मख़दूम समाचार
अहमदनगर (विजय मते) २७.९.२०२३
आपल्या देशाचा आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक विकास घडविण्याचे काम युवाशक्तीवर आहे. यात राष्ट्रीय सेवा योजना उपक्रमाची महत्वाची भुमिका राहिली आहे. राष्ट्रीय सेवा योजनांच्या उपक्रमांमधून युवाशक्तीला नवचैतन्य मिळते. विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणिव निर्माण होण्यासाठी असे उपक्रम वारंवार होणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन प्रमुख पाहुणे रात्र महाविद्यालयाचे प्राचार्य संदिप कांबळे यांनी केले.
नारायणडोह येथील डॉ.ना.ज.पाअुलबुधे तंत्रनिकेतन कॉलेजमध्ये राष्ट्र सेवा योजना दिवस विविध उपक्रमांनी साजरा करण्यात आला. याप्रसंगी प्रमुख पाहुणे प्राचार्य संदिप कांबळे, राष्ट्र सेवा योजना कार्यक्रम अधिकारी सुदर्शन लोखंडे, प्राचार्य बी.बी.बोर्डे आदि उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी हुंडाबंदी, अंमली पदार्थावर बंदी या विषयावर नाटीका सादर केली.
प्राचार्य कांबळे पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रीयत्वाची जाणीव निर्माण झाली तर समाजकार्याचा सराव करण्यास वाव मिळतो. सामाजिक बांधिलकी, सेवाभाव यामुळे राष्ट्रीय सेवा घडते. सेवा व त्याग यामुळे सेवेचे महत्व कळते.
यावेळी प्रा.सुदर्शन लोखंडे म्हणाले, ता.२४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त देशातील ३७ विद्यापीठांत राष्ट्रीय सेवा योजना सुरु केली. आज देशातील हजारो महाविद्यालये व लक्षावधी विद्यार्थी या योजनेत सहभागी झाली आहेत. यातून त्यांच्या राष्ट्रीयत्वाची भावना निर्माण होऊन सुजान नागरिक तयार होत आहेत.
तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य बी.बी.बोर्डे यांनी विविध उपक्रमांची माहिती दिली. या सेवा योजना शिबीरांमधून विद्यार्थी-स्वयंसेवक सेवेची मुल्ये आणि समाजसेवेसाठी तत्पर असतो, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.प्रतिक्षा कापसे यांनी तर आभार प्रा.सागर बोठे यांनी मानले.
Post a Comment