श्रीरामपूर (शौकतभाई शेख) - तालुक्यातील उंबरगांव जिल्हा परिषद शाळेत इयत्ता ७ वी च्या विद्यार्थ्यांचा आगळा-वेगळा निरोप समारंभ कार्यक्रम पार पडला,या कार्यक्रमास नटून थटून आलेली एक मुलगी माईकवर येते,पाहुण्यांचे स्वागत करते, अध्यक्षीय सूचना मांडली जाते, अनुमोदन मिळते,कार्यक्रम पुढे सुरू होतो.भाषणे होतात, एकामागे एक मुली बोलायला उभ्या राहतात, हुंदके भरतात, रडायलाही लागतात.दुसरी मुलगी त्यांचे सांत्वन करते. मग मुले येतात, ती पण रडतात. मग पाहुणे त्यांना समजावून सांगतात.रडणारी मुले हसायला लागतात.पालकही आपल्या मुलांचे आणि शिक्षकांचे कौतुक करतात.दोन वर्षांमध्ये कोरोनाच्या काळामध्ये शिक्षकांनी काय मेहनत घेतली आणि त्याचा आमच्या मुलांना काय फायदा झाला हे सांगताना पालकांच्या डोळ्यांच्या कडाही पाणावतात. सेवानिवृत्त झालेले मुख्याध्यापक, शिक्षक या कार्यक्रमात मुलांना भरभरून भेटवस्तू देतात. त्या घेताना मुलांची ओंजळी भरून जाते. हे चित्र होते जिल्हा परिषद मराठी शाळा उंबरगांव येथील इयत्ता सातवीच्या निरोप समारंभाचे,वर्गशिक्षक शकील बागवान यांच्या कल्पकतेतून आगळा आणि वेगळा निरोप समारंभ पार पडला. अध्यक्षस्थानी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष सुनील काळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समिती शिक्षण विभागाचे ज्येष्ठ शिक्षणविस्तार अधिकारी संजीवन दिवे,शिक्षक बँकेचे माजी चेअरमन व मुख्याध्यापक सलीमखान पठाण,सरपंच किशोर कांडेकर,मीना मंडोरे,माजी सरपंच चिमाजी राऊत, मुख्याध्यापक जलील शेख, कोळसे,शशिकांत दहिफळे, अरविन्द कुंडलवाल,महेजबीन बागवान,सारिका बोल्हे आदी उपस्थित होते.या कार्यक्रमाचे वैशिष्ट्ये म्हणजे निरोप समारंभामध्ये सूत्रसंचालनापासून इतर सर्व जबाबदारी इयत्ता सातवीच्या विद्यार्थ्यांनी पार पाडली. सूत्रसंचालन करताना विद्यार्थिनी श्रावणी राऊत अस्खलितपणे आपले विचार व्यक्त केले.या प्रसंगी मनोगत व्यक्त करताना सातवीच्या सर्व विद्यार्थ्यांना भरून आले. इयत्ता पहिली मधील प्रवेशापासून प्रत्येक वर्गामध्ये आपली प्रगती कशी झाली कोणकोणत्या शिक्षकांनी आम्हाला शिकवले याचे यथार्थ वर्णन त्यांनी केले.पालकांमधून बोलताना शीतल राऊत,रंजना ओहोळ व सारिका बोल्हे यांनी वर्गशिक्षक शकील बागवान यांच्या बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली. कोरोनाच्या काळात देखील बागवान सरांनी ऑनलाईन क्लास घेऊन पालकांना भेटी देऊन शाळेत आठवड्यातून एक दिवस क्लास घेऊन मुलांच्या सर्वांगीण विकासाला प्राधान्य देऊन शाळा बंद असली तरी शिक्षणात खंड पडणार नाही याची दक्षता घेतल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले .शिक्षण विस्तारअधिकारी संजीवन दिवे यांनी आपल्या बालपणाच्या आठवणी सांगत शिक्षकांच्या सहवासात मुलांची जडणघडण होत असते हे सांगताना स्वत:चे उदाहरण दिले. मुलांनी आता ऑनलाईन शिक्षणातून बाहेर पडून ऑफलाईन शिक्षणाकडे वळावे, येणाऱ्या अडचणी बाबत आमचे शिक्षक त्यांना मार्गदर्शन करतील असे सांगितले.शिक्षक बँकेचे माजी चेअरमन सलीमखान पठाण यांनी शकील बागवान यांच्या धडपडत्या कार्यप्रणालीचा उल्लेख केला.त्यांनी आजपर्यंत राबविलेले वेगवेगळे उपक्रम कसे दर्जेदार ठरले हे नमूद केले. यावेळी माजी सरपंच चिमाजी राऊत,माजी मुख्याध्यापिका मीना मंडोरे,मुख्याध्यापिका लताबाई पालवे,महेजबीन बागवान, संघमित्रा रोकडे,राज जगताप, मेघा साळवे,संतोष जमदाडे व शकील बागवान यांनी विचार व्यक्त केले.कार्यक्रमाच्या शेवटी शाळेच्या माजी मुख्याध्यापिका मीना मंडोरे, शिक्षिका श्रीमती कुलकर्णी व शाळेतील सर्व शिक्षकांनी सातवीच्या मुलांना वह्या,पेन,भूमिती साहित्य,पाणी बॉटल व इतर साहित्य भेट म्हणून देण्यात आले.तत्कालीन इयत्ता पहिलीतील आपल्या शिक्षिका पंडित मॅडम या आज उपस्थित नसल्याबद्दल मुलांनी खंत व्यक्त केली. संपूर्णपणे मुलांनी हातात घेतलेला कार्यक्रम दोन ते अडीच तास असा रंगला की उपस्थितांना वेळेचे भान देखील राहिले नाही. शेवटी या आगळ्या आणि वेगळ्या अशा या कार्यक्रमाचे आयोजनाबद्दल मुख्याध्यापिका लताबाई पालवे ,वर्गशिक्षक शकील बागवान यांना उपस्थितांनी धन्यवाद दिले. विद्यार्थिनी गायत्री राऊत हिने हिंदी भाषेतून आभार व्यक्त करताना शाळेबद्दलची आवड व्यक्त केली.
Post a Comment