स्मृतिवार्ता
मख़दूम समाचार
२६.६.२०२३
देशकार्य कसे होणार :
दक्षिण महाराष्ट्र बहिष्कृतवर्ग परिषद २२ मार्च १९२० रोजी माणगाव येथे राजर्षी शाहू छत्रपतींच्या प्रमुख उपस्थितीत आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली भरली होती. या परिषदेतील आपल्या भाषणात शाहू छत्रपती म्हणतात,
"ज्यांच्याप्रमाणे हजारी एकसुद्धा नसून जे मागासलेल्यांना, खुद्द क्षत्रियांना (ज्यांनी त्यांचा मोंगलापासून बचाव केला व ज्यांचे पूर्वज राम कृष्ण सूर्यवंशी, सोमवंशी क्षत्रिय हे ज्यांच्या देव्हाऱ्यावर आहेत त्यांना) सुद्धा शूद्र म्हणून गोमय काय विष्ठेपेक्षाही अस्पृश्य मानितात व स्पर्श झाला म्हणजे जे स्वतःची शुद्धी करून घेतात, असे पुढारी काय कामाचे ? पाश्चिमात्य देशांत अगर इतर कोणत्याही देशात असले पुढारी कोण कबूल करील?
पशुहून काय, गोमय किंवा विष्ठेहनही कमी दर्जाचे आपल्या बंधू-भगिनींना व देशबांधवांना मानणाऱ्या लोकांनी पुढारी व्हायची इच्छा करणे कितीतरी बेशरमपणाची गोष्ट आहे ! मला ज्या वेळी मुखत्यारी मिळाली, त्यावेळी ब्राह्मणेतर एकही वकील अगर नोकर नव्हता. परंतु त्यांना वकिलीचे ज्ञानामृत पाजल्यापासून " ते वाकबगार झाले आहेत . त्याचप्रमाणे अस्पृश्य मानिलेल्या लोकांना नोकऱ्या व स्पेशल केस (Special Case) करून वकिलीच्या सनदा दिल्या आहेत. यात ते इतर लोकांप्रमाणे वाकबगार होतील अशी उमेद आहे. मी लवकरच कांना, 'सेल्फ गव्हर्नमेंट' थोड्या प्रमाणावर देणार आहे. त्याचा फायदा सर्वांना व विशेषत : अस्पृश्य मानिलेल्यांनाही सारखा मिळावा म्हणून 'कम्युनल रिप्रेझेंटेशन' ही देणार आहे.
कित्येक म्हणतात की, राजकारणाचा व स्पृश्यास्पृश्यतेचा काय संबंध आहे ? काही संबंध असल्यास आम्ही तसेही करू. पण मी म्हणतो, अस्पृश्यांना मनुष्याप्रमाणे वागविल्याशिवा राजकारण कसे होणार ? ज्यांना राजकारण करणे आहे, त्यांनी मनुष्याला मनुष्याप्रमाणे म्हणजे इतर देशात वागवितात त्याप्रमाणे वागविले पाहिजे आणि तसे वागविल्याशिवाय देशकार्य कसे होणार ? आणि असे जो वागवील त्यानेच देशकार्य केले असे म्हणता येईल, इतरांनी नाही.
हिंदुस्थानशिवाय इतर कोणत्याही देशात मनुष्यात जात नाही. परंतु दुर्दैवाने हिंदुस्थानात मात्र जातिभेद इतका तीव्र आहे की, मांजर-कुत्रे किंबहुना शेणापेक्षादेखील कमी, अशाप्रमाणे आम्ही आपल्या देशबांधवांस व भगिनींस वागवितो व अजूनही आम्ही गैरशिस्त पुढारी करितो. म्हणून गरीब लोक अहमदाबाद, अमृतसरसारखे ठिकाणी व मागे मुंबईस झालेल्या दंग्यासारख्या प्रसंगी बळी पडतात. तोंडाने बडबडणारे पुढारी आम्हास नको आहेत. कृतीने जातिभेद मोडून आम्हास मनुष्याप्रमाणे वागवितील असे पुढारी पाहिजेत."
झाले बहु होतील बहु
पण या सम हा ll
भारताचा मेरू, ब्राह्मणेतरांचा आत्मविश्वास असणार्या राजर्षी शाहू छत्रपतींचे जीवित कार्य फार मोठे आहे. प्रत्येक युगपुरुषाचे विशिष्ट असे जीवित कार्य असते व त्या कार्यावरूनच त्या व्यक्तीचा मोठेपणा सिद्ध होतो. शतकानुशतकं अज्ञानाच्या अंधकारात आणि सामाजिक व धार्मिक गुलामगिरीत खितपत पडलेल्या समाजाला जागृत करून त्यांना स्वाभिमानाचा, आत्मविश्वासाचा मार्ग दाखवून त्या मार्गावर त्यांचा हात धरून काही अंतरापर्यंत चालविण्याचे आपले जीवित कार्य त्यांनी अत्यंत स्वार्थत्यागपूर्वक व धीरोदात्तपणे बजावले. धर्माला वळण देण्याची राज-ऋषींची परंपरा त्यांनी आधुनिक काळात कायम ठेवली. म्हणूनच त्यांच्या जन्मभूमीपासून हजारो मैल लांब असणार्या प्रदेशातील जनतेने त्यांना 'राजर्षी' हा बहुमानाचा किताब बहाल केला. अशा या युगपुरुषाला त्यांच्या जयंतीदिनी मानाचा मुजरा.
- डॉ. देविकाराणी पाटील.
इंद्रजित सावंत.
२६ जून २०२३
कोल्हापूर, महाराष्ट्र
إرسال تعليق