इस्लाम धर्म महिलांच्या बाबतीत इतर धर्मांच्या तुलनेत कैक पट पुरोगामी आहे. किंबहुना इस्लाम धर्म जगातील पहिला धर्म आहे ज्याने स्त्रियांना सन्मानपूर्वक जगणं बहाल करीत आर्थिक सक्षम केलं. अनेक अधिकार बहाल केले व जगात सर्वप्रथम स्त्रीयांच्या उद्धारासाठी कायदे केले.
मला माहितेय , माझा हा युक्तिवाद तुम्हाला पटला नसेल. या करिता मी येथे काही उदाहरणे देतो ते समजून घ्या.
स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदे आज एकविसाव्या शतकात झाले आहेत. कायदे करून मुलींचा जन्म होऊ दिला जातोय . स्त्रियांना सुद्धा जन्म घेण्याचा व जगण्याचा अधिकार आहे अशी मांडणी केली जातेय. मित्रहो, हीच मांडणी पैगंम्बर मुहम्मद( स) यांनी दीड हजार वर्षापूर्वी केली. तत्कालीन परिस्थितीत लोकं मुलगी जन्मली की तिला जिवंत गाडीत असत. फरक हाच की या काळात मुलींना गर्भातच मारले जाते आणि तेव्हा जन्म झाल्या नंतर. पण इस्लाम ने दीड हजार वर्षपूर्वीच या अमानुष प्रथेला बंद केले. मुलींना सुद्धा जगण्याचा हक्क बहाल केला.
स्त्रियांना पैतृक संपत्तीत वाटा देण्याचा कायदा सर्व प्रथम महाराष्ट्र राज्यात 1995 साली झाला. तत्कालीन वेळेत या कायद्याला पुरोगामी पाऊल मानलं गेलं. याच कायद्याला केंद्र सरकारने 2007 साली सम्पूर्ण देशात लागू केलं आणि भारतीय महिलांना पैतृक सम्पत्ती मध्ये हिस्सा मिळू लागला. सात बारा वर महिलांची नावे लागू लागली. मित्रहो पैतृक संपत्तीत महिलांना हिस्सा देण्याचे काम जगात सर्व प्रथम इस्लाम ने केले आहे. दीड हजार वर्षपूर्वीच महिलांना हा हक्क दिला गेला. आणि आश्चर्य म्हणजे फक्त पैतृक सम्पत्ती मधेच नाही तर पतीच्या आणि मुलाच्या समपत्तीत देखील हा हक्क इस्लाम ने दिला. इस्लाम ने स्त्रियांच्या आर्थिक स्थैर्य व आर्थिक स्वातंत्र्यचा सर्व प्रथम विचार केला आहे. लग्न प्रसंगी मेहेरची रक्कम ही प्रथा ही स्त्रीच्या आर्थिक स्थैर्य व स्वातंत्र्याशि संबंधित आहे.
विधवा पुर्विवाह प्रथा भारतात सुरू होण्यासाठी विसावे शतक यावे लागले तेही अनेक समाजसुधारकांच्या प्रयत्नानंतर. मित्रहो, विधवा महिलांच्या पुनर्विवाहाचा पायंडा इस्लाम ने दीड हजार वर्षपूर्वीच सुरू केला. परित्यक्ता व विधवा स्त्रियांचा प्रश्न सोडवणुकीत इस्लाम अत्यंत पुरोगामी ठरला. आपल्या कडे काही वर्षांपूर्वी पर्यंत विधवांची काय अवस्था होती हे वेगळं सांगायची गरज नाही. त्यांचे केशवपन, त्यांची उपस्थिती संबंधी शुभ अशुभ मानणे, सती जाने, त्यांना आश्रमात धाडणे इत्यादी प्रकार आपल्याकडे होत असत.
मुलींना शिक्षण घेता यावे म्हणून फुले सारख्या सुधारकांनी प्रयत्न केले. संघर्षानंतर मुलींच्या शिक्षणाचा मार्ग मोकळा झाला. मुलींच्या शिक्षणाबाबत इस्लाम ने कधीच लिंग भेद केला नाही. उद्योग,व्यवसाय करण्यात ही इस्लाम ने स्त्रियांना रोखले नाही. पैगंम्बर मुहम्मद( स) यांची पहिली पत्नी खुदैजा या व्यापारी होत्या.
विवाह प्रसंगी वर निवडीचे अधिकार इस्लामने स्त्रियांना दिले आहेत. तिच्या होकारशिवाय विवाह होतच नाही. या शिवाय विवाह पश्चात एकतर्फी घटस्फोट घेण्याचा अधिकार ही इस्लाम ने महिलांना दिले आहेत. आधुनिक काळात या विषयी नुकतेच कायदे करण्यात आले आहेत परंतु हे अधिकार महिलांना बहाल करणारा इस्लाम धर्म जगात प्रथम असावा. स्त्री मुक्ती चळवळी जगभर फोफावल्या व स्त्रियांच्या बाजूने कायदे करण्यात आले. आधुनिक काळात झालेले कायदे व इस्लाम ने केलेले कायदे यात हजार वर्षांचे अंतर आहे.
मी निवडक उदाहरणे देऊन मांडणी केली आहे. तसे अनेक मुद्दे आहेत पण, छोट्या पोस्ट मध्ये समावेल इतका छोटा विषय हा नाही. मला सांगायचं हे की पाश्चिमात्य मीडिया ने इस्लाम धर्म विषयी जे स्त्री विरोधी चित्रं रेखाटले आहे त्यास बळी पडू नका. वास्तवता वेगळी आहे. खरं तर समाजशास्त्र विषयात एम ए करणाऱ्या विद्यार्थ्यांनी तुलनात्मक अभ्यासावर आधारित पी एच डी प्रबंध सादर करून वस्तुस्थिती जगासमोर मांडली पाहिजे.
मला खात्री आहे ही पोस्ट वाचून तुमच्या मनात नक्कीच हलाला व तलाक बद्दल प्रश्न उपस्थित झाला असेल. मित्रांनो हलाला रूढी ही पूर्णतः इस्लाम बाह्य आहे. त्याचे प्रचलन समाजात काही संधी साधूंनी वाढीस लावले आहेत. जो धर्म स्त्रियांना इतके हक्क, अधिकार देतो तो स्त्रियांची अशी अवहेलना करू शकतो का? राहिला प्रश्न तलाकचा . तो ही लोकांच्या अज्ञानतेपायी विकृत झाला आहे. पूर्णतः इस्लाम निर्देशित तत्वांचे पालन करून घटस्फोट प्रक्रिया केली तर विषय चर्चिला जाणार नाही. स्त्रियांवर अन्याय होणार नाही.
Post a Comment