मानवी समुदायाच्या या अथांग सागरात अशी काही नवरत्ने जन्माला येतात की, जी स्वतःच्या तेजाने, दैदीप्यमान चारित्र्याने व चरित्राने मानव जातीचे दीपस्तंभ बनून राहतात व इतरांचे लक्ष वेधून घेत असतात. भारतीय स्वातंत्र्य चळवळीत बाबुजींनी हिरीरीने भाग घेतला आणि एक स्वातंत्र्य सेनानी म्हणून अहमदनगर जिल्ह्याच्या पाथर्डी तालुक्यात त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य सर्वसामान्य जनतेच्या उत्कर्षासाठी वेचले. बाबूजींनी महात्मा गांधीच्या नेतृत्वाखाली स्वातंत्र्य चळवळीत तसेच संयुक्त महाराष्ट्र चळवळीत भाग घेतला होता. गांधीजीच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन हरिजन, गिरीजनामध्ये मध्ये झोकून देऊन काम करण्याचा विडाच त्यांनी उचलला होता. संघर्ष करणारा नेता गरिबांचे दुःख जाणणारा त्यांच्या मदतीला धावणारा अशी त्यांची संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात ओळख होती. पाथर्डी सारख्या डोंगराळ आणि कायम दुष्काळी भागात त्यांनी कष्टकऱ्यांचे नेतृत्व केले भटक्या विमुक्तांना बोटाला धरून त्यांना राष्ट्रीय प्रवाहात आणले. चलेजाव चळवळीत स्वातंत्र्यासाठी होणाऱ्या प्रत्येक आंदोलनात या उमद्या तरुणाने तळहातावर शीर घेऊन पार्थ कर्तव्य बुद्धीने लढा दिला. बाबुजींनी स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेताना घरादाराची आपल्या प्रपंचाची तमा न बाळगता चळवळीमध्ये पेटत्या टेभ्यां सारखे आपले कर्तव्य पार पाडले. बाबुजींचा खरा पिंड लढवय्या होता ते लष्करी कुटुंबातील असल्याने शिस्त आणि संघर्षाची त्यांना बऱ्यापैकी जाणीव होती. बाबुजींनी आपल्या सामाजिक व राजकीय कार्यातून आपले कर्तव्य सिद्ध केले. उपेक्षित सर्वसामान्यासाठी धडपडणारा लोकप्रतिनिधी अशीच त्यांची प्रतिमा तयार झालेली होती. *बाबुजी* **म्हणतात* ,"शिक्षणातून केवळ ज्ञानाची उपासना व बुद्धीची जोपासना करून चालत नाही तर भावनांची प्रगल्भता आणि अंतकरणाचा मोठेपणा अंगी बाळगला तरच खरे सामर्थ्य निर्माण होते, शक्ती वाढते आणि राष्ट्र प्रगतीपथावर जातात." असे प्रेरणादायी विचार बाबुजींचे होते. **बाबुजींचे* *बालपण* :- बाबुजींचे मूळ गाव अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव तालुक्यात वडुले खुर्द हे असून त्यांचे वडील गणपतराव आव्हाड हे ग्वाल्हेरच्या संस्थानांमध्ये राजे शिंदे यांच्या दरबारामध्ये मेजर पदावर कार्यरत होते. बाबुजींचा जन्म मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर या ठिकाणी ३१ मार्च १९२१ रोजी झाला. वडील लष्करात मोठ्या पदावर कार्यरत असल्याने साहजिकच घरातील कडक लष्करी शिस्तीचे धडे त्यांना बालपणीच मिळाले. बाबुजींचे बालपण चांगले समृद्ध व आर्थिक सामाजिक परिस्थिती गेले. त्यांचे प्राथमिक शिक्षण ग्वाल्हेर येथे इंग्रजी माध्यमातून पूर्ण झाले होते. पाचवी ते सातवी पर्यंत शिक्षण हंडाळवाडी पाथर्डी येथे तर आठवी ते अकरावी पर्यंत शिक्षण त्यांनी ग्वाल्हेर येथे पूर्ण केले. वडील देश सेवेत नोकरीला असल्याने वडिलांचे संस्कार त्यांचा एकनिष्ठ पणा व देश प्रेम याचा परिणाम बाबुजींच्या मनावर शालेय जीवनातच झाला. आपल्या वडिलांकडूनच सामाजिक कार्याची प्रेरणा त्यांना मिळाली शालेय जीवनात हॉकी, फुटबॉल व नेमबाजी या मैदानी खेळामध्ये त्यांनी सहभाग घेतल्यामुळे त्यांच्यावर झालेले संस्कार व वागण्यातला बाणेदारपणा यामुळे नवीन काहीतरी करण्याची उर्मी त्यांच्या मनात तयार झाली. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातील महादजी शिंदे यांनी मध्यप्रदेशात ग्वाल्हेर संस्थांनामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवला होता. मराठ्यांच्या इतिहासात हे अतिशय महत्त्वपूर्ण कार्य होते. ग्वाल्हेर संस्थांनात जन्म घेतलेल्या बाबुजींनी पुढे महाराष्ट्रातील अहमदनगर जिल्ह्यात पाथर्डी सारख्या मागास भागात स्वातंत्र्य चळवळीत सहभाग घेऊन आपल्या कर्तृत्वाचा ठसा उमटवला. **बाबूजींची* *जडणघडण*:- बाबुजी लहानपणापासूनच हुशार व तल्लख बुद्धीचे असल्याने त्यांचे इंग्रजी भाषेवर प्रचंड प्रभूत्व होते. त्यातूनच इंग्रजी साहित्य वाचण्याची त्यांना आवड निर्माण झाली. मार्क्स, लिओ, टाँलस्टॉय, स्टँलीन, गाँकी, आदि कम्युनिस्ट विचारवंताची पुस्तके त्यांनी वाचली. या विचारवंताच्या कार्यकर्तुत्वाचा आणि विचारांचा प्रभाव बाबुजींच्या तरुण मनावर पडला. त्यामुळे स्वातंत्र्य, समता आणि बंधुत्व या तत्त्वाला प्रमाण मानून त्यांनी मनापासून जपले. बाबुजींचे वडील लष्करात अधिकारी असल्याने आपल्या मुलाने ही लष्करात नोकरी करावी अशी त्यांची इच्छा होती. वडिलांच्या आग्रहामुळे त्यांनी संस्थानांमध्ये कॅप्टन या पदावर नोकरी केली परंतु नोकरीमध्ये त्यांना फार रस नव्हता. गुलामगिरी करणे हे त्यांना लहानपणीपासूनच आवडत नव्हते. त्यामुळे नोकरी सोडून पाथर्डीत माय भूमीत येऊन स्वतःला स्वातंत्र्य चळवळीत झोकून त्यांनी दिले. महात्मा गांधीच्या देशभक्तीच्या विचाराने ते भारावून गेले होते. बाबुजींचा स्वभाव शांत व विनोदी असल्याने त्यांनी अनेक मित्र जोडले. वंचित व गोरगरीब माणसाला मदत करण्याची त्यांची इच्छा होती. त्यामधूनच त्यांनी सामाजिक कार्यास सुरुवात केली. लष्करी शिस्तीचे बाबुजी वर करणी फणसासारखे कडक काटेरी भासत असले तरी अंतकरणातून त्यांच्या बुद्धीची करुणा गांधीजींच्या सत्याग्रहाचा मूलमंत्र, विवेकानंदाची वैश्विकता, येशूची क्षमाशीलता, चिकाटी निर्धार, धैर्य आणि मानवतेची सेवा करण्याची वृत्ती त्यांच्यामध्ये निर्माण झाली. बाबुजी बरोबर शेवगाव व पाथर्डी तालुक्यातून बरेच सहकारी एकत्र येऊन काम करू लागले. डॉ. महाजन, आठरे पाटील ब्रिटिश सरकारच्या विरोधात बुलेटीन काढून हंडाळवाडी येथे गठ्ठे एकत्र करून पाथर्डी व इतर खेडेगावात पाठविण्याचे काम करत असत. बाबुजींना शेतकऱ्या विषयी, कष्टकरी जनते विषयी जिव्हाळा होता. सर्वसामान्यांचे राज्य आले पाहिजे असे त्यांना वाटत होते. "न्यू एज" या वर्तमानपत्रातील लेख बाबुजींना साम्यवादी विचाराकडे आकर्षित करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा ठरला. समाजकार्याची ओढ अधिक त्यांच्यामध्ये निर्माण झाली. सामान्य माणसाला हक्क मिळवून देण्यासाठी त्यांनी आपला संघर्ष अधिक तीव्र केला. **बाबुजींचे* *स्वातंत्र्य* *चळवतील* *कार्य*:- बाबुजी १९४२ च्या छोडो भारत चळवळीत सहभागी झाले. इथून चालते व्हा हा वणवा देशातील गावागावातून पेटून उठला पाथर्डीतील डोंगराळ भागात ब्रिटिशांविरुद्ध बाबुजी व त्यांच्या सहकाऱ्यांनी चलेजाव चा नारा दिला. खेडेपाड्यात वाढीवस्तीवर दिवस-रात्र चलेजाव चळवळीचा मंत्र बाबुजी लोकांना समजावून सांगत होते. बाबुजींचे व्यक्तिमत्व अतिशय धिप्पाड, रुबाबदार, पहाडी आवाज सहकाऱ्यांना बरोबर घेऊन जाण्याची त्यांची हातोटी वेगळ्या प्रकारची होती. १९४४ मध्ये नोकरी सोडून गावी परत आल्यावर बाबुजी म्हणाले देशसेवा केली आहे, आता गाव सेवेला सुरुवात करायची. त्यासाठी आपण स्वस्त बसणार नाही, स्वातंत्र्यासाठी जीव गेला तरी चालेल पण हातात घेतलेले काम तडीला न्यायचे आहे. आपल्या दहा ते पंधरा सहकाऱ्यांची मीटिंग घेऊन बाबुजी नियोजन करत होते. स्वातंत्र्य लढ्यात बाबुजींना भूमिगत व्हावे लागले. बाबुजी स्वतः हंडाळवाडी येथून स्वातंत्र्य चळवळीचे काम पाहत होते. बाबुजी चळवळीत आल्यामुळे त्यांचे घर भूमिगतांचे व क्रांतीकारांचे माहेरघर बनले. बाबुजींच्या कार्याची दखल घेऊन त्यांच्या पाठीमागे मोठा मित्र परिवार निर्माण झाला. बाबुजींनी आपल्या कार्याची सुरुवात कम्युनिस्ट पक्षात प्रवेश करून केली. शेतकरी कष्टकरी कामगार यांच्या हितासाठी संघर्ष सुरू झाला. बाबुजींना तुळपुळे, कराडकर आणि बी. डी. कुलकर्णी यांचे मार्गदर्शन लाभले. बाबुजी कॉम्रेड एस एम डांगे यांचे खंदे समर्थक असल्याने दिन दलित व दुबळ्या समाजासाठी आपण काहीतरी काम केले पाहिजे अशी त्यांची धारणा होती. १९४३ मध्ये चंद्रभान आठरे यांचे बरोबर बाबुजी आव्हाड, भाऊसाहेब थोरात, पी. बी. कडू, डॉ. महाजन, आण्णासाहेब शिंदे यांना इंग्रजांनी पकडून नाशिक जेलमध्ये टाकले. तुरुंगवासात साम्यवादी विचारसरणीचा अभ्यास करून ते कम्युनिस्ट होऊनच बाहेर पडले. त्यानंतर पाथर्डी व शेवगाव तालुक्यात बाबुजींनी कम्युनिस्ट विचारसरणी रुजवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. या काळात शेतकऱ्यांच्या मुलांना शिक्षण मिळत नव्हते, त्यांना राहण्यासाठी जागा नव्हती म्हणून बाबुजींनी बहुजन समाजाच्या मुलांना शिक्षण घेता यावे यासाठी १९४६ मध्ये पाथर्डी येथे श्री मुळे यांच्या वाड्यात शेतकरी बोर्डिंग ची स्थापना केली. पुनर्घटना परिषदेत पिण्याचे पाणी, शेती सुधारणा, शिक्षण, आरोग्य हे प्रश्न सोडवण्यासाठी बाबुजींनी अग्रक्रम दिला. सहा जानेवारी १९४५ च्या टिटवाळा परिषदेत पाथर्डी परिसरातील शेतकऱ्यांना संघटित करण्याचे काम बाबूजींनी केले. त्याचबरोबर १९४६ मध्ये संघटना बळकट करण्यासाठी महाराष्ट्र राज्यातील किसान परिषदेचे अधिवेशन करंजी तालुका पाथर्डी येथे आयोजित केले. कॉम्रेड बकिम मुखर्जी, कलकत्ता हे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून बोलावले. या परिषदेत शाहीर अमर शेख, अण्णाभाऊ साठे, गव्हाणकर यांच्या कला पथकाला बोलावून नागरिकांचे प्रबोधन केले. १९४७ ला भारत देश स्वतंत्र झाला, त्यानंतर बाबुजी आपले सहकारी चंद्रभान आठरे, साहेबराव राजळे, एकनाथ भागवत, भास्करराव औटी यांच्या समवेत गावागावात जाऊन समाजात जनजागृती केली. इंग्रजी राजवट संपली सामाजिक क्रांतीतून विकास होणार, शेतकरी कामगार हिताचे राज्य येणार या विश्वासातून १९४० ते १९६० या दरम्यान विचारी तरुण वर्ग जागा झाला. या विचाराची जळती ज्योत हाती धरून समाज परिवर्तनाच्या लढ्यात मोठ्या हिरीरीने उतरलेल्या सामाजिक विकासासाठी डाव्या चळवळीचा झेंडा खांद्यावर घेऊन पराकोटीच्या त्यागासाठी हा तरुण वर्ग पेटुन उठला. त्यातीलच एक निधड्या छातीचा तरुण म्हणजे बाबुजी आव्हाड होय. बाबुजींनी स्वातंत्र्य चळवळीत आपले सर्वस्व पणाला लावले. भूमिगत होऊन जेलमध्ये जाऊन वेगवेगळ्या परिषदा भरवुन सर्वसामान्यांना हक्क मिळवून देण्यासाठी ते सतत झटले. आपला भारत देश स्वतंत्र झाला पाहिजे. लोकशाही व्यवस्था देशात आली पाहिजे. समता, स्वातंत्र्य, बंधुत्व व न्यायाच्या आधारावर या ठिकाणची समाज व्यवस्था निर्माण झाली पाहिजे. यासाठी मला शहीद व्हावे लागले तरी चालेल अशा विचाराने कॉम्रेड बाबुजी आव्हाड भारताला स्वातंत्र्य मिळेपर्यंत शेवटपर्यंत संघर्ष करीत राहिले. कॉम्रेड बाबुजी आव्हाड यांनी स्वातंत्र्य मिळवण्यासाठी आपले सर्वस्व पणाला लावत डाव्या विचारांची कास धरून कार्यनिष्ठा व पक्षनिष्ठा यामुळे कष्टकरी जनतेच्या गळ्यातील ते बनले. " बहुजन हिताय बहुजन सुखाय" हे त्यांचे ब्रीदवाक्य होते. बाबुजींच्या साधेपणाला महात्मा गांधीजींच्या सेवेचा व सत्याचा सुगंध होता. समाजातल्या वंचितांचे उपेक्षितांचे प्रश्न सोडवताना त्यांनी जो संघर्ष केला तो लोकशाही मूल्यांचा जागर होता. बाबुजींनी १९५७ ते ६७ अशी दहा वर्षे विधानसभेत आमदार असताना मतदारसंघातील प्रश्न मांडले. पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना करून ऊस तोडणी मजुरांच्या मुलांना जनता महाविद्यालय पाथर्डी सारख्या दुष्काळी तालुक्यात सुरू केले. वृद्धेश्वर सहकार सहकारी साखर कारखाना उभारणीमध्ये बाबुजींचे महत्त्वपूर्ण योगदान होते. पाथर्डीचे परिवर्तन करण्यासाठी स्वातंत्र्य आंदोलनापासून आपल्या कार्याची सुरुवात केल्यानंतर ते कायम संघर्ष करीत राहिले. त्यामुळेच पाथर्डी व परिसरात बाबुजींचे कार्य स्वातंत्र्य चळवळीतील कार्य आणि त्यांचे योगदान कायम स्मरणात राहील. त्यांच्या संघर्षमय जीवनाला सलाम आणि १०१ व्या जयंतीनिमित्त कॉम्रेड बाबुजींना विनम्र अभिवादन!
शब्दांकन: *प्रा.डॉ.अशोक कानडे*,
इतिहास विभाग प्रमुख,
बाबुजी आव्हाड महाविद्यालय, पाथर्डी, जि. अहमदनगर.
Post a Comment