ऐतिहासिक पुण्यभूमी, संत आणि सहकार परंपरेने समृद्ध अशा अहिल्यानगरात मेडिव्हिजनचे ८वे राष्ट्रीय संमेलन उत्साहात आणि अभूतपूर्व उपस्थितीत प्रारंभ झाले. अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल यांच्या सहकार्याने आयोजित या राष्ट्रीय मेळाव्यात देशभरातून आलेले वैद्यकीय व दंतचिकित्सा विद्यार्थी, डॉक्टर्स आणि उदयोन्मुख तरुण नेतृत्व मोठ्या संख्येने सहभागी झाले.
कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती माता व स्वामी विवेकानंद प्रतिमापूजन, दीपप्रज्वलन आणि “वंदे मातरम” राष्ट्रगीताने झाली. मान्यवरांचा सत्कार करून अधिवेशनाची औपचारिक सुरुवात झाली.
राष्ट्रधर्म, राष्ट्रहित आणि आदर्श नागरिक घडविण्याचा संकल्प
“अखिल भारतीय विद्यार्थी परिषद गेल्या ७७ वर्षांपासून निःस्वार्थ विद्यार्थी नेतृत्व घडवत आहे, याचा प्रत्येक भारतीयाला अभिमान आहे,” असे प्रतिपादन करताना नामदार डॉ. राधाकृष्ण विखे पाटील (कॅबिनेट जलसंपदा मंत्री, महाराष्ट्र राज्य) म्हणाले :
“अहिल्यानगर ही संतांची व ज्ञानेश्वरीच्या परंपरेची भूमी आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी ‘थॉट्स ऑफ पाकिस्तान’ हा ऐतिहासिक ग्रंथ येथेच लिहिला. देशातील पहिल्या महिला डॉक्टर आनंदीबाई जोशी यांची प्रेरणादायी कहाणी हिच भूमी सांगते. सहकाराची चळवळ पद्मश्री विठ्ठलराव विखे पाटलांनी उभी केली आणि देशभर पोहोचवली. अशा पुण्यभूमीत होणारे हे राष्ट्रीय अधिवेशन म्हणजे खऱ्या अर्थाने राष्ट्रकार्याचा उत्सव आहे.”
त्यांनी पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आयुष्यमान भारत योजनेमुळे ग्रामीण भागात आरोग्यसेवेचा नवा अध्याय लिहिला जात आहे असे सांगत केंद्र सरकारचे अभिनंदन केले.
मेडिकल विद्यार्थ्यांचा राष्ट्रीय मंच
मागील दशकात मेडिव्हिजन ने वैद्यकीय विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर प्रभावी लढा दिला असून, आज ही चळवळ देशभर ठामपणे उभी राहिली आहे, असे आयोजकांनी सांगितले.
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ. मिलिंद निकुंभ म्हणाले :
“स्वामी विवेकानंदांच्या विचारांमधून प्रेरणा घेत पंतप्रधान नरेंद्र मोदी विकसित भारताचे स्वप्न साकार करत आहेत.”
तर अभावीपचे राष्ट्रीय सह संघटन मंत्री बालकृष्ण यांनी कोविड काळातील मेडिव्हिजन चे कार्य विशेष उल्लेखनीय ठरल्याचे सांगून, “संवेदनशील आणि राष्ट्रकार्याला समर्पित मेडिकल विद्यार्थ्यांच्या कार्यामुळे राष्ट्रनिर्मितीचा पाया मजबूत होतो,” असे प्रतिपादन केले.
डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलचे योगदान
या राष्ट्रीय संमेलनाच्या यशासाठी डॉ. विखे पाटील मेडिकल कॉलेज व हॉस्पिटल, अहिल्यानगरचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अभिजित दिवटे व त्यांच्या सहकाऱ्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. संस्थेच्या प्रशासनापासून कर्मचारी वर्गापर्यंत सर्वांनी समर्पित सहभाग नोंदवला.
आरोग्यसेवा आणि शिक्षणातून राष्ट्रनिर्मिती हा संस्थेचा संकल्प या अधिवेशनातून अधोरेखित झाला. डॉ. नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांची दूरदृष्टी, सहकार्य आणि मार्गदर्शन यामुळेच हे संमेलन यशस्वीरीत्या सुरु झाले असून, पुढील दोन दिवस संवाद, मार्गदर्शन व विचारमंथन सत्रे पार पडणार आहेत.
मीडिया विभाग, डॉ. विठ्ठलराव विखे पाटील हॉस्पिटल, अहिल्यानगर
إرسال تعليق