महेफ़िल
◽ मख़दुम समाचार ◽
२६.४.२०२३
राजा
सभेत भाषण करताना
राजा हुकमी रडायचा,
प्रजेच्या चिंतेमधे,
बघता बघता बुडायचा!
गरिबांची कणव येऊन
त्याचा आवाज पडत असे,
कधी ध्येयवादी होऊन
उंच उंच चढत असे !
राजा मोठा नट होता,
राजा होता शिकारी,
इतकं वैभव असूनसुद्धा
राजा होता भिकारी !
अनेक मूर्ख माकडांच्या
टोप्या त्याने घेतल्या होत्या,
आणि ज्यांना घालायच्या
त्यांना टोप्या घातल्या होत्या !
जिथे घाली हात तिथे
खाणं चापून घेत असे,
हवं असेल राजाला
तेच छापून येत असे !
भिकारी का होता?
राजालाच ठाऊक होतं!
तसं त्याचं मन म्हणे
आतून फार भावुक होतं !
चिंतेमधे चूर होऊन
येरझारा घालत असे,
बागेमधे तासनतास
एकटा एकटा चालत असे !
राजा रोज मुकुट घालून
आरशापुढे रहात असे,
स्वतःवर प्रेम करीत
स्वतःकडे पहात असे !
प्रजा सगळी मुठीत होती,
जयजयकार करायची,
आश्वासनं खात खात
आपली पोटं भरायची !
सगळ्या गुंड दादांवर
आतून त्याचा ताबा होता
त्याचे भविष्य सांगणारा
एक बडा बाबा होता !
बडे बाबनंतर त्याची
स्वतः वरती भक्ती होती
स्वतःवर प्रेम करणे
हीच त्याची शक्ती होती !
राजाच्या स्तुतीचे
रकाने पाठ होते
राजाच्या पदरी असे
बडे बडे भाट होते !
दोन्ही हातात घेऊन बाजा
नागडा नाचू लागला राजा
तरी देखील सगळ्यांनी
आपल्या अकला खाजवल्या
इमानाने उभे राहून
जोरात टाळ्या वाजवल्या !
- मंगेश पाडगावकर.
(सन १९९० साली प्रकाशित झालेल्या 'बोलगाणी' कवितासंग्रहातून साभार )
إرسال تعليق