संगमनेर-अहिल्यानगर(प्रतिनिधी): महाराष्ट्रातील पारंपारिक लोककला प्रकारातील सनई संबळ ताफा साठी प्रसिद्ध असलेला संगमनेर तालुक्यातील खळी गावातील सखा-सुखा सनई वाजंत्री ताफा प्रसिद्ध होता.ताफ्यात प्रमुख सनई वादन करणारे सखाराम विश्राम वाघमारे व सुखदेव विश्राम वाघमारे हे दोघे सख्खे भाऊ संपूर्ण आयुष्य या कलेला जिवंत ठेवण्यासाठी प्रयत्न करत.आकाशवाणी केंद्र, आंतर राष्ट्रीय परिषदा,लोक नाट्य तमाशा मंडळे, गाव यात्रा छबीना मिरवणूक, हजेरी, साखरपुडा, हळदी समारंभ, लग्न सोहळा इत्यादी कार्यक्रमात सहभागी होत असत.ही प्रसिद्ध जोडी वृद्धापकाळाने काळाच्या पडद्या आड गेल्याने या क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली.हल्ली डीजे, डॉलबीच्या ध्वनित अस्त होत आलेली ही कला जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्या कुटुंबीयांनी सखा-सुखा राज्यस्तरीय वाजंत्री पुरस्कार वितरण परंपरा सुरु केली आहे.
नुकतेच सखाराम विश्राम वाघमारे यांच्या प्रथम पुण्यस्मरण कार्यक्रमात उत्कृष्ट सनई वादक पुरस्कार पाथरे येथील सर्जेराव दौलतराव कदम, खळी चे प्रसिद्ध सुर वादक रामा हिरा वाघमारे, पिंपरी लौकि चे उत्कृष्ट सनई वादक उत्तम लहानु कदम, रावजी देवजी कदम, मालुंजे येथील उत्कृष्ट संबळ वादक सुनिल खरात या पाच लोककलावंतांना राज्यस्तरीय सखा - सुखा वाजंत्री पुरस्काराने मान्यवर निवृत्त परिवहन अधिकारी शिवाजी केरू कदम, निवृत्त मुख्याध्यापक पांडुरंग वाघमारे, राजहंस दूध संघाचे चेअरमन राजेंद्र चकोर, दाढ बुद्रुक विविध कार्यकारी सेवा सोसायटी चेअरमन भाऊसाहेब पाळंदे, बौद्ध महासभेचे प्रचारक संजय कांबळे, बाल भिक्खु यांचे हस्ते रोख रक्कम आणि स्मृतिचिन्ह देवून सन्मानित करण्यात आले.
या प्रसंगी खळी गावचे ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. संजय कांबळे यांनी लोककला,अंधश्रद्धा व बुद्धाची शिकवण या विषयावर प्रवचन दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा.डॉ.रमेश वाघमारे यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्विते साठी संदीप तांबे, शिवाजी वाघमारे, तान्हाजी कदम, राजेंद्र लहानु कदम पुरस्कार समितीचे सर्व सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले.शेवटी अशोक वाघमारे यांनी आभार प्रदर्शन केले.नामशेष होत चाललेल्या या लोककला क्षेत्रातील ग्रामीण कलावंताना प्रेरणा देण्यासाठी सुरु केलेल्या सखा – सुखा सनई वाजंत्री पुरस्कार सुरु केल्या बद्दल शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सुनील गोसावी यांनी संयोजकांना शुभेच्छा दिल्या आहेत.
Post a Comment