◽ मख़दुम समाचार ◽
अहमदनगर (राजेश सटाणकर) २४.४.२०२३
जागतिक हिवताप दिनानिमित्त मंगळवारी दि. २५ रोजी जिल्ह्यासह शहरात विशेष जनजागृतीपर मोहीम राबविण्यात येणार आहे. नागरिकांनी सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. रविंद्र कानडे यांनी केले आहे.
या मोहिमेंतर्गत प्रभात फेरी, सायकल - दुचाकी रॅली, हिवतापासंदर्भातील माहिती विषयक प्रदर्शन, बसस्थानक, रेल्वे स्थानकांवर जनजागृती केली जाणार आहे. राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हिवताप आजार आणि त्यासाठीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजनांसाठी जिल्ह्यातील आरोग्यसेवक, सेविका, आशा वर्कर्स यांच्या मार्फत डासआळी सर्वेक्षण, पाणीसाठ्यात गप्पी मासे सोडणे मोहिम, व्हेंट पाईपला जाळ्या लावणे, आरोग्यशिक्षण देणे अशा माध्यमातून जनजागृती केली जाणार आहे. कोणालाही ताप, उलटी, मळमळ असा त्रास जाणवल्यास त्वरित जवळच्या नागरी आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य केंद्रात अथवा ग्रामीण रुग्णालयात जाऊन हिवताप/ डेंग्युसाठीची तपासणी नि:शुल्क करुन घ्यावी, असे आवाहनही डॉ. कानडे यांनी केले आहे.
ही घ्यावी काळजी
आपल्या घरात आजूबाजूला पावसाचे पाणी साचू देऊ नये, स्वच्छता ठेवावी. पाणी साठे झाकून ठेवावेत. आठवड्यातून एक दिवस कोरडा पाळावा. भंगार साहित्य, टायर्सची वेळीच विल्हेवाट लावावी. शौचालयाच्या व्हेंट पाईपला जाळ्या बसवाव्यात. झोपतांना मच्छरदाणीचा वापर करावा. पाणी साठ्यात गप्पी मासे सोडावेत, अशी माहिती डॉ. कानडे यांनी दिला.
◾
हे हि वाचा : माधुरी दीक्षित : Beauty with Brain कालातीत सौंदर्याची सम्राज्ञी. 'कलावार्ता'मधील गुरुदत्त वाकदेकरांचा लेख
Post a Comment