नगर - आपला देश हा सर्वधर्म समभाव असलेला देश आहे. या देशात सर्व जाती-धर्माचे लोक गुण्या-गोविंदाने एकत्र राहत आहेत. अशा महान देशात आपण राहत असल्याचे आपणास अभिमान असला पाहिजे. देश आपल्यासाठी काय करतो, यापेक्षा आपण देशासाठी काय करतो याचा विचार होणे महत्वाचे आहे. आपल्या कृतीतून आपल्या व्यवसाय, नोकरीतून प्रामाणिकपणे केलेले काम ही एक प्रकारे देशसेवाच आहे. आपली भावी पिढी सुजान व सक्षम होण्यासाठी त्यांना शिक्षण, आरोग्य आदि मुलभूत गरजा मिळाल्या पाहिजे, असे प्रतिपादन अलकरम हॉस्पिटलचे डॉ जहीर मुजावर यांनी केले.
अलकरम हॉस्पिटल एक्सरे लॅब सोनोग्राफी सेंटर व मॅटरनिटी नर्सिंग होमच्यावतीने व आनंदऋषी नेत्रालय च्या सहकार्याने स्वतंत्रता सेनानी सरसैय्यद अहमद खान यांच्या जयंतीनिमित्त मोफत नेत्र तपासणी व अल्पदरात मोतीबिंदु शस्त्रक्रिया शिबीर आयोजित करण्यात आले होते. यावेळी अनेक रुग्णांनी आपल्या मोफत तपासण्या करून अल्प दरात शस्त्रक्रियेसाठी नाव नोंदणी केली. रुग्णांना अल्प दरात नंबरचे चष्मेही वाटप करण्यात आले. याप्रसंगी डॉ जहीर मुजावर,डॉ.अभिषेक चव्हाण,डॉ किरण कवडे,शफकत सय्यद, शेरअली शेख, तौफिक तांबोली, आबीद दुलेखान आदि मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलतांना डॉ जहीर म्हणाले की, ज्या पद्धतीने निसर्गातील विविध वस्तू या जगात काही ना काही मोलाचे समजोपयोगी कार्य नैसर्गिकरित्या करत असते व त्या मोबदल्यात कुठलीही अपेक्षा बाळगत नाही. जसे एखादे मोठे झाड आपल्याला सावली देते, ऑक्सिजन देते, फळ, फुल देते तसेच मनुष्यजन्मी समाजाला आपण काही देणे लागतो, या प्रामाणिक भावनेतून आपण काम केल्यास, निश्चितच चांगले यश प्राप्त होते, असे त्यांनी सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आबीद दुलेखान यांनी केले. तर आभार शेरअली शेख यांनी मानले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी अलकरम एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटीच्या सर्व सभासदांनी भरपूर परिश्रम घेतले.
إرسال تعليق