मुंबई : भाजप अध्यक्ष जे पी नड्डा दीड वर्षांपूर्वी म्हणाले होते की देशात एकच पक्ष राहील. योगायोग म्हणजे नड्डांची आज मुलाखत आली आहे, त्यात ते म्हणाले की भाजप हा स्वयंपूर्ण झाला आहे, त्याला संघाची गरज नाही. त्यामुळे ज्यांनी आपल्याला राजकीय जन्म दिला, त्या संघालाही हे नष्ट करुन टाकतील, अशी टीका शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केली. पाचव्या टप्प्यातील प्रचाराच्या अखेरच्या दिवशी महाविकास आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी मुंबईत पत्रकार परिषद घेतली. यावेळी ठाकरेंसह मल्लिकार्जुन खरगे, शरद पवार, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, नाना पटोले यासारखे नेते उपस्थित होते.
*उद्धव ठाकरे काय म्हणाले?*
एकीकडे शासकीय यंत्रणांचा दुरुपयोग होत आहे, भ्रष्टाचाराचे आरोप करायचे, त्या व्यक्तीला बदनाम करायचं, त्याला पक्षात घ्यायचं आणि त्याचा सन्मान करायचा. महाराष्ट्राला हे बदनाम करत आहेत, लूटत आहेत, मुंबई हे देशाचे आर्थिक केंद्र असल्याचं त्यांना बघवत नाही. मुंबईची लूट करायची आणि सगळं गुजरातला घेऊन जायचं. पण महाराष्ट्राची लूट इंडिया आघाडी सरकार थांबवेल आणि महाराष्ट्राचं वैभव जे गेलंय, त्यासोबत कित्येक पटीने अधिक परत आणू, अशी हमी उद्धव ठाकरेंनी दिली.
सर्वोच्च न्यायालयाचा निकाल आला नाही, तरी पंतप्रधान हे घटनाबाह्य मुख्यमंत्र्यांचा प्रचार करत आहेत. असा प्रकार कधीच घडला नाही. जे देतील साथ, त्यांचा करु घात.. असा प्रकार आहे.. दीड वर्षापूर्वी भाजप अध्यक्ष जे पी नड्डा म्हणाले होते, की देशात एकच पक्ष राहील. मी कालच म्हटलं की आम्हाला हे नकली सेना म्हणतात, उद्या आरएसएसला पण नकली संघ म्हणतील. योगायोग म्हणजे नड्डांची मुलाखत आली आहे, त्यात ते म्हणतात की भाजप हा स्वयंपूर्ण पक्ष झाला आहे, आता त्याला संघाची गरज नाही, असं ठाकरे म्हणाले.
إرسال تعليق