अहिल्यानगर, दि. १७ डिसेंबर २०२५ : ‘कायदा शिक्षण हे केवळ पदवी मिळवण्यापुरते मर्यादित नसून ते समाजासाठी न्याय, मूल्ये आणि जबाबदारी घडवणारे प्रभावी माध्यम आहे. विधी अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांनी अभ्यासासोबतच न्यायव्यवस्थेतील वास्तव, सामाजिक प्रश्न आणि नैतिक मूल्यांची जाणीव करून घेतली पाहिजे,’ असे प्रतिपादन महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अहमदखान पठाण यांनी केले.
साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्थेच्या आडसूळ विधी महाविद्यालयाला महाराष्ट्र व गोवा बार असोसिएशनचे अध्यक्ष अॅड. अहमदखान पठाण यांनी भेट दिली. यावेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. याप्रसंगी आडसूळ टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ. प्रदीप पाटील, आर्ट्स, कॉमर्स अॅण्ड सायन्स कॉलेजचे प्राचार्य डॉ. संभाजी पठारे, विधी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रियाज बेग, प्रा. श्रुती हलदार, प्रा. क्रांती बागूल यांच्यासह विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी उपस्थित होते. अॅड. पठाण यांच्या महत्त्वपूर्ण भेटीबद्दल संस्थेचे अध्यक्ष प्रा.अनिरुद्ध आडसूळ, सचिव लीना आडसूळ व संचालक कृष्णा आडसूळ यांनी त्यांना धन्यवाद दिले.
विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अॅड. अहमदखान पठाण म्हणाले, “वकिली व्यवसायात यशस्वी होण्यासाठी सातत्यपूर्ण अध्ययन, प्रामाणिकपणा, शिस्त आणि समाजभान अत्यंत महत्त्वाचे आहे. आजचे विद्यार्थी उद्याचे न्यायव्यवस्थेचे आधारस्तंभ आहेत. त्यामुळे कायद्याचे शिक्षण घेत असताना सामाजिक बांधिलकी जपणे आणि न्यायासाठी निर्भीडपणे उभे राहण्याची मानसिकता विकसित करणे आवश्यक आहे. बदलत्या सामाजिक व तांत्रिक परिस्थितीत कायद्याचे क्षेत्र अधिक व्यापक झाले असून, विद्यार्थ्यांनी त्या संधींचा सकारात्मक उपयोग केला पाहिजे,” असेही त्यांनी सांगितले.
यावेळी साकेश्वर ग्रामीण विकास सेवा संस्था व आडसूळ विधी महाविद्यालयाच्या वतीने डॉ. प्रदीप पाटील यांनी अॅड. अहमदखान पठाण यांचे स्वागत केले. आडसूळ लॉ कॉलेजचे प्राचार्य डॉ. रियाज बेग यांनी विधी महाविद्यालयाच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या उपक्रमांची माहिती दिली.
إرسال تعليق