▫️मख़दुम समाचार▫️
अहमदनगर (प्रतिनिधी) २७.४.२०२३
येथील बोल्हेगाव स्पोर्टस क्लबसह नागापुर, एमआयडीसी, बोल्हेगाव परिसर नागरिक यांनी काल दि. २६ रोजी महानगरपालिका महापौर रोहिणी संजय शेंडगे आणि आयुक्त डॉ. पंकज जावळे यांची भेट घेऊन 'छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान' वाचविण्याची लेखी विनंती केली. प्रत्यक्ष भैेटून केलेल्या मागणीत म्हटले आहे की, बोल्हेगाव, नागापुर, एमआयडीसी या परिसरातील खेळाडू व नागरिक अनेक वर्षांपासून वापरात असलेले 'छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान' या जमिनीच्या आरक्षणात बदल करून हे मैदान खेळासाठीच राखीव ठेवून छोटे क्रीडासंकुल तयार करण्यासाठी आरक्षण बदलाचा एमआरटीपी १९६६ चे कलम ३७ चा तात्काळ ठराव मंजूर करावा.
महानगरपालिका हद्दीतील मौजे बोल्हेगाव येथील गोरक्षनाथ मंदिरासमोरील स.नं. ७५/३, ७५/४अ आणि ७५/४ब यामधे अहमदनगर महानगरपालिकेने काही जागा आरक्षित ठेवलेली आहे. त्यामधे आरक्षण क्रमांक ३१ हे भाजीबाजार, शॉपिंग सेंटर आणि बहुद्देशीय सभागृह असे अंदाजे ९७ गुंठे जमिनीवर आहे. या जागेवर गेल्या २५/३० वर्षांपासून परिसरातील खेळाडू, विद्यार्थी अनेक प्रकारचे खेळ खेळत आहेत. येथे अनेक राज्य व जिल्हा पातळीवरील क्रिडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अनेक क्रिकेट टुर्नामेंट येथे झालेल्या आहेत. या खेळाच्या मैदानास 'छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान' असे संबोधन्यात येते. येथे रोज १०० पर्यंत लोक रोज सकाळ संध्याकाळ विविध खेळ खेळत असतात. ज्येष्ठ नागरिक येथे मॉर्निंग व इव्हिनींग वॉकला येत असतात. हि जागा अनेक वर्षांपासून पडीक असून क्रीडामैदान म्हणूनच हिचा वापर होत आहे. संबंधित ७/१२ वरही हिची नोंद पडीक अशीच आहे.
बोल्हेगाव, नागापुर, एमआयडीसी या परिसरात खेळाचे मैदान नाही. या परिसरात अंदाजे ३०/३५ हजार लोक रहातात. एवढ्या मोठ्या लोकसंख्येसाठी हे मैदान गरजेचे आहे. येथे भाजीबाजार नव्हे तर 'छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा मैदान'च गरजेचे आहे. या मैदानाच्या विकासावर परिसरातील क्रीडाप्रेमींनी लाखो रूपये खर्च केलेला आहे.
मागणी करण्यात आली की, मौजे बोल्हेगाव येथील गोरक्षनाथ मंदिरासमोरील स.नं. ७५/३, ७५/४अ आणि ७५/४ब यामधे अहमदनगर महानगरपालिकेचे आरक्षण क्रमांक ३१ याच्या विद्यमान आरक्षणात बदल करून संपुर्ण आरक्षण हे खेळाचे मैदान म्हणून राखीव ठेवणे. येथे छोटे क्रीडा संकुल तयार करणे. त्यासाठी करावा लागणार एमआरटीपी १९६६ चे कलम ३७ चा ठराव येत्या महासभेत घेऊन तात्काळ मंजूर करणे तसेच या आरक्षित जागेवर नगररचना विभागाकडून कार्यवाही सुरू असल्यास ती तात्काळ रद्द करणे. हि मागणी परिसरातील ३०/३५ हजार लोकसंख्येच्या वतीने करण्यात आली.
यावेळी नागरिसुविधेच्या मागणीकडे दूर्लक्ष केल्यास आपल्या कार्यालयामधे लोकशाही पध्दतीने आंदोलन करण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.
सकारात्मक कारवाईसाठी या मागणीच्या प्रती मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी, नगररचनाकार, सभापती, स्थायी समिती, सभागृहनेते, विरोधी पक्षनेता व जिल्हा क्रीडाधिकारी यांना देण्यात आल्या.
यावेळी बोल्हेगाव स्पोर्ट्स क्लब अध्यक्ष भाऊ कापडे, नवनाथ कोलते, यशवंत परदेशी, राजू शेख, अंबादास शिंदे, अतुल देठे, रोहित वाकळे, सागर कोलते, तुषार सोनवणे, सावळाराम कापडे, अरुण थिटे, अनिल अव्हाड, धर्मा पांडे, आकाश कोलते, शादाब पटेल, दीपक खरात, शाम त्रिंबके, ओम पवार, वैभव आंधळे, देवा सातोटे, विजय बनकर, समीर शेख यांच्यासह परिसरातील अनेक क्रीडाप्रेमी नागरिक उपस्थित होते.
Post a Comment