मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) १३.९.२०२३
मराठा जात तसेच धनगर जात आरक्षणानंतर आता नाभिक जातीलाही आरक्षण मिळावे या मागणीसाठी अहमदनगर शहरात महाराष्ट्र नाभिक महामंडळ अहमदनगर शाखेच्यावतीने संत सेना महाराज यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून तपोवनरोड येथील संत सेना महाराज भवन येथे नाभिक जातीच्यावतीने शांताराम राऊत, विकास मदने, शिवाजी दळवी, अरुण वाघ, अजय कदम, उमेश शिंदे आदिंनी आमरण उपोषण सुरु केले आहे.
जनार्दन वाघ, अशोक औटी, संजय भुजबळ, शहाजी कदम, अशोक खामकर, अनिल कदम, विठ्ठल वाघमारे, अशोक शेजूळ, रघुनाथ औटी, किशोर मोरे, सुरेश राऊत, दत्ता कदम, ज्ञानेश्वर गायकवाड, सुनिल सैंदाणे, बापू क्षीरसागर, विशाल मदने, नवनाथ मदने, महेंद्र जाधव आदिंसह जातीबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
याप्रसंगी शांताराम राऊत म्हणाले, आरक्षण मिळावे या मागणीसाठी नाभिक समाज बांधव सन १९८५ पासून लढा देत आहेत. नाभिक समाजाचा एस.सी. प्रवर्गात समावेश करण्यात यावा, अशी मागणी समाजाच्या वतीने सातत्याने करण्यात येत आहे. मात्र शासन जाणिवपूर्वक वेळकाढूपणा करत असल्याने समाजाच्या दृष्टीने हे घातक आहे. आरक्षणाची मागणी पुर्ण होत नाही, तोपर्यंत हे उपोषण सुरु राहणार असल्याचे राऊत यांनी सांगितले.
यावेळी विकास मदने म्हणाले, केंद्र सरकारने महाराष्ट्र राज्य सोडून इतर राज्यात नाभिक समाजाचा एस.सी. प्रवर्गात समावेश केलेला आहे. परंतु महाराष्ट्रात नाभिक समाज हा ओबीसी प्रवर्गातच येतो. त्यामुळे अनेक सोयी-सुविधांपासून हा समाज वंचित राहत आहे, त्यामुळे केंद्रात एस.सी.चा असलेला प्रवर्ग दर्जा महाराष्ट्र सरकारनेही द्यावा, अशी मागणी आम्ही करत आहोत.
जोपर्यंत नाभिक समाजाच्या आरक्षणाबाबत सरकार ठोस भूमिका घेतनाही तो पर्यंत उपोषण सोडणार नसल्याचा इशारा यावेळी उपोषणकर्त्यांनी दिला आहे. नाभिक जातीला आरक्षण मिळावे या मागणीसाठी सुरु करण्यात आलेल्या उपोषणाला विविधस्तरातून पाठिंबा मिळण्यास सुरवात झाली असून उपोषणस्थळी येणार्या विविध संघटनांच्या प्रतिनिधींनी उपोषणाला पाठिंबा दर्शवत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.
إرسال تعليق