साहित्यवेल प्रकाशन संस्था सातारा,या प्रकाशन संस्थेने नुकतीच सचिन अवघडे यांची फक्कड कादंबरी प्रकाशित केली. आणि ही कादंबरी नुकतीच वाचनात आली...अगदी सुरुवातीलाच,माझ्या माणसांचा शोध..या सचिन अवघडे यांच्या सदरापासूनच, कादंबरी काळजाला भिडते... खरंच एक वाचनीय कादंबरी संग्रही मिळाली याचा मनापासून आनंद होतोय... माय मराठीच्या विशाल साहित्य क्षेत्रात एका चांगल्या पुस्तकाची भर पडली.अनेक वाचकांस ही नवी साहित्य कृती पर्वणी ठरेल. सध्याच्या काळात अनेक पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. पण!अगदी अण्णाभाऊंच्या कादंबरी सारखे वाचकाला खिळवून ठेवणारे पुस्तक , सद्यस्थितीत सचिन अवघडे यांनी लिहिले आहे .हे मात्र नमूद करावे लागेल.वितभर पोटासाठी करावा लागणारा संघर्ष ,आणि त्यासाठी चिल्ल्यापिल्ल्याना घेऊन गावोगावी करावी लागलेली भटकंती..आभाळाच्या अमर्याद छपराखाली थाटावा लागलेला फाटका संसार...जन्मोजन्मीचा कधीही न चुकलेला अठरा विश्व दारिद्र्याचा फेरा...त्यात पोटाची झालेली आबाळ.....जगण्यासाठी करावा लागलेला प्रचंड संघर्ष ...याचे वर्णन लेखकाने अगदी जिवंतपणे रेखाटले आहे.....
कादंबरी वाचताना त्यात कुठेही काल्पनिक वर्णनाचा स्पर्शही झाल्याचे मुळीच जाणवत नाही... जे सत्य होते...,जे घडले होते...,जे पाहिले होते ,आणि जे ऐकले होते..ते सत्यातच लेखणीच्या माध्यमातून उतरविले......
म्हणूनच या साहित्यकृतीला सत्याचा सुगंध आहे. मी दूर इथे कोकणात राहतो.. त्यामुळे मी काही तिथली भौगोलिक परिस्थिती कधीही पाहिली नाही तसा कधी योगही आला नाही...पण!कादंबरी वाचताना ते निसर्गाचे आणि परिसराचे तसेच गावोगावचे वर्णन अगदी डोळ्यासमोर उभे राहिले...हे लेखकाचे अचाट लेखन कौशल्य आहे. आभाळाएवढ्या समस्या असतानाही कादंबरीतील नायक वाम मार्ग न स्विकारता नैतिक जीवन मूल्य याला अजिबात तडा जाऊ देत नाही . म्हणूनच ही कादंबरी वाचताना एक वाचक म्हणून कादंबरीतील नायक मनात कुठेतरी घर करून राहतो...तो आपला वाटतो...... त्याचे बळकट शरीर,रांगडे कर्तृत्व आणि त्याची एकंदर देहबोली आणि बेडर स्वभाव थेट अण्णा भाऊंच्या अनेक नायकांसारखाच वाटतो.तो थेट अण्णा भाऊंच्या अनेक बहुजन कर्तृत्ववान नायकांच्या पंक्तीत बसतो.त्याला दारिद्र्यातही सर्व तऱ्हेने साता जन्माची साथ देणारी त्याची पत्नी गरिबितही ....मनाने खूप श्रीमंत ठरते.या कथा नाट्यात ती कुठेही कमी ठरत नाही. कादंबरीतील उलट्या काळजाची सावकारासारखी काही पात्रे सोडली,तर सारीच पात्रे स्वतःबद्दल नकळत सहज सहानुभूती निर्माण करतात.मनात खोलवर घर करतात. स्वतः काहीतरी कमवायला पाहिजे...या उद्दात्त हेतूने कुटुंबाच्या फाटक्या संसाराला मदत मिळावी म्हणून..,स्वतःचे लग्न पुढे ढकलून कमावण्यासाठी गेलेला रघु.ऐन तारुण्यात अकाली मुत्यू पावतो..त्याचे अकाली जाणे मनाला चटका लावुन जाते... सचिन अवघडे यांनी लिहिलेली आपल्या माणसांची ही दीर्घ कथा कादंबरीच्या माध्यमातून लिहिताना त्यात जीव ओतून ती साकार केलीय...विपुल शब्द भांडार असणारा हा नवोदित लेखक... कादंबरीतही आपल्या विपुल शब्द भांडाराची प्रचिती देतो...आपल्या निसर्गदत्त शब्दांची ताकत लेखणीतून साकार केलीय. शब्दांची पेरणी प्रभावीपणे केलीय.. आणि म्हणूनच शब्दाना मुहुत रूप देताना,साहित्य क्षेत्रातली एक अप्रतिम साहित्य कृती निर्माण झालीय...आणि म्हणूनच ती मनाला परिपूर्ण भिडते... समाजव्यवस्थेविषयी असणारी कळकळ, समाजाविषयीची आत्मीयता,. गावच्या मातीशी असणारे इमान, आणि गावाशी कदापि न तुटणारी नाळ.या जाणिवेतून लेखकाने जागेपणी पाहिलेले सत्य .....चित्रित केलेय. सचिन अवघडे यांनी चौकस ,डोळसपणे शब्दांची पेरनी प्रभावीपणे केलीय. आणि त्यातूनच फक्कड कादंबरी निर्माण झाली.अनेक वाचकांना ती अंतर्मुख करून वाचनाचा आनंद तर देईल यात मुळीच शंका नाही...ही कादंबरी वाचल्यावर लेखकाला उदंड शुभेछा तर मिळतीलच पण अनेक वाचक लेखकाच्या आगामी पुस्तकाची प्रतीक्षा करतील.....इतकी प्रभावी शब्दांची पेरण लेखकाने सहज केलीय..... प्रत्येक प्रसंग जिवंत साकारला आहे....म्हणून प्रत्येकाने जरूर हे पुस्तक घ्यावे. एक चांगली,साहित्यकृती जरूर वाचावी.
*प्रकाश सकपाळ*
मु.पो.कोंडये ता.राजापूर
जि. रत्नागिरी - 9860201852
*प्रसिद्धी सहयोग*
समता मिडिया सर्व्हिसेस
श्रीरामपूर - 9561174111
إرسال تعليق