हिंदू पंचांगानुसार पौष महिना हा मराठी महिन्यातील दहावा महिना आहे. साधारणतः इंग्रजी महिन्यानुसार डिसेंबर चा शेवटचा आठवडा आणि जानेवारी महिन्यात पौष महिना येतो.
या महिन्यात सूर्य देवाची पूजा केली जाते. पौष महिन्यातील प्रत्येक रविवारी सूर्य देवाची विशेष पूजा केली जाते. दर रविवारी तुळशी समोर एक पाट मानला जातो त्यावर सूर्याचे चित्र रांगोळीने काढले जाते. हळद-कुंकू,तीळ,तांदूळ वाहिले जातात. दूध, साखरेचा किंवा तिळा गुळाच्या लाडूचा नैवेद्य दाखवला जातो.कदाचित या महिन्यात थंडीचे प्रमाण जास्त असते म्हणून सूर्याची उपासना करायला सांगितली असावी. या थंडीच्या दिवसातील सूर्याची किरणे आपले आरोग्य उत्तम राहण्यासाठी चांगली असतात. कोवळ्या सूर्य किरणांपासून मिळणारे "ड" जीवनसत्व आपल्या शरीरासाठी उत्तम असते.
याच महिन्यात शाकंबरी देवीचे नवरात्र असते. शाकंभरी पौर्णिमा उत्सव आणि मकर संक्राती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात दर्शवणारा सण म्हणजे मकर संक्राती. यावेळी सूर्य मकर राशीत प्रवेश करतो. भारतामध्ये विविध ठिकाणी मकर संक्रांत हा सण लोहडी, पोंगल,बिहू या विविध नावाने साजरा केला जातो. मकर संक्राती सण माघ महिन्याच्या सप्तमीपर्यंत म्हणजे रथसप्तमी पर्यंत साजरा केला जातो. या महिन्यात विविध भाज्या उगवलेल्या असतात. त्यामुळे भोगीच्या दिवशी पावटा,घेवडा,चाकवत अशा सोळा भाज्या व ऊस, बोरे एकत्र करून भाजी तयार केली जाते आणि बाजरीच्या भाकरीबरोबर ती खाल्ली जाते. थंडीमुळे शरीरात उष्णता निर्माण होणे गरजेचे असते म्हणून बाजरीची भाकरी खाल्ली जाते. तसेच संक्रांती दिवशी तिळा-गुळाची पोळी केली जाते. सुवासिनी एकमेकींना ओवसतात व वाण देतात.लहानथोर एकमेकांना तिळगूळ देतात. किंक्रांतीच्या दिवशी लहान मुलांना हलव्याचे दागिने घालून बोर न्हाण घातले जाते. तसेच रथसप्तमी पर्यंत हळदी कुंकू केले जाते. तसेच या संक्रातीच्या सणाच्या वेळी काही ठिकाणी पतंग देखील उडविण्याचा आनंद घेतला जातो.
हे सर्व धार्मिक विधी करत असताना देखील काहींच्या मनामध्ये असा समज आहे की पौष महिना हा अशुभ आहे. त्यामुळे या महिन्यात नवीन मुहूर्त काढणे, लग्न, बारसे, वास्तुशांती यांसारखी शुभ कार्ये करण्याचे टाळतात. पौष महिना हा या गोष्टी करण्यासाठी अशुभ महिना मानला जातो. खरेतर याच महिन्यात संक्रांती सारखा गोड सण साजरा होत असताना, इतके सारे धार्मिक कार्य होत असताना देखील काही गैरसमज निर्माण झाले आहेत.शुभ की अशुभ गैरसमज करून न घेता या महिन्यातील उत्सव आपण जितक्या आनंदाने साजरे करतो तितक्याच आनंदाने या महिन्याचे स्वागत केले पाहिजे.
*सौ.मिनल अमोल उनउने*
सातारा - 9130 470 397
*प्रसिद्धी सहयोग*
समता मीडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
Post a Comment