अहमदनगर ः भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी पत्रकारांबद्दल केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ अहमदनगर पत्रकार संघाने नगर शहरातील भाजपच्या प्रमुख पदाधिकार्यांना बुधवारी सकाळी चहाचे निमंत्रण दिले होते. मात्र, भाजप प्रदेश कार्यकारिणी सदस्य प्रा. भानुदास बेरड यांच्या व्यतिरिक्त कोणीही पत्रकारांचा चहा प्यायला आले नाही. प्रा. बेरड यांनी बावनकुळे यांच्या वक्तव्याने पत्रकारांच्या भावना दुखावल्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
दोन-तीन दिवसांपूर्वी नगरमध्ये भाजपच्या बुथ प्रमुख मेळाव्यात प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी, भाजप विरोधात बातम्या येऊ नये म्हणून पत्रकारांना चहा पाजा व ढाब्यावर जेवायला घेऊन जा, असे वक्तव्य केले होते. त्याचा राज्यभरातील पत्रकारांनी निषेध केला. या पार्श्वभूमीवर अहमदनगर पत्रकार संघाने शहरातील भाजप पदाधिकार्यांना, तुम्ही आम्हाला चहा पाजण्याऐवजी आम्हीच तुम्हाला आमच्याकडून चहा पाजतो, असे जाहीर आवाहन करून बुधवारी सकाळी सावेडीच्या माऊली संकुल आवारातील चहाची टपरी सचिन टी सेंटर येथे बोलावले होते. शहरातील भाजप पदाधिकार्यांना तसे व्यक्तीशः निरोप दिले होते. मात्र, प्रा. बेरड यांच्या व्यतिरिक्त कोणीही आले नाही.
सत्तेचा मद चुकीचा-पाटील
सत्तेचा मद मेंदूत शिरला की माणूस अविचारी होतो, याची प्रचिती भाजप प्रदेशाध्यक्षांनी आपल्या वक्तव्यातून करून दिली. पत्रकारितेची अवहेलना करणार्या त्यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करतो. त्यांच्या मनात पत्रकार आणि पत्रकारितेबद्दल काही दुर्भावना असतील तर त्या नक्कीच दूर करण्याचा प्रयत्न करू, असे यावेळी अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत पाटील म्हणाले. अहमदनगर पत्रकार संघाचे सरचिटणीस शिवाजी शिर्के यांनी बावनकुळे यांचा निषेध करण्यासाठी शहरातील भाजप पदाधिकार्यांना पत्रकारांचा चहा घ्यायला बोलावले होते. यापुढे भाजपच्या जबाबदार पदाधिकार्यांनी बोलताना भान ठेवणे आवश्यक आहे. यासाठीच आम्ही चहा सेवन करून व भाजप पदाधिकार्यांना चहा पाजून आमच्या निषेध भावना व्यक्त केल्या आहेत, असे ते म्हणाले.
त्या वक्तव्याबद्दल दिलगिरी ः प्रा. बेरड
प्रा. बेरड यांनी प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी दिलगीरी व्यक्त करताना म्हटले, की दोन दिवसांपूर्वी नगरमध्ये महाराष्ट्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांच्या वक्तव्याचा निषेध म्हणून अहमदनगर पत्रकार संघाने भाजप पदाधिकार्यांना चहापानास बोलवले. त्याबद्दल मी आपला आभारी आहे. मात्र, बावनकुळे यांच्या वक्तव्याचा विपर्यास केला गेला आहे, असे माझे मत आहे. बावनकुळे त्या दिवशी बूथ पदाधिकार्यांच्या बैठकीत बूथवर कोणती कामे करायची याविषयी बोलत होते व बूथवरील मतदारांशी संवाद कसा ठेवायचा हे सांगत होते. प्रत्येक गावात पत्रकार असतोच असे नाही. परंतु प्रत्येक गावात असे काही लोक असतात की ज्यांच्यामुळे एखादी बातमी एकाच्या तोंडून दुसर्याच्या कानी पडून गावभर झालेली असते. अशा माऊथ पब्लिसिटी करणार्या दोन-चार कार्यकर्त्यांशी संपर्क आणि संवाद ठेवा व त्यांच्याबरोबर चहापान करा, असे बावनकुळेंना म्हणायचे होते, असा दावाही प्रा. बेरड यांनी केला. यावेळी अहमदनगर पत्रकार संघाचे अध्यक्ष अनंत पाटील ,सचिव शिवाजीराव शिर्के ,मिलिंद देखणे ,मोहिनीराज लहाडे,शिरीष कुलकर्णी ,अशोक झोटिंग ,राजू खरपुडे,श्रीराम जोशी ,निशांत दातीर ,अबिद खान ,उदय जोशी ,अर्जुन राजापुरे, अन्सार शेख ,श्रीनिवास सामल ,सचिन दशपुते,सौरभ गायकवाड आदी पत्रकार उपस्थित होते.
إرسال تعليق