(Image - Chandrakala Kadam, Mumbai)
◽ मख़दुम समाचार ◽
मुंबई (गुरूदत्त वाकदेकर) २१.६.२०२३
दिवंगत प्रसिध्द गायिका भारतरत्न लता मंगेशकर यांच्या तैलचित्राचे 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृहात अनावरण करण्यात येणार आहे. त्यांच्या भगिनी ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते उद्या गुरुवारी दि. २२ जून रोजी सायंकाळी ६ वाजता अनावरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हे तैलचित्र ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कुमार कदम यांनी तयार केले आहे.
अधिक माहिती देताना श्री शिवाजी मंदिर ट्रस्टचे विश्वस्त ज्ञानेश महाराव यांनी सांगितले की,
'भारतरत्न' लता मंगेशकर या सर्वश्रेष्ठ गायिका होत्या ; तशा नाट्यरसिकही होत्या. त्यांनी तरुणपणी नाटकात कामही केले आहे. नाटक पाहण्याच्या आणि कार्यक्रमाच्या निमित्ताने लता मंगेशकर अनेकदा दादर येथील 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृहात
आल्या आहेत. त्याची आठवण जागती राहावी, यासाठी 'श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट'च्या नियामक मंडळाने नाट्यगृहाच्या इमारतीत मुख्य जागी लता मंगेशकर यांच्या तैलचित्राची तसबीर लावण्याचा निर्णय घेतला आहे.
त्यानुसार या तसबीरीचे अनावरण ज्येष्ठ गायिका उषाताई मंगेशकर यांच्या हस्ते गुरुवार, २२ जून रोजी संध्याकाळी ६ वाजता 'श्री शिवाजी मंदिर' नाट्यगृहात होणाऱ्या 'मराठी नाट्य व्यावसायिक संघ'च्या ५४ व्या वर्धापन दिन सोहळ्यात होत आहे. लता मंगेशकर यांचे तैलचित्र ज्येष्ठ चित्रकार चंद्रकला कदम यांनी चितारले आहे.
याचवेळी नटश्रेष्ठ गोपीनाथ सावकार यांच्या तैलचित्राचे अनावरण ज्येष्ठ अभिनेते अशोक सराफ यांच्या हस्ते होणार आहे. यानंतर 'श्री शिवाजी मंदिर ट्रस्ट' यांच्या सहयोगाने 'मराठी नाट्य व्यावसायिक निर्माता संघ' मुंबई ह्या संस्थेच्या ५४ व्या वर्धापन दिनानिमित्त 'नाट्यमल्हार' हा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. या आनंद सोहळ्याला रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन 'श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ट्रस्ट'चे सरचिटणीस अण्णासाहेब सावंत यांनी केले आहे.
Post a Comment