बाबूजी आव्हाड यांच्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रकाशन हा स्तुत्य उपक्रम – डॉ कैलास दौंड

पाथर्डी ( प्रतिनिधी )
'पाथर्डी तालुक्याचे माजी आमदार व थोर स्वातंत्र्यसेनानी स्व. बाबुजी आव्हाड यांना वाचनाची खूप आवड होती. त्यांचे ग्रंथावर विशेष प्रेम होते. वाचनाच्या व्यासंगामुळे बाबुजी विधानसभेत अभ्यासपूर्ण वाणीने अनेक लोकोपयोगी योजना व कामे मंजूर करत असत. विचारक्षमता व भाषिक कौशल्य सुधारण्यासाठी वाचन अत्यंत महत्वाचे आहे हे जाणून बाबुजींनी अखंड वाचन केले. आज बाबुजींच्या जयंतीनिमित्त पुस्तक प्रकाशन होणे ही एक आनंददायी बाब असून दरवर्षी हा उपक्रम राबविला जावा'.असे प्रतिपादन जेष्ठ साहित्यिक व कवी डॉ कैलास दौंड यांनी केले. ते येथील बाबुजी आव्हाड महाविद्यालयात स्व. बाबुजी आव्हाड यांच्या १०५ व्या जयंतीनिमित्त माजी प्राचार्य डॉ जी पी ढाकणे लिखित ‘बिगिनिंग टू यंड’ या इंग्रजी काव्यसंग्रहाच्या प्रकाशन प्रसंगी बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पार्थ विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष व पाथर्डीचे नगराध्यक्ष अभय आव्हाड हे होते तर व्यासपीठावर उपाध्यक्ष एड सुरेशराव आव्हाड, महाराष्ट्र साहित्य परिषदेचे तालुकाध्यक्ष अविनाश मंत्री, विश्वस्थ नंदुशेठ शेळके, सचिव दिलीपराव गर्जे, प्राचार्य डॉ बबन चौरे, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक, सचिव सुनील गोसावी, अध्यक्ष राजेंद्र उदागे, अशोक दौंड, शाहीर भारत गाडेकर, मुख्याध्यापक शरद मेढे आदी उपस्थित होते.
डॉ.दौंड पुढे म्हणाले, स्व बाबुजींनी पाथर्डी तालुक्यातील तळागाळातील जनतेला शिक्षण मिळावे म्हणून पार्थ विद्या प्रसारक मंडळाची स्थापना केली. बाबुजींची तळमळ आत्मिक व आंतरिक होती. समाज शिकला तरच त्याची प्रगती होईल हे बाबुजींनी ओळखले होते. दूरदृष्टीने सुरु केलेल्या शिक्षणसंस्थेमुळे शेजारील मराठवाडा व पाथर्डी तालुक्यामध्ये एक पिढ्याचे अंतर निर्माण झाले. बाबुजींसारखे महान व्यक्तिमत्व क्वचितच जन्मले येते. पाथर्डी तालुक्याच्या सांस्कृतिक व शैक्षणिक जडणघडणीमध्ये बाबुजी आव्हाड महाविद्यालयाने महत्वाचे योगदान दिले असून माजी प्राचार्य डॉ जी पी ढाकणे यांनी आजपर्यंत ६ पुस्तके लिहून साहित्यक्षेत्रात दमदार ठसा उमठविला आहे. मनातील भावना कमीतकमी शब्दात व्यक्त होण्याचे मध्यम म्हणजे कविता असून ती कोणत्याही भाषेत लिहिली तरी व्यक्त होता येते. शब्दगंध साहित्यिक परिषद ग्रामीण भागातील नवलेखकांसाठी हक्काचे व्यासपीठ असून ग्रामीण भागातील साहित्यिक चळवळ जिवंत ठेवण्याचे काम शब्दगंध ने निष्ठेने केले आहे. यावेळी हाजी हुमायून आतार, राजेंद्र देवढे, सुनील गोसावी, अविनाश मंत्री, डॉ जी पी ढाकणे यांनी मनोगत व्यक्त केले. 
याप्रसंगी प्राचार्य डॉ बबन चौरे व डॉ अशोक डोळस संपादित राष्ट्रीय संगोष्ठी पुस्तिकेचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले तसेच म. गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त इतिहास विभागाने घेतलेल्या निबंध स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले.   
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ बबन चौरे, सुत्रसंचालन प्रा शेखर ससाणे व डॉ अशोक कानडे यांनी तर आभार प्रा.शरद मेढे यांनी मानले.

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा