राजर्षी स्मृतिदिन
◽ मख़दुम समाचार ◽
६.५.२०२३
आज शाहू महाराजांना जाऊन बरोबर ९८ वर्षे झाली. या शतकभराच्या काळात शाहूकार्याची महती आणि महत्व वाढतच निघाले आहे. पण हे महत्व वाढत आहे याचे एक प्रमुख कारण शाहूंचे कार्य, चरित्र अभ्यास करुन लोकांपर्यंत पोहचवणारे इतिहास अभ्यासक, संशोधक यांचे प्रयत्नही आहेत. अशाच शाहू चरित्रांचा त्रोटक आढावा या लेखात घेत आहोत.
राजर्षी शाहू महाराजांची अनेक लोकांनी लिहलेली चरित्रे आपल्यासमोर आहेत. शाहू महाराजांवर जेवढे स्मारक ग्रंथ निघाले तेवढे आजपर्यंत कोणत्याही संस्थानिकावर किंवा शाहूकालीन व्यक्तीवर निघालेले नाहीत. शाहू चरित्र लिहण्याची सुरूवात ही शाहू महाराजांच्या काळातच आणि खुद्द शाहू महाराजांच्याच आज्ञेने झालेली होती हे खूप कमी जणांना माहित आहे. शाहू महाराजांना इतिहासाची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे आणि शाहू महाराज जे काही कार्य करत होते त्या कार्याची व्यापकता आणि धोके हे त्यांना माहित असल्यामुळे पुढे जाऊन स्वतःचे चरित्र शेक्सपियरच्या नाटकातील 'यागी' या पात्रासारखे होईल आणि जे मूळचे शाहू महाराजांचे कार्य आहे ते विकृत पध्दतीने रंगविले जाईल. अशी शाहू महाराजांना शंका वाटत असल्यामुळेच त्यांनी स्वतःच्या हयातीतच स्वतःचे चरित्र लिहण्याची जबाबदारी त्यांचे दिवाण, की जे शाहू महाराजांच्या लहानपणापासून प्रत्येक कार्यात, प्रत्येक गोष्टीत सहभागी होते त्या रावबहाद्दूर रघुनाथराव सबनीस यांना दिली होती. तसेच त्यांनी 'दोन व्यक्तींची १००-१०० रु. पगार देऊन चरित्राची साधने संकलित करण्यासाठी नेमणूक करावी.' असा शाहू महाराजांनी दिलेला आदेश ही आज आपणासमोर उपलब्ध आहे. पण दुर्दैवाने महाराजांच्या काळात शाहू चरित्र जे शाहू महाराजांना अपेक्षित होते सबनीसांनी लिहावे ते लिहले गेले नाही. शाहू महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या गादीवर राजाराम महाराज आले. काही काळातच दिवाण रावबहाद्दूर सबनीस यांनी दिवाण पदाचा राजीनामा दिल्यामुळे रावबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे हे कोल्हापूरच्या दिवाणपदी आले. आण्णासाहेब लठ्ठे यांनी शाहू महाराजांचे पहिले दोन खंडातील Memories of His Highness Shri Shahu Chhatrapati Maharaja of Kolhapur , vol. I & II असे इंग्रजी मधील एक सुंदर चरित्र १९२४ मध्येच प्रकाशित केले. आणि त्याचेच मराठीतही भाषांतर 'श्रीमच्छत्रपति शाहू महाराज यांचे चरित्र' म्हणूनही १९२५ मध्येच प्रकाशित केले. आण्णासाहेब लठ्ठेंनी लिहलेल्या या पहिल्या शाहू चरित्रानंतर खूप वर्षे शाहू महाराजांच्यावर ग्रंथरुपाने काही लिहले गेले नाही अपवाद कुरणे, भास्करराव जाधव, भाऊराव पवार यांची लहान पुस्तके व आठवणी आणि सत्यवादी, विजयी मराठा, राष्ट्रवीर, हंटर सारख्या शाहू अनुयायांनी केलेले लिखाण. यांनी लिहले तेही स्वतंत्र्यपूर्व काळात.
(Image - Indrajit Sawant, Kolhapur)
- डॉ. देविकाराणी पाटील.
कोल्हापूर, महाराष्ट्र,
إرسال تعليق