विश्व संवाद केंद्र,पुणे आणि डेक्कन एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी देण्यात येणारा मानाचा, आद्य पत्रकार 'देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्कार' यंदा ज्येष्ठ पत्रकार तथा दिव्य मराठीचे अहमदनगर आवृत्तीचे ब्यूरो चीफ अनिरुद्ध देवचक्के यांना जाहीर झाला आहे.
पुरस्काराचे वितरण शनिवारी (दि. १९) सकाळी १०.३० वाजता होणार आहे. भारतीय जनता पक्षाचे राष्ट्रीय प्रवक्ते, माध्यमांचे अभ्यासक आणि प्रखर राष्ट्रवादी विचारक शहजाद पूनावाला यांच्या हस्ते फर्ग्युसन महाविद्यालयाच्या अॅम्फी थिएटरमध्ये एका विशेष समारंभात पुरस्कार वितरण होणार आहे, अशी माहिती विश्व संवाद केंद्राचे अध्यक्ष अभय कुलकर्णी आणि डेक्कन एज्यूकेशन सोसायटीचे नियामक मंडळाचे उपाध्यक्ष डॉ. रवींद्र आचार्य यांनी दिली. याप्रसंगी डेक्कन एज्युकेशन सोसायटीचे नियामक मंडळ परिषद सदस्य मिलिंद कांबळे उपस्थित होते.
अभय कुलकर्णी पुढे म्हणाले की, या पुरस्कार उपक्रमाचे हे १२ वे वर्ष असून देवर्षी नारद यांच्या नावे हे पुरस्कार दरवर्षी देण्यात येतात. पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या चार पत्रकारांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात येतो. पुरस्काराचे स्वरूप ज्येष्ठ पत्रकार यांना २१ हजार रुपये तर अन्य तीन पुरस्कार ११ हजार रुपये रोख व स्मृतिचिन्ह असे राहील. यंदाच्या ज्येष्ठ पत्रकार पुरस्कार नगरचे दिव्यमराठीचे ब्युरो चीफ अनिरुद्ध देवचक्के यांची तर अन्य तीन पुरस्कारासाठी अरुण मेहेत्रे, सुषमा नेहरकर, आशुतोष मुगळीकर यांची निवड झाली आहे.
यापूर्वी हा पुरस्कार ’ए बी पी माझा’चे संपादक राजीव खांडेकर, ’झी२४ तास’चे डॉ. उदय निरगुडकर, ’तरुण भारत’ बेळगावचे संपादक किरण ठाकूर, ’दिव्य मराठी’चे संपादक प्रशांत दीक्षित, ’महाराष्ट्र टाईम्स’चे संपादक पराग करंदीकर, ’लोकसत्ता’ पुण्याचे निवासी संपादक मुकुंद संगोराम, ज्येष्ठ पत्रकार कै. दिलीप धारूरकर, ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर ’आज का आनंद’चे संपादक श्याम अग्रवाल,ज्येष्ठ पत्रकार अभिजित अत्रे, नाशिकच्या देशदूतच्या संपादक वैशाली बालाजीवाले आदींना देण्यात आले आहेत, अशी माहिती त्यांनी दिली.
ज्येष्ठ पत्रकार अनिरुध्द देवचक्के हे गेल्या ३० वर्षापासून पत्रकारिता क्षेत्रात कार्यरत आहेत. ते सध्या अहमदनगर दिव्य मराठीत ब्युरो चीफ पदावर कार्यरत असून यापूर्वी गांवकरी, पुढारी या वर्तमानपत्रांचे अहमदनगर आवृत्ती प्रमुख म्हणून त्यांनी काम केले आहे. जिल्हा व राज्यस्तरीय प्रासंगिक राजकीय विश्लेषणात त्यांचा हातखंडा आहे. दै. पुढारीमध्ये दर सोमवारी 'मर्मभेद', गांवकरीच्या' रविवार विशेष' या पुरवणीतून दर रविवारी 'राज-का-रण' हे सदर खूपच गाजले. राजकीय, सामाजिक, औद्योगिक आणि इतरही सर्वच क्षेत्राबद्दल त्यांनी अभ्यासपूर्ण लेखन केले आहे.
जिल्ह्यातील स्वातंत्र्य सैनिक स्व. अच्युतराव पटवर्धन यांच्या जीवनावरील 'स्व. अच्युतराव पटवर्धन: अनुपम जीवनाची समर्पित गाथा' हे त्यांचे पुस्तक प्रकाशित आहे. अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रकाशित 'परिवर्तन' या ग्रंथात बँक स्थापनेपूर्वीच्या ५० वर्षांच्या ऐतिहासिक कालखंडाचा विस्तृत आढावा घेणारा अभ्यासपूर्ण शोधनिबंधाचा समावेश आहे.तसेच नगर जिल्ह्याच्या विविधांगी राजकारणातील असंख्य बारकाव्यां सह १९९२ ते २०१४ या २० वर्षांच्या काळातील विविध राजकीय विश्लेषणांचे दोन संदर्भ ग्रंथ 'राज-का-रण १' व 'राज-का-रण २' सध्या प्रकाशनाच्या वाटेवर आहेत.
श्री. अनिरुध्द देवचक्के यांना यापूर्वी 2002 मध्ये ऐतिहासिक वस्तु संग्रहालयाच्या 'पंडीत वा. द. कस्तुरे पत्रकारिता पुरस्कार २००२' आणि ज्येष्ठ नेते सहकार महर्षी शिवाजीराव (बापू ) नागवडे प्रतिष्ठान तर्फे दिला जाणार्या उत्कृष्ट पत्रकारिता गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
गावकरीच्या उत्कृष्ठ वार्तापत्र पुरस्कारानेही ते सन्मानित आहेत.
महाराष्ट्रातील मानाचा देवर्षी नारद पत्रकारिता पुरस्काराबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
Post a Comment