नगर - माझीही एक अस्वस्थ मनाची व्यथा आहे. आम्ही नट आहोत, दिग्दर्शक आहोत. आम्हाला व्यासपीठावर फार काही बोलता येत नाही. या व्यासपीठावर सचिन तेंडुलकर, धोनी या क्रिकेटरांसमोर एखाद्या फुटबॉल खेळणार्या खेळाडूला आपण खेळायला लावत आहोत, असे मला वाटते. पत्रकार साहित्यिक होतो तेव्हा तो ऑल राऊंडर साहित्यिक होतो. त्याची साहित्याची वेगळी शैली असते, पत्रकार ऑल राऊंडर साहित्यिक झाल्यानंतर त्याची सूक्ष्म निरीक्षण शक्ती, शोधक वृत्ती, व वस्तू स्थितीचे चित्रण करण्याची शैली वेगळी असते. असे प्रतिपादन चित्रपट निर्माते, दिग्दर्शक, अभिनेते महेश मांजरेकर यांनी केले.
पत्रकार बंडू पवार लिखित ‘अस्वस्थ मनाच्या व्यथा’ या कथा संग्रहाच्या प्रकाशन सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून ते बोलत होते. आदर्शगाव समितीचे कार्याध्यक्ष पद्मश्री पोपटराव पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या प्रकाशन समारंभास आमदार संग्राम जगताप, आमदार प्रा. राम शिंदे, आमदार लहू कानडे, प्रसिद्ध उद्योजक तथा मसाप सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया, जिल्हाधिकारी सिद्धाराम सलिमठ, जेष्ठ पत्रकार अनिरुद्ध देवचक्के आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.
पुढे बोलतांना महेश मांजरेकर म्हणाले की, बंडू पवार यांनी लिहलेले अस्वस्थ मनाच्या व्यथा हा कथा संग्रह मी वाचणार आहे. बंडू पवार व माझी मैत्रीण का आहे हे माहीत नाही. पण तो माझा चांगला मित्र आहे. वर्षानुवर्ष आणि दोघे मित्र आहोत.त्याचे निरीक्षण चांगले आहे. त्यामुळे त्याच्याकडून भविष्यात मी एखादा चित्रपट लिहून घेणार आहे. कोविड हा एक व्हायरस होता. कोविड लसीने देखील काही झाले नाही. आपल्या शरीरातील प्रतिकार शक्तीने कोविड पासून संरक्षण करणे शक्य होते. अजून थोडी काळजी घेतली असती तर लोक वाचले असते. त्यामुळे मला हे पुस्तक वाचायचे आहे. मला कॅन्सर झाल्याचे समोर आल्यानंतर मी त्यावर मात केली त्यातून बरा झालो सध्या तरी मला कॅन्सर नाही. कोरोनाच्या कालावधीत लोकांच्या मनातील धास्तीवर कुणीतरी लिहिले पाहिजे. असे त्यांनी यावेळी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने मला पोपटराव पवार यांसारख्या मोठ्या माणसांना प्रत्यक्ष भेटता आले. त्यांच्याशी बोलता आले. त्याचबरोबर मी आदर्शगाव हिवरे बाजाराला देखील भेट देणार आहे. असे ही ते म्हणाले.
पद्मश्री पोपटराव पवार म्हणाले की, पत्रकार बंडू पवार यांनी ‘अस्वस्थ मनाच्या व्यथा’ या कथा संग्रहामध्ये सर्व सामान्य माणसांच्या अंतर मनाला भिडणारे लेखन केले आहे. त्यांनी भविष्यातही अशाच प्रकारे लिखाण करून आपल्या व्यथा व भावनांना वाट मोकळी करून द्यावी. बंडू पवार यांच्या कथा संग्रहातील शेवटचा डोल या कथेतील मुक्ताबाई व ग्रामसेवक यांच्यावरील लेखन हृदयस्पर्शी आहे. आगामी काळात कुठलेही संकट आल्या नंतर मदत मिळेल अशा माणसांची आज समाजाला गरज आहे. असे ते म्हणाले. गेल्या 75 वर्षांत आपण माती आणि पाणी संपवलं अन्न दूषित केलं आता तापमान बदलाच्या घटना मोठ्या प्रमाणात घडत आहेत. त्याला आपल्याला सामोरे जावे लागेल. असे ते म्हणाले.
आमदार संग्राम जगताप म्हणाले,प्रत्येक व्यक्तीत लेखक हा दडलेला असतो. यात काहींना लिहिता येते तर काहींना लिहिता येत नाही. पत्रकारितेच्या माध्यमातून लेखक घटना पाहत असतो. लेखकांनी केलेले लिखाण हे कायमच समाजासाठी प्रेरणादायी असते. चांगली पुस्तके लिहिली पाहिजे. त्यामुळे पत्रकार बंडू पवार यांचे ‘अस्वस्थ मनाच्या व्यथा’ हे पुस्तक निश्चितपणे दिशा देणारे ठरेल, असा विश्वास आमदार जगताप यांनी व्यक्त केला.
आमदार राम शिंदे म्हणाले, पत्रकार बंडू पवार यांनी कोरोनावर हे पहिले पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकात 34 शीर्षकाखाली कथा आहेत. पुस्तके वाचली तरच ज्ञानात भर पडते मात्र गेल्या काही काळापासून पुस्तके वाचनाचा छंद दुर्मिळ होत चालला आहे. बंडू पवार आता पत्रकाराचे साहित्यिक झाले आहेत. त्यांच्या पुस्तकातून समाजाला प्रेरणा मिळेल असा विश्वास आमदार राम शिंदे यांनी व्यक्त केला.
आमदार लहू कानडे म्हणाले, कोरोनाच्या कालावधीत गोरगरिबांची काय अवस्था झाली याच्या सर्व व्यथा या कथासंग्रहात आहेत अशा प्रकारची पुस्तके आली पाहिजेत असे त्यांनी सांगितले.
उद्योजक तथा मसापच्या सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया म्हणाले, बंडू पवार यांच्या या पुस्तकाच्या माध्यमातून निश्चितपणे प्रबोधन होईल. त्यांचे हे पुस्तक कायम रेफरन्स देण्यासाठी राहील असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला
अनिरुद्ध देवचक्के यांनी प्रास्ताविक केले. पत्रकार तथा लेखक बंडू पवार यांच्या वतीने त्यांचे मित्र संतोष जायभाय यांनी मनोगत व्यक्त केले. प्रसाद बेडेकर यांनी सूत्रसंचालन केले. बंडू पवार यांनी आभार मानले. पवार कुटुंबियांच्या वतीने महेश मांजरेकर यांच्यासह उपस्थित सर्व मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.
कार्यक्रमासाठी चित्रकार श्रीधर अंभोरे, कवी प्रा. शशिकांत शिंदे, कवी चंद्रकांत पालवे, रसिक ग्रुपचे अध्यक्ष जयंत येलुलकर, शब्दगंधचे अध्यक्ष राजेंद्र उदागे, संस्थापक सुनिल गोसावी, भाजपचे दक्षिण जिल्हाध्यक्ष अरुण मुंढे, खजिनदार भगवान राऊत, संघटक कवयित्री शर्मिला गोसावी, बन्सी सातपुते, सुरेशराव चव्हाण, सदानंद भणगे, रवींद्र सातपुते, किशोर मरकड, भूषण देशमुख,उद्योजक सुनील कानवडे, राजेंद्र कटारिया,संजय गुगळे, संजय बंदिष्टी, डॉ. सतीश सोनवणे, डॉ.आर .आर. धूत, विवेक नाईक, जिल्हा माहिती अधिकारी रवींद्र ठाकूर आदी यावेळी उपस्थित होते.
पोपटराव पवारांना पद्मभूषण मिळायला हवा
या व्यासपीठावर पोपटराव सारख्या व्यक्तिमत्त्वाला भेटता आले. माणसं खूप काम करतात. मात्र त्याचे श्री पाणी फाउंडेशनमध्ये असलेले आमिर खान सारखे मंडळी क्रेडिट घेऊन जातात. पोपटराव पवार यांच्यासारखी माणसं जगासमोर आली पाहिजेत. खरं म्हणजे पोपटराव यांना पद्मश्री मिळाला याचा मला आनंद नाही त्यांना पद्मभूषण मिळायला हवा. पद्मश्री पेक्षा त्यांचे काम मोठे आहे असे महेश मांजरेकर यांनी सांगितले.
Post a Comment