सत्यप्रतिज्ञेवर आपल्या निदर्शनाला आणून देत आहे की सध्या निवडणुका जवळ आल्यामुळे मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध आमिषांचे वारे वाहू लागले आहेत.
मुंबई पुण्यासारख्या ठिकाणी सुद्धा संपूर्ण रेल्वेच्या रेल्वे तिरुपती वगैरे मोफत यात्रेसाठी दरवेळी बुक केली जाते, त्यावेळेस आपला निवडणूक आयोग डोळ्यावर पट्टी बांधून बसलेला असतो काय?
त्याच अमिषांचा एक भाग म्हणून सध्या आमच्या प्रचंड दुर्गंधीयुक्त, कचरायुक्त, खड्डेयुक्त अहमदनगर शहरात लाखो नव्हे तर करोडो रुपयांची उधळपट्टी करून रोज शेकडो लक्झरी बसेस बुक करून सर्वात दुर्बल समजल्या जाणाऱ्या महिला वर्गाला मोफत शनिशिंगणापूर शिर्डी दर्शन व मोफत जेवण चहापाणी नाश्ता असा चाॅकलेट देण्याचा प्रकार प्रत्येक प्रभागांमध्ये आजी-माजी आणि इच्छुक बांडगुळी उमेदवारांकडून चालू आहे.
रोज सकाळी प्रत्येक प्रभागांमध्ये पाच, दहा बसेस येऊन उभ्या राहतात, प्रत्येकाच्या गळ्यात विशिष्ट पक्षाचा पंचा घातला जातो, आणि मोफत गोष्टींना सोकावलेला आपला मूर्ख मतदार या अमिषाला भुलून लगबगीने सजून धजून नट्टापट्टा करून, गजरे घालून त्या पक्षाच्या जयजयकाराच्या घोषणा देऊन बस मध्ये जाऊन बसतात.
हे केविलवाणे दृश्य रोज दिसू लागले आहे, हे चालू असताना त्या प्रभागातील आजी-माजी आणि इच्छुक बांडगुळ जी आहेत ती फोटोसेशन करून ते वरिष्ठां पर्यंत कसे पोहोचले जातील? आणि आपणच कसे लायक उमेदवार आहोत? हे कसे सिद्ध होईल याचा आटापिटा करत असतात. इतर वेळेस ही बांडगुळे आपल्या प्रभागात तुंबलेल्या गटारी खड्ड्यांची मालिका याबाबत असा पुढाकारही घेत नाही.
सत्ता माणसाला आंधळी शक्ती तरी देते किंवा डोळस षंढपणा तरी देते असं म्हणतात ते बरोबरच आहे.
अशाप्रकारे या मोफत शनिशिंगणापूर शिर्डी यात्रेला दररोज लाखो रुपयांची उधळपट्टी चालू आहे, याचे छुपे प्रायोजक नेमके कोण आहेत ?त्यांच्याकडे हा पैसा कुठून आला? याची आपले शासन चौकशी करणार का? कारण एखाद्या सामान्य माणसाने त्याच्या अधिकृत बँकेच्या अकाउंट मध्ये एखाद्या दिवशी एक लाख रुपये जरी रोख भरले, तरी त्याला अनेक प्रश्नांना उत्तर द्यावे लागतात.. की हे एक लाख रुपये रोख कुठून आणले? कसे आणले? कशासाठी आणले?
तर मग मोफत यात्रांवर एवढ्या मोठ्या प्रमाणात होणारा हा खर्च कोण करतो? कशासाठी करतो ?आणि हे पैसे त्याने कोठून आणले? ते दाखवले गेलेले आहेत की नाही? याची चौकशी होऊ शकत नाही काय? आणि मुख्य म्हणजे जेव्हा विशिष्ट पक्षाचे पंचे घालून, या गोष्टी केल्या जातात तेव्हा त्या पक्षांच्या बाबत आचारसंहिता व निवडणूक आयोगाचे नियम लागू होत नाहीत काय?
वास्तविक ही लाखो रुपयांची उधळपट्टी असे अमिषे दाखवण्यासाठी करण्याऐवजी या आमच्या शहरांमध्ये गाढवाचा नांगर फिरल्यासारखी अवस्था आहे, सगळीकडे खड्डेच खड्डे आहेत गटारीच गटारी तुंबलेल्या आहेत ,सुदैवाने वरूण राजालादेखील नगरवासियांची किव आली असेल, म्हणून तो अजून तरी एकदाही जोरदार बरसलेला नाही, अन्यथा नगर शहर हे घाणेरडे दुर्गंधीने खड्डे भरलेले डबके, असेच त्याचे स्वरूप आहे, तर या राजकीय पक्षांनी आणि त्यांच्या आजी-माजी आणि इच्छुक बांडगुळांनी आणि त्यांना मॉनिटर करणाऱ्या धनदांडग्या लोकप्रतिनिधींनी असेच प्रायोजक मिळवून गटारी, रस्ते, खड्डे कधी का नाही दुरुस्त केले?
खरे म्हणजे त्यांनी आता अशाच प्रकारच्या बसेस ची व्यवस्था करून नगरवासियांसाठी खड्डे युक्त गटारछाप नगर दर्शन ची ट्रीप मोफत आयोजित करावी म्हणजे दोन हजार रुपयांच्या नोटेला किंवा अशा फुकट यात्रेला बळी पडणाऱ्या काही मूर्ख मतदारांला हे समजेल की आपण नेहमीच किती नालायक उमेदवारांना निवडून देतो.. ज्यांना ५ वर्षं आपल्या प्रभागातले खड्डे गटारी रस्ते काहीही दिसत नाही ,फक्त शेवटचे काही दिवस येऊन दोन हजाराची नोट देऊन जातात किंवा असं काहीतरी फुकट अमिष देऊन जातात.. आपण त्यांना पाच वर्ष अंगावर घेतो. या बसेस कोणाच्या नावे बुक केल्या गेल्या? त्यांना पेमेंट कोणी केले ? त्याच्याकडे हा पैसा कुठून आला? तो त्यांनी अधिकृत दाखवलेला आहे काय? आणि अशा प्रकारचे अमिषां मुळे निवडणुकी वर त्याचा परिणाम होणार नाही का? नेहमीप्रमाणेच निष्क्रिय व नालायक उमेदवार निवडून येऊन लोकशाहीचा खून होणार नाही काय? याचा साधक बाधक विचार करणे हे निवडणूक आयोगाचे काम आहे असे वाटते, परंतु निवडणूक आयोग देखील जर सरकारच्या हातातला बाहुली असेल तर या देशाची लोकशाही ब्रह्मदेव देखील वाचवू शकणार नाही.
हे प्रकार आम्ही आपल्या निदर्शनाला आणून दिल्यानंतर तरी निवडणूक आयोगाने काही ठोस पावले उचललेली दिसली नाही तर आम्हाला नाईलाजाने सर्वोच्च न्यायालयामध्ये सर्व पुराव्यांसह या हेतू पुरस्सर केलेल्या कर्तव्य कसुराबाबत निवडणूक आयोगाच्याच विरोधात दाद मागावी लागेल याची नोंद घ्यावी.
आपणास याचे ठोस पुरावे हवे असतील तर फोटो व्हिडिओ शूटिंग सह, सर्व प्रभागातले पुरावे उपलब्ध आहेत, आपण कार्यवाहीची इच्छाशक्ती दाखवल्यास ते उपलब्ध करून दिले जातील.
या प्रकारांना तातडीने आक्षेप घेऊन निर्बंध घालावा. व संबंधितावर कारवाई करावी.
-सुहासभाई मुळे
अध्यक्ष
जागरूक नागरिक मंच अहमदनगर जिल्हा
9823722212
Post a Comment