औरंगाबाद ( एक महाराष्ट्रात दुसर उत्तर भारतात आहे ) , उस्मानाबाद , हैदराबाद ,सिकंदराबाद ,अहमदाबाद , अकबराबाद , या सगळ्या नावात असलेल बाद म्हणजे आबादी अर्थात गाव असणार ठिकाण असणार नाव ,
पण अहमदनगर मात्र नगर आहे. कारण ठाऊक आहे का ?
बहामनी राज्याची महमूद गवानाच्या खुनानंतर पाच शकले पडली जागोजागी सुभेदार मंडळी बंड करून उठली.
त्यातील एक मलिक अहमद बहिरी. याने बहामनी फौजांना भिंगार जवळ बाराबाभळीच्या घाटात पाणी पाजले.
जिथं विजय प्राप्त झाला तिथेच तो साजरा करू आणि साम्राज्य स्थापन करू असा संकल्प करून आधी भुईकोट किल्ला आणि नंतर हळूहळू आजूबाजूचा परिसर एकगठ्ठा करून अहमदनगर शहराची स्थापना केली. तो दिवस २८ मे १४९०.
अहमदनगरला याआधी एखादं शहर होते किंवा राज्य असे नाही. ते काही परिसर एकत्र करून बनवले गेले.आसपास तीन चार किलोमीटर परिघात असणारी गाव केडगाव, बुऱ्हाणनगर , माळीवाडा, भिंगार, नालेगाव , सावेडी, बुरूडगाव हि सगळी गाव शाबूत आहेत आणि त्यांची नावही शाबूत आहेत.
आता हा मुळपुरूष मलिक अहमद बहिरी कोण होता?
हा परभणीतील पाथरी जवळ गंगामसला गाव आहे गोदातीरावर. तिथला बहीरंभट कुलकर्णी यांचा नातू. ते बहामनी साम्राज्यात सेवेकरी.
हसन गंगू गेला. पुढचे बहामनी राजे पोकळ निपजले. शेवटी शेवटी सेनापती महमूद गवान जरा बरा होता. त्याचा खून झाला.
याच काळात पुढे मलिक अहमदच्या वडिलांना तिम्माभट यांना त्रास सुरू झाला. आधी त्यांचे हाल आणि नंतर छळ करून ठार केले. मलिक अहमदला लहानपणीच धर्म बदल करायला भाग पाडले. हा मलिक अहमद बहिरी हे नाव लावायचा. त्याने निजामशाही अहमदनगर येथे स्थापन केली. बहिरी हे बहिरंभटांचा वंशज याअर्थी. बहामनी राजांनी त्रास दिला म्हणून सुड उगवण्यासाठी केलेली भिंगारची लढाई निजामशाहीस जन्म देऊन गेली. तिथून आमचं अहमदनगर उदयास आले.
मलिक अंबरची कर्मभूमी अहमदनगर.
१५४० मध्ये आफ्रिकेतील इथिओपिया मध्ये जन्मलेला आणि गुलाम म्हणून विक्री होऊन भारतात आलेला मुलगा.चौथ्या मालकाच्या विधवेने त्याला स्वतंत्र केल.
अंगभूत धाडस आणि शौर्य यांच्या बळावर सरदार झाला.
अहमदनगरच्या निजामशाहीच्या पदरी काम करताना शहाजीराजांनी याच मलिक अंबरच्या जोडीने जगप्रसिद्ध भातवडीची लढाई जिंकली.
जमीन महसूल आकारणी, जमीन मोजणी आणि इतरही अनेक बाबींची सुरुवात त्याने केली. खापरी नळांची पाणीयोजना राबवून तत्कालीन खडकी म्हणजे संभाजीनगर आणि अहमदनगर येथे पाणीपुरवठा सुरळीत होईल अशी व्यवस्था केली.
मलिक अंबर आणि निजामशाही शेवटपर्यंत मुघलांच्या आक्रमणाच्या विरोधात लढत राहिले.
या माणसांनी आणि निजामशाही राजवटीने अहमदनगर शहराला वैभवाच्या शिखरावर नेल, ओळख दिली आणि इतिहासही दिला.
फक्त मुस्लीम द्वेषाने आंधळ्या झालेल्या लोकांना अहमदनगरच्या नावात नगर का आहे हे तरी कधी कळणार आहे.
आनंद शितोळे
#आपल्या_धडावर_आपलेच_डोके
#आम्ही_अहमदनगरकर
Post a Comment