▫️मख़दुम समाचार▫️
श्रीरामपुर (प्रतिनिधी) २७.४.२०२३
जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या शाळा चांगले काम करीत आहेत. त्यातही उर्दू शाळांचे काम चांगल्या प्रकारे सुरू आहे. उर्दू शाळेतील शिक्षक जो तो आपले कामाशी काम करतात. मी ज्या ज्या ठिकाणी भेटी दिल्या, त्या ठिकाणी उर्दू शाळांच्या मुलांमध्ये चांगली प्रगती दिसून आली. इंग्रजीच्या बाबतीत तिसरी चौथीच्या उर्दू विद्यार्थ्यांचे इंग्रजी वाचन मराठी माध्यमापेक्षा चांगले आहे.मी ज्या ज्या उर्दू शाळांना भेटी दिल्या तेथील विद्यार्थ्यांचे अंक ज्ञान, संख्या ज्ञान हे सुद्धा उत्कृष्ट आहे. उर्दू शाळांनी आता शिष्यवृत्ती परीक्षेकडेही लक्ष द्यावे असे गौरवोद्गार जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाचे शिक्षणाधिकारी भास्करराव पाटील यांनी काढले.भानसहिवरे उर्दू शाळेमध्ये शाळा पूर्व तयारी मेळावा व शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीन आयुब पटेल यांच्या सेवानिवृत्ती समारंभ प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून भास्करराव पाटील बोलत होते. यावेळी सभापती जौजारे अध्यक्षस्थानी होते. तालुक्याचे प्रभारी गट शिक्षणाधिकारी शिवाजी कराड व इतर मान्यवर मंचावर उपस्थित होते. शिक्षणाधिकारी पाटील पुढे म्हणाले की जिल्ह्यामध्ये शिष्यवृत्तीच्या बाबतीत शाळांची प्रगती समाधानकारक आहे. आपल्या जिल्ह्यासाठी गुणवत्ता शिष्यवृत्तीचे सहाशे संच मान्य आहेत आणि पुढील वर्षी या सर्व ठिकाणी जिल्हा परिषद शाळेचे विद्यार्थी दिसले पाहिजे, असा आमचा प्रयत्न आहे. जिल्हा परिषदेच्या शाळा आता खाजगी शाळांशी स्पर्धा करू लागल्या आहेत. त्यामुळेच गेल्या वर्षी जिल्ह्यातील इंग्रजी माध्यमातून पंधरा हजार विद्यार्थी मराठी माध्यमात दाखल झाले. यावर्षी ते उद्दिष्ट तीस हजारचे आहे.जिल्हा परिषद शाळांची गुणवत्ता सुधारल्यामुळे आता जिल्हा परिषद शिक्षकांची मुले सुद्धा त्यांच्याजवळ शिकत आहेत. ही एक चांगली बाब आहे असेही ते म्हणाले.
उर्दू शाळेच्या मुख्याध्यापिका शाहीन अयुब पटेल यांनी अतिशय कष्टपूर्वक काम करून आपल्या कार्याचा ठसा उमटवला. श्रीरामपूर नगरपालिका, बेलापूर, भातोडी इत्यादी ठिकाणी त्यांनी अतिशय चांगले काम केले. त्यामुळे त्या समाधानाने निवृत्त होत आहेत असे गौरव उद्गार याप्रसंगी पाहुण्यांनी काढले. शाळा व्यवस्थापन समिती व गावकऱ्यांतर्फे श्रीमती पटेल यांचा सत्कार करण्यात आला. नेवासा तालुक्यातील ज्या शिक्षकांच्या बदल्या झाल्या आहेत त्या उर्दू शिक्षकांचा देखील सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
यावेळी शिक्षण अधिकारी भास्करराव पाटील यांनी ऊर्दू शाळेच्या परसबागेची पाहणी केली व तेथे असलेल्या विविध रोपे व झाडां बद्दल समाधान व्यक्त करून शिक्षकांचे अभिनंदन केले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन फैयाज शेख यांनी केले तर आभार शकील खान यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी हनीफ शेख, शमजा बागवान, फरहाना पटेल, हसीना शेख, फौजिया पठाण, नाजिया शेख यांच्यासह तालुक्यातील उर्दू शिक्षकांनी परिश्रम घेतले.
Post a Comment