. बाकिच्या सर्वांची अहिंसा हि एकप्रकारे शरणागती, दया, अप्रतिकाराशी संलग्न आहे मात्र गांधीजींनी अहिंसेला प्रतिकाराशी जोडले हे गांधींचे वेगळेपण आहे. एका गालात कोणी मारली तर दुसरा गाल पुढे करा हे येशू म्हणतो. पण गांधीजींनी हे वाक्य एका दलिताला म्हटले होते की सवर्णांनी दलितांवर इतके आत्याचार केलेले आहेत की त्यांनी जर एका गालात मारली आणि दुसरा गाल पुढे केला तरी कमी आहे. परंतू काही स्वार्थी लोकांनी या वाक्याचा विपर्यास केला. खरे तर अशी परिस्थिती उदभवल्या गांधीजी म्हणतील कि हात जोडून त्याला विचारा का मारलेस? त्याने उत्तर दिले नाही तर त्याच्या अगदी घरापर्यंत जा, त्याचा पिच्छा सोडू नका जोपर्यंत तो उत्तर देत नाही. मग त्याच्या अडचणीचे न्याय्य निराकरण करा. हा फरक आहे गांधी व इतरांच्या अहिंसेत. महावीरांचा आत्मक्लेष आहे पण प्रतिकार न करणारी अहिंसा गांधींची नाही. बुद्ध म्हणतात की तुम्हालाही जगण्याचा अधिकार आहे व स्वसंरक्षणार्थ हिंसा माफ आहे. गांधी म्हणतात कि तुमचा अहिंसेवर विश्वास डळमळत असेल, शंका असेल तर हिंसा करा पण लढा. लढणे, अन्यायाचा प्रतिकार करणे महत्त्वाचे. अहिंसा शूराचे लक्षण आहे भित्र्या लोकांचे नाही. पण हिंसक मार्गाने मिळाचतेही फळ हे कलंकित असते. त्याच्या भोगात आत्मिक समाधान मिळत नाही. अहिंसा बाळगायची असेल तर मन सर्वात प्रथम निर्भय करायला हवे. मनात भीतीचा लवलेशही नको. माणसाने सत्य व न्यायासाठी अहिंसक मार्गाने लढताना प्राणाचीही पर्वा करू नये. आपल्या हक्कासाठी आपला जीव गेला तरी चालेल पण मागे हटणार नाही इतकी तयारी हवी. शक्य तितक्या सर्व प्रकारच्या त्यागाची तयारी हवी व काया-वाचा-मने प्रयत्नांची पराकाष्ठा हवी. भिती हिंसेला जन्म देते. कोणताही प्राणी तेव्हाच हिंसा करतो जेव्हा त्याच्या प्रिय गोष्टीला वा प्राणाला धोका आहे अशी खरी वा खोटी भिती त्याच्या मनात जन्मते, क्षणात वा हळूहळू. निर्भय मनुष्य कधी हिंसक होऊ शकत नाही. ज्याला कशाचा मोह नाही, ज्याला कशाची भिती नाही तो दुसर्याला हानी का बरे पोहोचवेल? म्हणून निर्भयतेची आत्मिकशक्ती हा अहिंसेचा पाया आहे. माणसाने निर्भयपणे उभे राहिले पाहिजे मग समोर कोणी असो. तेव्हाच तो अहिंसेचे सतीचे वाण पेलू शकतो. ज्यांना हे जमत नसेल त्यांनी खुशाल हिंसा आचरावी पण अन्याय सहन करू नये. मात्र अशी कोणतीही लढाई नाही वा प्रश्न नाही जो अहिंसेने सुटला नाही असा माझा अनुभव आहे असे गांधीजी म्हणतात.
सत्य ईश्वर आहे. (ईश्वर सत्य आहे असे नाही तर सत्य ईश्वर आहे.) गांधीजींचा ईश्वर हा सत्य आहे. आणि ईश्वराशी तडजोड होऊ शकत नाही, जे सत्य आहे ते आढेवेढे न घेता स्वीकारलेच पाहिजे व त्यानुरूप स्वतःत बदल केलेच पाहिजे व त्याचाच आग्रहसुद्धा धरला पाहिजे. पण सत्याप्रत जाण्याचा केवळ एकच मार्ग आहे तो म्हणजे अहिंसा. अहिंसा धर्म असेल पण सत्य ईश्वर आहे. तेच अंतिम लक्ष्य आहे. एकवेळ अहिंसेशी तडजोड होऊ शकते पण सत्याशी नाही. पण अहिंसा नसेल तर सत्याप्रत जाणे अशक्य. येथे अहिंसेचे साधनेचे रुप गांधीजी सांगतात. अहिंसा म्हणजेच मानवतावाद. तीच धार्मिक व्यक्तींना कट्टर धर्मांध हिंस्र अतिरेकी असहिष्णू राजकारणी व दहशतवाद्यांपासून भिन्न करते. धार्मिक व धर्मांध यांतील मुलभूत फरक मानवतावादी अहिंसा आहे. ती माणसाला कोणत्याही कारणाने जंगली जनावर होऊन देत नाही. ती माणसातले माणूसपण त्याचा खरा मानवधर्म जपते व मतभेदांपलिकडे विविधतेपलिकडे मानवतेची नाळ सर्वांशी जोडते व सहिष्णुतेचा व लोकशाहीचा प्राण अहिंसा बनते. मानवतेचा व मानवाचा सन्मान अहिंसा बनते. येथे गांधीजी अहिंसेला एक जीवनमुल्य व समाजधर्म म्हणून समोर आणतात. कट्टरतेला वा कोणत्याही प्रकारच्या अतिरेकाला दुसर्यावरच्या बळजबरीला अहिंसेत स्थान नसते. तुम्ही कडक यमनियम वा तुमच्या मान्यता अनुसरू शकता पण दुसर्यावर लादू शकत नाही. दुसर्या व्यक्तीचा, त्याच्या व्यक्तिगत निर्णय स्वातंत्र्याचा आदर करणे अहिंसेचाच एक महत्त्वाचा भाग आहे. येथे गांधी अहिंसेद्वारे सर्व समाजास सभ्यतेच्या आणखी वरच्या पातळीवर घेऊन जातात, ज्याशिवाय विविधतेने नटलेला कोणताही देश त्याच्या अातील विविधतेसकट एकत्र नांदू शकत नाही. तसेच आपला सामाजिक राजकिय मुद्दा अहिंसक मार्गानेच मांडला पाहिजे व अहिंसक मार्गानेच न्यायासाठी सामाजिक व राजकिय लढे दिले पाहिजेत. याने गांधीजी राजकिय-सामाजिक जीवनात ताकद-संपत्ती-हिंसा आदींची महती कमी करून सामाजिक चारित्र्य वृद्धिंगत करून समाजकारण-राजकारणाला वरच्या व त्याला कधी न लाभलेल्या पावित्र्यतेल्या पातळीवर नेतात. माणसाच्या नैतिक व आत्मिक बळाला व शुद्ध चारित्र्य व समाजसेवेलाच राजकिय-सामाजिक भांडवल बनायला मुक्त आवकाश देतात. व संविधानाला आदर्श सभ्य समाज व सभ्य राजकारण करायला गांधीजी अहिंसेच्या व्रताने भाग पाडतात. अश्या प्रकारे गांधीजी अहिंसा या एकाच संकल्पनेचे मानवी जीवन व सामाजिक जीवनाला व्यापणारे विस्तीर्ण अर्थ दाखवून देतात व अहिंसेशिवाय आदर्श सभ्य समाज, समाजहितास पोषक राजकारण, समाजकारण व समाजबांधणी कशी अशक्य आहे तसेच याच जुन्या शाश्वत मुल्याविना समता, बंधुता, व्यक्तिस्वातंत्र्य, व्यक्तीचा व्यक्तित्त्वाचा आदर, लोकशाही आदी नवीन समाजमुल्यांची व राजकियमुल्यांची जपणूक कशी अशक्य आहे हे दाखवून देतात. अजूनही अभ्यासकरून बरेच लिहिता येईल पण आत्ता जेवढे आठवत गेले तितके गांधींची (आक्रामक वा सक्रिय) अहिंसा यावर लिहिले. जाताजाता एवढेच कि गांधींची अहिंसा हि कर्मप्रधान आहे संन्यासी नाही. ती सक्रिय आहे निष्क्रीय नाही. म्हणूनच बुद्ध-महावीर व गीता यांचा सुवर्णमध्य आहे. व नवयुगाची पहाट आहे.
Post a Comment