परवा पन्नाशीतील एक तरुण कॅन्सरने गेला. संसार मध्यानात यावा आणि कर्त्या पुरुषाने अर्ध्यात संसार सोडून जावं?त्याच्या छोट्या छोट्या लेकरांचं यात काय तो दोष? वडिलांनी आपल्या जिभेचे चोचले पुरविताना, गुटख्याची व्यसने करताना आपल्या बद्दल जराही विचार केला नसेल का? असे मासुम प्रश्न आज त्या लेकरांना पडत असतील. गुटख्याची व्यसने करणारे कॅन्सरनेच जातात , जाताना पंधरा वीस लाख रुपयांचे खर्च हॉस्पिटलमध्ये करायला लावून कुटुंबियांवर आर्थिक भार टाकून जातात, असे शेकडो तरुण आपल्या शहरात आहेत जे कॅन्सर ने पीडित आहेत, कॅन्सर नावाचा राक्षस अजून किती तरुणांचा बळी घेणार आहे तरी ही शहरातून गुटखा, मावा हद्दपार किंवा प्रतिबंधित का होत नाही? हा सगळ्यात महत्वाचा प्रश्न आज सगळ्यांनाच पडतोय!
काल व्हॅटसप वर मौखिक कॅन्सर या विषयावरची बातमी व्हायरल झाली. उस्मानाबादची बातमी आहे ती. दररोज सिव्हिल हिस्पिटल मध्ये अंदाजे दीडशे लोक जेवताना तोंड उघडलं जात नाही ही तक्रार घेऊन येत असल्याची माहिती त्यात आहे. म्हणजेच ते तोंडाच्या कॅन्सर ने ग्रस्त होण्यास सुरुवात झालेले पेशंट आहेत. विचार करा एका शहरात ही अवस्था नसून सर्वत्र आहे. आपल्याकडे ही या पेक्षा वेगळी स्थिती नाहीये. काल गप्पांच्या ओघात कळलं की शहरात असेच चार पाच पेशंट लाईन अप आहेत , म्हणजे शेवटच्या टप्प्यात आहेत, आणि ते ही तिशीच्या आतील! भयानक आहे हे सर्व. सरकार कायदे करून जबाबदारी झटकून मोकळी झाली आहे. तरीही गुटखा, मावा यांचं उत्पादन आणि पुरवठा बिनदिक्कत सुरू आहे. उत्पादक आणि पुरवठादार ' माल' कमवून गब्बर होत आहेत. ही व्यवस्था अशी आहे की येथे कुणालाही कुणाचं देणं घेणं नाही. जाणारे जातात आपल्या कर्माने, समाजात थोडी हळहळ व्यक्त होते. पण यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्याचे कुणालाही सुचत नाही. ही तरुणाई अशी जाणे यात समाजाचे मोठे नुकसान आहे. या विरोधात एखादी चळवळ उभी राहणे अत्यंत जरुरीचे झाले आहे. प्रत्येक मशिदीतील इमाम नमाज नंतर प्रत्येक तरुणाला गुटखा , मावाचे व्यसन करू नये म्हणून शपथा देऊ शकतात. आपापल्या गल्लीत कॅन्सर वर आधारित सरकारी चित्रफिती दाखवून प्रबोधन केले जाऊ शकते. जबाबदार नागरिकांनी गुटखा , मावा खाणार्यांना येत जाता खडे बोल ऐकवावेत. आपण किमान इतकं तरी करू शकतो ना? सरकारी पातळीवर एफडीए आणि पोलीस यंत्रणेला कसं हलवायचे ते नंतर बघू!
*अतिक शेख*
*अहमदनगर*
Post a Comment