मख़दूम समाचार
२०.९.२०२३
गणेशोत्सवाच्या कोलाहलात काल नांदेड येथे मराठा आरक्षण आंदोलनात सुदर्शन देवराये या तरुणाने आत्महत्या केली ती बातमी मागे पडली. मी स्थानिक वृत्तपत्रे online बघुन तपशील जाणून घेतले तेंव्हा खूपच अस्वस्थता आली. अवघी ३० गुंठे जमीन. १३ महिन्याचा लहान मुलगा आणि अडीच वर्षाची मुलगी.पत्नी अवघी २५ वर्षाची असेल...खूप उदास वाटले..मला धरणात उडी घेतलेला काकासाहेब आठवला. धाराशिव जिल्ह्यात किसन माने याने ही आत्महत्या केली.
याच नांदेड मध्ये १९९३ झाली गौतम वाघमारेने पेटून घेतले होते नामांतर व्हावे म्हणून जाळून घेतले होते..मी तेंव्हा महाविद्यालयात शिकत होतो..गौतम वाघमारे कायमचा लक्षात राहिला. विद्यापीठाने नंतर त्याच्या कुटुंबातील कोणाला नोकरी दिली असेल का ?
आरक्षण धोरणाला विरोध म्हणून मण्डल आयोगाच्या वेळी १९९० ला गोस्वामी आणि अनेक तरुणांनी जाळून घेतले..
विषय वेगवेगळे असतील पण तरुण मुले संवेदनशील असतात. सरकारशी भांडतात. निर्ढावलेले नेते वेळकाढूपणा करतात किंवा इतर अडचणी असतात. हे तरुण स्वतःशी टोकाचे प्रामाणिक असतात आणि एका क्षणी सरकार ऐकत नाही तर चला आपला जीव लावू पणाला असे म्हणून जीव पणाला लावतात...ती हौतात्म्याची नशा असते..त्याक्षणी फक्त पतंगाची दिव्यावर झेप असते...
मला त्यांचे कुटुंबीय दिसतात...तो १३ महिन्याचा पोरगा बापाचा चेहरा त्याला आठवेल का तरी ?
आंदोलनात नेत्यांनी हे सतत बोलायला हवे. संघटित प्रयत्न शेवटी महत्वाचे असतात, एकट्याने जीव देऊ नये हे सतत बोलायला हवे सर्वच आंदोलनात...
शेतकरी आत्महत्या बातम्या ही असेच पिळवटून टाकतात जेव्हा कॅमेरा त्यांच्या कुटुंबावर फिरतो..त्या तरुण बायका...आपल्या समाजात पुनर्विवाहाचा पर्याय ही जवळपास बंद असलेला...अशा स्थितीत कशा जगत असतील..? ७५ हजार आत्महत्या हा आकडा फार हलवत नाही पण असे एक कुटुंब जरी बघितले तरी घालमेल होते जीवाची...
स्वतः ला संपवताना तरुण मुलांनी आपल्या लहान लेकरांचे चेहरे समोर आणायला हवेत...
आंदोलनांपलीकडे, कर्जाच्या पलीकडे जाऊन शेतकरी आत्महत्येत आणि आंदोलनात जाणारे हे जीव पिळवटून टाकतात.
- हेरंब कुलकर्णी.
अहमदनगर, महाराष्ट्र
إرسال تعليق