शिक्षणाचा श्रीगणेशा होतो, तो साधारण पहिलीत. वाचनाची आवड लागते ती बालभारतीच्या मराठी भाषा विषयाच्या पुस्तकातून. पण मागे अनेक काळ या पुस्तकांचा दर्जा बिघडला आहे. चांगले चांगले लेखक, कवी मागे पडून अनेक दर्जाहीन साहित्य अभ्यासाला लावलं गेलं. याची निवड करण्यासाठी एक समिती काम करत असते.
कालपासून जी कविता फिरते आहे, ती साधारण २०१८ साली पहिल्यांदा अभ्यासक्रमात आली. तेव्हाच संपादक आणि निवड समितीने ही कविता का निवडली? पूर्वी भावे या व्यवसायाने अभिनेत्री आहेत, ही एकच माहिती माहितीजालावर उपलब्ध आहे. पण ही त्यांची कविता कोणत्या संग्रहातून निवडली गेली? ती कोणत्या निकषानुसार निवडली गेली? असे अनेक प्रश्न आज पडलेले आहेत. जरी लिहून घेतली असली, तरी त्यात कोणतं साहित्यमूल्य आहे? त्याचा विचार केला का? केला असेल तर ती कविता अभ्यासक्रमात का आली? असे अनेक प्रश्न बालभारतीने लक्षात घेऊन त्याची उत्तरं द्यावीत.
कुणी तरी काही तरी टुकार आणतं आणि त्याचा समावेश मागचा पुढचा काहीही विचार न करता अभ्यासक्रमात होतो, हे पोखरलेल्या व्यवस्थेचं लक्षण आहे, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही.
असलं साहित्य निवड समिती कशी मान्य करते? निवड समितीला स्वतःला काही ठरवण्याचा हक्क असतो का? आणि निवड समितीतले लोक फक्त हो ला हो म्हणणारे असतात की मुलांच्या बाजूने उभे असतात? अशा प्रश्नांची उत्तरं बालभारतीने देण्याची वेळ आलेली आहे.
एकीकडे मुलांच्या वाचनासंदर्भात चिंता व्यक्त केली जात असताना, मुलांना असलं टुकार साहित्य देऊन नाउमेद करण्याचा, मुलांना वाचनापासून दूर नेण्याचा प्रयत्न केला म्हणून आणि वाचन संस्कृतीला अधोगती देण्याचा प्रयत्न केला म्हणून या निवड समितीवर गुन्हा का नोंदवला जाऊ नये? (आपण शिक्षणाला आणि वाचनाला फार गृहीत धरतो, म्हणून असलं काही होणार नाही ही खंत आहे.)
आपण मुलांच्या वाढीच्या वयात अत्यंत दर्जाहीन साहित्य देऊन त्यांना शिकण्यापासून परावृत्त करत आहोत, याचं भान बालभारतीने बाळगलं पाहिजे आणि लवकरात लवकर आपल्या अभ्यास समितीची पुनर्रचना करून नवीन अभ्यासक्रम मुलांना दिला पाहिजे.
إرسال تعليق