अहमदनगरचं नाव बदलावं, असं काही खरोखरच घडलं आहे का, असा गहन प्रश्न सध्या सर्वसामान्य नगरकरांना पडला आहे. या शहराला आणि जिल्ह्याला आपल्या करणीनं बदनाम करणारे कमी नाहीत, पण त्यांचं नाव बदलण्याऐवजी "अहमदनगर"लाच बद"नाम" करण्याची मागणी कुण्या तिर्हातीनं केली आहे. या शहराची स्थापना ज्या राजानं केली, तो अहमद निजामशहा भला माणूस होता. त्याशिवाय त्यांचं राज्य १४६ वर्षे टिकलं नसतं. हा राजा काही बाहेरच्या देशातून आलेला आक्रमक नव्हता की, त्यानं अन्याय, अत्याचार करत इथल्या जनतेला वेठीला धरलं नव्हतं. मराठी मातीत, अतिशय सभ्य आणि सुसंस्कृत दशग्रंथी कुलकर्णी घराण्यात त्याचा जन्म झाला होता. अहमदशहानं स्थापन केलेलं "अहमदनगर" केवळ एक शहर किंवा जिल्ह्यापुरतं मर्यादित राहिलं नव्हतं. आजच्या महाराष्ट्राचा दोन-तृतियांश भूभाग एकेकाळी निजामशाहीत होता, ज्याची सूत्रं किमान शंभर वर्षे अहमदनगरमधून हलवली जात होती. सोळावं शतक घडवलं ते अहमदनगरनं! त्याकाळी जगातील सुंदर आणि प्रगत असलेल्या कैरो, बगदादशी अहमदनगरची तुलना केली जात असे ती उगाच नाही. स्वाभिमान राखत बहमनी राजवटीचं जू झुगारून देत स्वतंत्र झालेल्या अहमदशहानं सन १४९० मध्ये गनिमी कावा वापरून या भूमीवर लढली गेलेली "जंग ए बाग" लढाई जिंकली. हा विजय अहमदनगरच्या स्थापनेची मुहूर्तमेढ ठरला. या परिसरात भिंगार गाव आधीपासून होतं. अहमदशहानं त्याचं नाव बदललं नाही. इथल्या मातीचं सत्व जाणून घेत भौगोलिक णवैशिष्ट्य, सुरक्षितता, दळणवळण, उत्तम हवा आणि पाणी, लष्करी महत्त्व असं सगळं विचारात घेत अहमदशहानं इथं आपली राजधानी वसवली.
अहमदनगर हे एकेकाळी तलावांचं आणि उद्यानाचं शहर होतं. इथं मुलूख मैदानसारख्या अजस्र तोफा तयार होत, उत्तम दर्जाचं सुती कापड विणलं होत असे. हजारो हातांना काम मिळालं, सन्मान मिळाला म्हणूनच जगभरातली विविध जाती, धर्माची कुशल मंडळी इथं आली.
अहमदशहानं कुणावर अन्याय केल्याचं एकही उदाहरण नाही. उलट शत्रूच्या स्रियांचाही त्यानं सन्मान केला. लढाईत पळपुटेपणा करणार्यांना राजा शिक्षा न करता त्यांचा सन्मान करायचा. (पुढच्या लढाईत हे "पळपुटे" आपल्या राजासाठी प्राण द्यायला मागेपुढे पहात नसत.) अहमदशहा यांच्या काळात बांधण्यात आलेला सीनानदी काठचा बागरोजा, "आठवं नंदनवन" म्हणून ओळखली जाणारी हश्त बिहिश्त बाग आणि या राज्याच्या स्थापनेचा साक्षीदार असलेला अभेद्य भुईकोट किल्ला इथल्या राजाच्या कर्तृत्वाचा साक्षीदार आहे. आपलं नाव या सुंदर शहराला द्यावं, असा आग्रह या संस्थापकानं कधी धरला नव्हता की, कुठल्या वास्तूवर त्यानं आपलं नाव कोरून ठेवलं नाही. मेल्यानंतरही हा राजा इथल्या मातीतच मिसळला! बागरोजातील कबरीवरही त्याचं नाव नाही. अशा राजाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्याऐवजी त्याचं नाव पुसण्याचा प्रयत्न काही महाभाग करत आहेत, यासारखं दुर्दैव दुसरं नाही...
पुण्यश्लोक अहल्यादेवी होळकरांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील चोंडी गावात झाला, हे अनेक वर्षे शासनाला आणि पुढार्यांनाही ठाऊक नव्हतं! कधी हे गाव बीड जिल्ह्यात, तर कधी औरंगाबाद जिल्ह्यात असल्याचं छापलं जायचं. चोंडीत कोट्यवधींची विकासकामं झाली, तरी पुण्यश्लोक अहल्यादेवींच्या या जन्मस्थळाची माहिती देणारा सचित्र फलक अहमदनगर, जामखेड किंवा अन्य कुठल्या बसस्थानकावर, रेल्वेस्थानकावर लावायला पैसे उपलब्ध झाले नाहीत. अहल्यादेवींचं लोकोत्तर कार्य सर्वांपर्यंत पोहोचवायचं असेल, तर लोकांनी चोंडीत यायला हवं. त्यांची पिण्याच्या पाण्याची, राहण्याची, भोजनाची आणि स्थलदर्शनासाठी टुरिस्ट गाईडची व्यवस्था करायला हवी. अहल्यादेवींचं चरित्र अल्प किंमतीत पर्यटकांना मिळायला हवं. इंदूर-चोंडी नियमित बससेवा सुरू करायला हवी. अहल्यादेवींनी आपल्या पैशांतून जनतेच्या हिताची कामं केली. स्त्रियांना आत्मसन्मान मिळवून दिला. त्यांचे हे विचार आपण कृतीत आणायला हवेत. अहमदनगरचं नाव बदलण्यापेक्षा हे खूप गरजेचं आहे. लोकभावनेचं राजकारण करून स्वार्थ साधणं जेव्हा थांबेल, समाजात दुही माजवणार्या गोष्टी टाळता येतील,
तेव्हाचं पुण्यश्लोक अहल्यादेवींचं नाव घ्यायचा आपल्याला हक्क असेल, हे लक्षात ठेवा....
भूषण देशमुख
Post a Comment