नगरः रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने दोन दशकांनंतर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकांना शेड्यूल्ड बँक'चा दर्जा देण्यास सुरुवात केली असून, याअंतर्गत महाराष्ट्रातील अहमदनगर मर्चेंट्स को-ऑपरेटिव्ह बँकेला हा मान देण्यात आला आहे, अशी माहिती बँकेचे संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांनी दिली.
बुधवारी जारी करण्यात आलेल्या गॅझेट अधिसूचनेद्वारे, मर्चेंटस बँकेचा समावेश रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया अधिनियम, 1934 च्या दुसऱ्या अनुसूचीत करण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.
शेड्यूल्ड बँक'चा दर्जा मिळाल्यामुळे त्यांना आरबीआय च्या विविध सवलती उपलब्ध होणार आहेत. यामध्ये लिक्विडिटी फॅसिलिटीज, क्लिअरिंग हाऊस सिस्टीममध्ये सहभागी होण्याचा हक्क, तसेच शासकीय प्रकल्पांना कर्ज देण्याचा अधिकार यांचा समावेश आहे. यामुळे बँकेची विश्वासार्हता, कार्यक्षमता आणि व्यावसायिक विस्तारात मोठी वाढ होणार आहे.
मर्चेंटस बँकेने नुकताच सुवर्ण महोत्सव साजरा केला आहे. संस्थापक चेअरमन हस्तीमलजी मुनोत यांच्या नेतृत्वाखाली बँकेची घोडदौड कायम असून त्यांच्या नेतृत्वाखाली बँकेच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. बँकेच्या दिनांक 31 मार्च 2025 अखेर एकूण ठेवी 1462 कोटी 16 लाख, एकूण कर्जे 968 कोटी 39 लाख, निव्वळ नफा 7 कोटी 3 लाख, बँकेचा सी आर ए आर 15.75 व नेट एन पी ए 0.00 टक्के आहे. सर्वोत्कृष्ट बँकिग सेवा देत मर्चेंटस बँकेने अत्याधुनिक डिजिटल तंत्रज्ञानाच्या युगात आवश्यक बँकिंग सेवा ग्राहकांना दिल्या आहेत. श्येडुल्ड बँकेचा दर्जा मिळणे ही बँकेसाठी ऐतिहासिक उपलब्धी आहे अशी भावना हस्तीमलजी मुनोत यांनी व्यक्त केली आहे.
ही सुधारणा आणि मान्यता केंद्रीय सहकार मंत्रालयाच्या आणि विशेषतः केंद्रीय गृहमंत्री आणि सहकार मंत्री अमित शहा यांच्या पुढाकारामुळे शक्य झाली आहे. सध्या देशभरात एकूण 1,423 अर्बन को-ऑपरेटिव्ह बँका आहेत, ज्यांचा एकत्रित व्यवसाय 4.13 लाख कोटींच्या आसपास आहे. यापैकी आता 52 बँका 'शेड्यूल्ड बँक' म्हणून मान्यताप्राप्त आहेत. ज्यामध्ये अहमदनगर मर्चेंट्स बँकेचा समावेश झाला आहे. बँकेच्या या प्रगतीत सर्व अधिकारी, कर्मचाऱ्याचेही महत्वपूर्ण योगदान आहे. या उपलब्धीबद्दल व्हाईस चेअरमन अमित मुथा व सर्व संचालक मंडळाने आनंद व्यक्त केला आहे.
إرسال تعليق