अहिल्यानगर जिल्ह्यातील लोककलांपासून, शास्त्रीय संगीत, गायन, वादन, नृत्य तसेच तंत्रज्ञ, साहित्यिक, अभिनेते, अशा सर्व कलाकारांची माहिती असलेला ‘कलासाधकांचा नगरी आहेर’ हा ग्रंथ नगरच्या कलाक्षेत्राचा माहितीकोष असून, लेखक-संपादक शाहीर अरुण आहेर यांचे हे अतुलनीय कार्य आहे, असे गौरवोद्गार ज्येष्ठ विचारवंत तथा साहित्यिक प्रा. रतनलाल सोनग्रा यांनी काढले.
शाहीर अरुण आहेर लिखित व संपादित, 1144 पानांच्या या ग्रंथाचा प्रकाशन सोहळा नुकताच येथे झाला. त्या वेळी डॉ. सोनग्रा अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
या वेळी महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते संपत बारस्कर, अनिल बोरुडे, माजी महापौर बाबासाहेब वाकळे, डॉ. सागर बोरुडे, राज्य चर्मकार विकास संघाचे प्रदेशाध्यक्ष प्रा. संजय खामकर, शब्दगंध साहित्यिक परिषदेचे संस्थापक सचिव सुनील गोसावी,अध्यक्ष राजेंद्र उदागे, भगवान राऊत, माजी प्राचार्य खासेराव शितोळे, पेमराज सारडा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सूफी गायक पवन नाईक, महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेचे प्रमुख कार्यवाह जयंत येलूलकर, सुभाष सोनवणे, ग्रंथाचे सहायक संपादक दीपक रोकडे आदी मान्यवर उपस्थित होते.
महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सावेडी शाखेचे अध्यक्ष नरेंद्र फिरोदिया यांच्या शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे या ग्रंथाचे प्रकाशन केले.
यावेळी प्राचार्य खासेराव शितोळे म्हणाले, की अहिल्यानगर जिल्ह्याने राज्याला नृत्य, नाट्य, संगीत, गायन, वादन, साहित्य आणि लोककला अशा विविध क्षेत्रांतील नामवंत कलावंत दिले. यातील बहुतेक कलावंत बहुजन वर्गातील होते. त्यामुळे उपेक्षित राहिलेल्या अशा कलाकारांना न्याय देण्याचे काम शाहीर अरुण आहेर यांनी या ग्रंथातून केले आहे. हा ग्रंथ जिल्ह्यातील प्रत्येक शाळा महाविद्यालयातील ग्रंथालयापर्यंत पोहोचला पाहिजे जेणेकरून हा ग्रंथ वाचून अनेक नवोदित कलावंतांना प्रेरणा मिळेल आणि त्यांच्यातून भविष्यात अनेक कलावंत निर्माण होतील.
लेखक-संपादक शाहीर अरुण आहेर म्हणाले, जिल्ह्यातील विविध क्षेत्रांतील कलावंतांचे कार्य मला खुणावत होते. या कलावंताच्या कामाचे कुठे तरी दस्तऐवजीकरण होणे गरजेचे होते. त्याच प्रामाणिक भावनेतून मी या ग्रंथाचा मनोदय व्यक्त केला व तो पूर्णत्वास नेण्यासाठी अनेक मदतीचे हात पुढे आले,या ग्रंथ प्रकाशनासाठी मला मोलाची मदत केली. त्याबद्दल मी ऋणातच राहू इच्छितो. माझे ध्येय आणि उद्दिष्ट साध्य झाले आहे.
सहायक संपादक दीपक रोकडे यांनी ग्रंथ निर्मितीची पार्श्वभूमी स्पष्ट केली. प्राचार्य डॉ. माहेश्वरी गावित, संजय खामकर, नगरसेवक संपत बारस्कर, सुनील गोसावी, संतोष कानडे, सुभाष सोनवणे आदींची भाषणे झाली.
गायक पवन नाईक यांनी प्रास्ताविक केले. वीणा दिघे यांनी सूत्रसंचालन केले. वर्षा आहेर यांनी आभार मानले.
कार्यक्रमाची सुरुवात कल्याणी कामतकर यांच्या कथक नृत्यालयाच्या नृत्यांगना वैष्णवी पाटोळे, वैभवी चव्हाण, राधिका देशमुख, सृष्टी उदमले यांच्या नटराज वंदन नृत्याने झाली.
समारंभासाठी रोहिणी अरुण आहेर, इंजि. सोनाली अश्विनीकुमार आहेर,उद्योजक अश्विनीकुमार आहेर, प्रा. अवधूत अरुण आहेर, संतोष सुर्वे, देवीकृपा सांस्कृतिक मंडळ यांनी परिश्रम घेतले.
या कार्यक्रमास कवयित्री शर्मिला गोसावी, प्रा.डॉ.अशोक कानडे, रघुनाथ आंबेडकर, यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
إرسال تعليق