"वाचावे ते आम्ही" या घोषवाक्याचे अनुसरण करणारी वाचकपीठ प्रतिष्ठान ही एक महाराष्ट्र शासन नोंदणीकृत संस्था असून मराठी भाषा, बोलीभाषा विशेषतः कवितेवर प्रचंड प्रेम करणारे महाराष्ट्रभरातील अनेक सदस्य या संस्थेत काम करत आहेत. वाचकपीठ प्रतिष्ठानच्या स्थापनेला पाच वर्षे पूर्ण झालेले असून वाचकपीठच्या प्रथेनुसार सहाव्या वर्षातील पदार्पणानिमित्त एकदिवसीय ऑफलाईन कार्यक्रमाचे मराठवाडा साहित्य परिषद नांदेड शाखा यांचे बरोबर संयुक्तपणे नांदेड येथील हाॅटेल विसावाच्या सभागृहात आयोजन केलेले आहे. या कार्यक्रमासाठी अध्यक्ष म्हणून मराठवाडा साहित्य परिषद, छत्रपती संभाजीनगरचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील तर उद्घाटक म्हणून नांदेड येथील सुप्रसिद्ध साहित्यिक प्राचार्य भु. द. वाडीकर आणि प्रमुख पाहुणे म्हणून इस्लामपूर, सांगली येथील कवी प्रशांत पाटील उपस्थित राहणार आहेत.
दुसर्या सत्रात ठाण्याच्या सुप्रसिद्ध कवयित्री प्रज्ञा दया पवार यांच्या "हिल्लोळ हरवून आतबाहेरचा" या कवितासंग्रहावर चर्चासत्राचे आयोजन करण्यात आलेले आहे. या चर्चासत्रात कवी, समीक्षक प्रा. डाॅ. पी. विठ्ठल, समीक्षक दा. गो. काळे हे भाष्य करणार असून चर्चासत्राच्या अध्यक्ष ज्येष्ठ कवयित्री ललिता गादगे असतील. यानंतरच्या तिसऱ्या सत्रात कवयित्री डाॅ. वृषाली किन्हाळकर यांच्या अध्यक्षतेखाली निमंत्रितांचे कविसंमेलन होईल. अशी माहिती वाचकपीठचे प्रसिध्दी प्रमुख गिरीश सोनार व प्रा. डाॅ. अविनाश कदम यांनी दिली.
कोविड काळामध्ये साहित्य, नाट्य, कला, संस्कृती ही ज्ञानवर्धनाची सर्व दालने बंद झालेली असताना प्राचार्य चंद्रकांत भोसले, भास्कर निर्मळ पाटील तसेच इतर समविचारी मित्रांनी एकत्र येऊन जून 2020 मध्ये वाचकपीठची स्थापना केली. वाचकपीठच्या माध्यमातून दर महिन्याला एका उत्तम काव्यसंग्रहाची निवड करून त्यावर साहित्य क्षेत्रातील तज्ञ, कवी, लेखक, साहित्यिक यांच्याद्वारे चर्चा घडवून आणण्यासाठी ऑनलाइन काव्यचर्चेचा कार्यक्रम सुरू केला. आजपर्यंत विनाखंड काव्यचर्चेचे एकूण 62 कार्यक्रम संपन्न झालेले आहेत व त्यातून साहित्य क्षेत्रातील 180 पेक्षा जास्त विद्वानांनी वेगवेगळ्या कवींच्या कवितासंग्रहांवर अभ्यासपूर्ण भाष्य केले आहे. तरी सर्व साहित्यिक, वाचक, रसिकांनी 10 ऑगस्ट रोजी या कार्यक्रमास उपस्थित रहावे अशी विनंती वाचकपीठ प्रतिष्ठान व मराठवाडा साहित्य परिषदेने केली आहे.
إرسال تعليق