अहमदनगर शहरातील कला संस्कृती जोपासण्याचे आणि संगीत क्षेत्रात नाव झळकवण्याची क्षमता इथल्या गायक,वादक कलाकारांमध्ये आहे, ऋणानुबंध परिवार सामाजिक जाणिवा जपत याच वाटेवर वाटचाल करत आहे असे प्रतिपादन रसिक ग्रुपचे जयंत येलुलकर यांनी केले.
ऋणानुबंध परिवारातर्फे आयोजित रिमझिम गिरे सावन संगीत मैफिल तसेच नगरमधील अकरा कलाकारांच्या सन्मान सोहळयात प्रमुख पाहुणे म्हणुन येलुलकर बोलत होते.
ऋणानुबंध च्या गायक कलाकारांनी या कार्यक्रमात अत्यंत सुरेख अशी पावसाची गाणी सादर केली. रिमझिम गिरे सावन या गीताने कार्यक्रमाची सुरवात झाली. चारुता शिवकुमार यांच्या अतिशय नेटक्या सुत्रसंचालनामुळे कार्यक्रमास रंगत आली.या कार्यक्रमात सारिका रघुवंशी, दुर्गा हुरे, वंदना जंगम, प्रशांत बंडगर,चारुदत्त ससाणे,महेश घावटे,डॉ. विवेकानंद कंगे, डॉ. शैलेंद्र खंडागळे, डॉ. गोपाळ बहुरुपी, अजय आदमाने, अजित रोकडे यांनी सुंदर आवाजात गीते सादर केली.
याच कार्यक्रमात नगरमधील नावाजलेल्या कलाकरांचा सन्मान करण्यात आला. या कलाकारांमध्ये सुहासभाई मुळे, अमीन धाराणी, वाजीद खान, संदीप भुसे,अजय दगडे, जुबेर शेख, बबलु पतके, युनुस तांबटकर,प्रख्यात वादक दिलावरभाई, ललित भुमकर, अजित गुंदेचा यांचा नगरमधील संगीत क्षेत्रातील त्यांच्या योगदानाबद्दल जयंत येलुलकर आणि पवन नाईक यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.
या प्रसंगी बोलतांना जागतिक दर्जाचे ख्यातनाम गायक पवन नाईक म्हणाले की,संगीत सप्तसुराप्रमाणे ऋणानुबंध परिवारातील सदस्यांचा सुरेख सरगम तयार झाला आहे. भविष्यात ऋणानुबंधच्या कार्याची सरगम अशीच वाढती राहणार आहे.
डॉ. गोपाळ बहुरुपी यांनी संगीताचा आरोग्यावर अत्यंत सकारात्मक परिणाम होत असल्याचे सांगितले. तसेच सामाजिक कार्य करताना जी देण्याची भावना मनात तयार होते त्यामुळे शरिरात काही संप्रेरके तयार होतात त्यामुळे मन प्रसंन्न राहते आणि शरिरातील प्रतिकारक्षमता वाढण्यास मदत होते असे नमुद केले.
ऋणानुबंध परिवाराच्या विविध सामाजिक उपक्रमांबद्दल बोलताना ऋणानुबंध चे अध्यक्ष अजित रोकडे यांनी सांगितले की समाजातील उपेक्षित पण चांगले काम करणाऱ्या घटकांचा सन्मान करुन प्रोत्साहित करण्याचे काम ऋणानुबंध नेहमीच करत आला आहे. संगीताच्या विविध कार्यक्रमांबरोबरच वृध्दाश्रमांना, बालघर प्रकल्पाला भेटी देणे, विविधि जीवनावश्यक वस्तु पुरवणे, निसर्ग संवर्धन इत्यादी उपक्रमांबद्दल रोकडे यांनी माहिती दिली.संस्थेचे सचिव प्रशांत बंडगर यांनी आजच्या कार्यक्रमा मागची भुमिका विषद केली. नगरमधील ज्या कलाकारांमुळे अनेक कलाकर निर्माण झाले आणि नगरच्या रसिकांना दर्जेदार सांगीतीक मेजवानी सादर केल्या त्या कलाकारांचा सन्मान करणे ऋणानुबंध परिवाराच्या दृष्टीने अभिमानाची गोष्ट आहे. याच कार्यक्रमात ऋणानुबंध ने आयोजित केलेल्या निबंध स्पर्धेतील नैपुण्य मिळवलेल्या मुलांना बक्षिस वितरण ही करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी डॉ. विवेकानंद कंगे यांनी प्रमुख पाहुणे व उपस्थितांचे आभार मानले. या कार्यक्रमास नागरिकांनी मोठी गर्दी केली होती.
Post a Comment