अहमदनगर (प्रतिनिधी) १९.३.२०२३
राज्यभरातील राज्य सरकारी, निमसरकारी, जिल्हा परिषद, पालिका, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना आणि त्यासह इतर मागण्यांसाठी दि. १४ मार्चपासून बेमुदत संप पुकारलेला आहे. आज ६ दिवस झाले तरीही निर्दयी सरकार जनतेच्या मागण्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करत असल्याचे दिसून येत आहे. मागण्यांकडे दूर्लक्ष केल्याने लोकांमधे असुरक्षिततेची भावना निर्माण होत आहे. या सहा दिवसात सर्व कामे ठप्प होत आलेली आहेत. या सर्व मागण्या संविधानिक असून तो त्यांचा हक्क आहे. या मागण्यांसाठी अहमदनगर जिल्हा राज्य सरकारी, निम सरकारी कर्मचारी आणि शिक्षक संघटना समन्वय समितीसह समविचारी पक्ष संघटना यांच्या वतीने उद्या सोमवार दि. २० रोजी 'जुनी पेन्शन योजना संपाचा 'लाल वादळ मोर्चा'चे आयोजन करण्यात आलेले आहे.
हा मोर्चा सकाळी ठिक १० वाजता सावेडी भागातील टि. व्ही. सेन्टरसमोरील तहसिलदार कार्यालय ते गुलमोहोर रोड मार्गे जिल्हाधिकारी कार्यालय येथे जाणार आहे. दिल्ली शेतकरी आंदोलनास या सहकारी संघटनांनी सक्रीय सहभाग घेतलेला होता. शेतकरी संप यशस्वी होण्यास मोठा हातभार लावलेला होता. शेतकरी, कामगार, कर्मचारी, शिक्षक हे सर्व घटक एकच आहेत. आपण सर्वांनी एकजूटीने कार्य केल्यास आपला संप यशस्वी होणार आहे.
अहमदनगर येथील कामगार संघटना महासंघाचा या बेमुदत संपास आणि उद्याच्या मोर्चास सक्रीय जाहीर पाठिंबा आहे. अहमदनगर शहरातील सर्व औद्योगिक कामगार, हमाल, हॉकर्स, असंघटीत कामगार, शेतकरी, शेतमजूर, रिक्षाचालक मालक यांनी या मोर्चात सहभागी होऊन आपला पाठिंबा देत सहभाग नोंदवावा, असे आवाहन कामगार संघटना महासंघाचे अध्यक्ष कॉ. प्रा. डॉ. महेबुब सय्यद, सेक्रेटरी भैरवनाथ वाकळे आणि सहसेक्रेटरी रामदास वागस्कर यांनी केलेले आहे. आपल्या सर्व शेतकरी, कामगार बंधुंनी पाठींबा देण्यास मोर्चात सहभागी व्हावे, असे कळविण्यात आले आहे.
إرسال تعليق