मख़दुम समाचार
मुंबई (प्रतिनिधी) २४.६.२०२३
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आचार्य अत्रे स्मृती पुरस्कार देऊन ज्येष्ठ पत्रकार वसंत भोसले यांचा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते गौरव करण्यात आला. यशवंतराव चव्हाण सेंटरमधे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. दरवर्षी मराठी पत्रकार परिषदेतर्फे विविध मान्यवरांच्या स्मृती निमित्त पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये जीवनगौरव पुरस्कार, आद्य संपादक पत्रकार बाळशास्त्री जांभेकर स्मृती पुरस्काराने ज्येष्ठ पत्रकार तथा संपादक यांचा गौरव केला जातो.
यावर्षी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ जोशी यांना जीवनगौरव पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. तसेच आचार्य प्र. के. अत्रे स्मृती पुरस्कार देऊन महाराष्ट्रातील ज्येष्ठ पत्रकार तथा संपादकाचा सत्कार केला जातो. यावर्षी मराठी पत्रकार परिषदेने वसंत भोसले यांची निवड केली. याबद्दल भोसले यांनी परिषदेच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे आभारी मानले. केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते मुंबईच्या नरिमन पॉईंट परिसरातील यशवंतराव चव्हाण सेंटरच्या सभागृहात झालेल्या कार्यक्रमात हा गौरव करण्यात आला. कार्यक्रमास अनेक पत्रकार, लेखक, सामाजिक आणि राजकीय कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Post a Comment