माझा लेखन प्रवास - सुनील गोसावी

आमचे मामा ए डी सी सी बँकेत होते. मामाची बदली अहमदनगरला होती, म्हणून मला मातोरीला पाचवी पास झाल्यानंतर सहावीला नगरच्या सिताराम सारडा विद्यालयात प्रवेश घेतला होता. आमचे वडील शिक्षक असल्याने मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे अशी त्यांची इच्छा असे. तर राहायला आम्ही पारशाखुंटा वर पालवे यांच्या खोलीमध्ये होतो. मला सकाळची शाळा असायची. दुपारी शाळेतून आल्यावर जेवण झाल्यानंतर काही काम नसायचे. मग मी पारषा खुंटावरून गंज बाजार कडे जाणाऱ्या रस्त्यावर असलेल्या व्हरायटी नावाच्या टपरीवजा स्टेशनरी दुकान होतें.त्या ठिकाणी गोळ्या, बिस्कीट, चॉकलेट सोबतच स्टिकर, खेळणी ,रंगीत पेपर आणि छोट्या मुलांना वाचता येतील अशी पुस्तकं एक रुपये, दोन ला मिळत असत.  पुस्तके खूप छान असत. एकदा सहज म्हणून मी छोटे पुस्तक विकत घेतले. एकट्याला वाचताना मजा आली,  सायंकाळी संजू मामा, बाळू मामा, गोरख मामा यांनी पण ते पुस्तक पाहिलं. वाचलं.
           पुढे मला छोटी छोटी गोष्टींची पुस्तकं आणून वाचायचा छंद जडला. 
    इमारत कंपनीच्या कॉर्नर वर म्हणजे  लक्ष्मीबाई भाऊराव पाटील कन्या विद्यालयाच्या जवळ असलेल्या दुकानातही अशी पुस्तके विकत मिळत असल्याचा मला शोध लागला. चांदोबा आणि इतर कथा, राक्षसांच्या कथा, विक्रम वेताळ ही पुस्तक आम्ही तिथं घेत असू. सातवी झाल्यावर मामांची बदली राहुरी खुर्द येथे झाली, मग आमची रवानगी चिचोंडी शिराळ येथील आनंद विद्यालयात झाली. तिथे मराठी साठी देखणे सर आणि मुख्याध्यापक ग वि कुलट सर हे होते. त्यांची शिकवण्याची हातोटी, आवाजातील चढ उतार या साऱ्या गोष्टी मनावर बिंबत असत. तिथेही वेगवेगळी पुस्तकं तत्कालीन क्लार्क राऊत सर, गुरसाळी मामा यांच्यामुळे वाचायला मिळाली. कविता शिकवत असताना एकचित्ताने मी कविता ऐकत असे.  
        मग दहावी झाल्यावर अकरावीसाठी शेवगावच्या न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स महाविद्यालयात प्रवेश घेतला. तिथे रूमवर राहत असताना पुस्तक वाचायला मिळत. कॉलेजचे ग्रंथपाल  लांडे सर होते. पाहिजे ते पुस्तक उपलब्ध करून देत. अकरावीला असताना काव्यवाचन स्पर्धेची नोटीस मिळाली. त्या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी पहिली कविता लिहिली.माझे मित्र भाऊसाहेब काळे, शरद दळवी, विलास सोनवणे यांनी ती पुन्हा पुन्हा वाचायला लावली. काव्यवाचन स्पर्धा झाली,मला काही बक्षीस मिळाले नाही, पण कविता लिहिण्याचा छंद जडला तो कायमचाच. मी कवितेची एक स्वतंत्र वही केली. दरम्यान लिहिणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्राचार्य शिवाजीराव देवढे सर यांनी स्वतंत्र ग्रुप तयार करून कार्यशाळा घ्यायला सुरुवात केली. काय वाचायचे ? कसे वाचायचे ? ते सारं सांगत.मग महात्मा सार्वजनिक वाचनालयाचे सभासदत्व स्वीकारले. आता कॉलेज वरून आठवड्याला एक पुस्तक तर वाचनालयातून दररोज नव नवीन पुस्तक वाचायला मिळू लागलं. काव्य लेखनात नवनवीन कल्पना सुचू लागल्या. मग लिहिलेल्या कविता दैनिकाकडे  पाठवू लागलो. 
    जालना येथील किंकाळी मासिक, पुणे येथील काव्ययात्री, काव्यश्री, अस्मितादर्श आशा मासिकांमधून कविता प्रसिद्ध होऊ लागल्या. प्रसिद्ध झालेल्या वृत्तपत्रांचे कात्रण दिवसभर भेटणाऱ्यांना आनंदाने दाखवत असे. मग पुढे काही ललित, काही कथा प्रसिद्ध झाल्या.  महाविद्यालयाच्या वार्षिक विशेषांकात ही लिहू लागलो.  लिहिणाऱ्या समवयस्कांचा एक ग्रुपच तयार झाला. त्यामध्ये अशोक कानडे, भगवान राऊत, भाऊसाहेब सावंत, शहनाज, स्वाती,अशोक सागडे, शर्मिला असे कितीतरी मित्र-मैत्रिणी असत.
       पुढे आपणच एखादं मासिक काढावं असं वाटलं. मग 'शब्दगंध' घडी पत्रिका सुरू केली. एका पानाच्या तीन घड्या करून त्यावर प्रत्येकाची एक एक कविता चित्रांसह प्रसिद्ध करू लागलो.  त्यातूनच दिवाळी अंकाची निर्मिती झाली. सातत्याने दहा वर्षे दिवाळी अंक प्रकाशित केले. त्यानंतर त्यात लिहिणाऱ्यांना एकत्र करून "शब्दगंध साहित्यिक परिषद" स्थापन करण्यात आली. पुढे राजेंद्र उदागे सारखे अनेक मित्र जोडले गेले, मार्गदर्शक मिळत गेले. आज वीस वर्षानंतर एक सक्षम साहित्यिक चळवळ म्हणून शब्दगंध नाव उदयास आले आहे.
       मी स्वतः पुढाकार घेऊन सहा प्रतिनिधीक काव्यसंग्रह, विशेषांक, गौरव अंक, स्मृती ग्रंथ प्रसिद्ध केले आहेत. शेवगावला महाविद्यालयात असल्यापासून काव्यसंमेलना जायला सुरुवात केली, जामखेड ला आ.य.पवार यांच्या पुढाकाराने जिल्हा ग्रामीण साहित्य परिषदेचे पहिलं साहित्य संमेलन झालं, तेव्हापासून मी साहित्य संमेलनाला जायला लागलो. अकोले येथे रत्नाताई कांबळे, टाकळी ढोकेश्वर ला रावसाहेब झावरे,संबोधी विद्यालयाचे तत्कालीन प्राचार्य अर्जुनराव सदाफुले, सीएसआरडी मध्ये प्रा. सुधीर शर्मा सर यांनी घेतलेल्या काव्य संमेलनात मी वेळोवेळी कविता सादर केल्या आहेत. या कवितेच्या प्रवासात अनेक मित्र- मैत्रिणींसह  सहचारणी भेटली, त्यामुळे कवितेच्या प्रवासा सोबतच जीवनाचा प्रवासही सुसहाय्य झाला. साहित्याने जगण्याला एक नवी " दिशा " दिली. 
आकाशवाणी पुणे ,आकाशवाणी नगर, आकाशवाणी नाशिक वर ही काव्यवाचन करण्याची अनेक वेळा संधी मिळाली. सोळा राज्यस्तरीय शब्दगंध साहित्य संमेलने घेतली.

*साहित्य संपदा* 
आठवणींचा डोह - आत्मचरित्र पर लेख संग्रह,
अनोखा - प्रातीनिधिक काव्यसंग्रह संपादन,
शब्द आणि पानगळ -  प्रातिनिधीक काव्यसंग्रह संपादन ,                                                                                                                                                                                                                    प्रेरणा  सूर्य  - कॉ.गोविंदभाई पानसरे स्मृतीग्रंथ                                                                                                                                                                                                                    स्मृतिगंध   -  हिराचंद ब्राम्हणे स्मृतिग्रंथ                                                                                                                                                                                                                                        देवदत्त हुसळे स्मृतिग्रंथ,
क्रांतीदीप : कॉ. बाबा आरगडे गौरव ग्रंथ

*महत्त्वाचे पुरस्कार*
 मुकुंदराव पाटील साहित्य पुरस्कार 
डॉ.बाबासाहेब आंबेडकर फेलोशिप,नवी दिल्ली
यासह इतर पंधरा जिल्हा व राज्यस्तरीय  पुरस्कार
*सुनील गोसावी*
संस्थापक सचिव, शब्दगंध साहित्यिक परिषद 
९९२१००९७५०

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा