मख़दूम समाचार
पुणे (प्रतिनिधी) ५.८.२०२३
येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) मध्ये गुरुवारी ता.३ रोजी क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या जयंतीनिमित्त प्रतिमेस श्रीमती इंदिरा अस्वार, निबंधक बार्टी, विभागप्रमुख अनिल कारंडे, वृषाली शिंदे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
संशोधन विभागाचे प्रकल्प व्यवस्थापक डॉ. प्रेम हनवते यांनी क्रांतिसिंह नाना पाटील यांचा स्वातंत्र्यलढ्यातील सहभाग तसेच त्यांच्या जीवनातील अनेक आठवणींना उजाळा दिला. उमरखेड तालुक्यातील पळशी या गावी १९५४ साली काळूरामजी देशमुख यांनी आयोजित केलेल्या तीन दिवशीय किसान सभेच्या अधिवेशनासाठी क्रांतिसिंह नाना पाटील, लोकशाहीर अण्णा भाऊ साठे, शाहीर अमर शेख आदी मान्यवर आले असल्याच्या आठवणी त्यांनी सांगितल्या. आपल्या अभ्यासपूर्ण भाषणातून क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या कार्याला उजाळा दिला.
यावेळी कार्यालय अधिक्षक प्रज्ञा मोहिते यांनी नाना पाटील यांनी प्रतीसरकारची स्थापना करून इंग्रज सरकार विरुद्ध उभारलेल्या लढ्याची माहिती दिली.
यावेळी विभागप्रमुख रविन्द्र कदम, राजेंद्र बरकडे, डॉ. संध्या नारखेडे, प्रज्ञा मोहिते, सचिन जगदाळे यांच्यासह बार्टी संस्थेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रामदास लोखंडे प्रकाशन व प्रसिद्धी विभाग यांनी केले. आभार सुनंदा गायकवाड, प्रकल्प अधिकारी प्रकाशन व प्रसिद्धी विभाग यांनी मानले.
Post a Comment