अहिल्यानगर (प्रतिनिधी)- अहिल्यानगर महापालिकेचे आयुक्त व प्रशासक यशवंत डांगे यांच्या नियुक्तीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अखत्यारीतील नगर विकास विभागाने चक्क दुर्लक्ष केले आहे. राज्य निवडणूक आयोगाने दोनवेळा याबाबतचा अहवाल पाठवण्याचे आदेश नगर विकास विभागाला दिले होते. पण या विभागाने त्यावर काहीच कार्यवाही केली नाही व एकप्रकारे निवडणूक आयोगाच्या आदेशाला केराची टोपली दाखवल्याचे दिसत आहे. या पार्श्वभूमीवर, राज्य निवडणूक आयोगाने आता पुन्हा तिसर्यांदा नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकार्यांना पत्र पाठवले असून, तातडीने आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवरील आक्षेपांची सविस्तर चौकशी करून नियमानुसार पुढील आवश्यक कार्यवाही करावी व अहवाल पाठवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशावर नगर विकास विभाग आता काय कार्यवाही करते, हे पाहणे उत्सुकतेचे झाले आहे. नगरमधील सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे. पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व नगरचे आमदार संग्राम जगताप यांच्या शिफारशीमुळे डांगे यांची नगर मनपात नियुक्ती झाली असून, ते मनपा कामकाजात पक्षपातीपणा करतात, असा दावा या आक्षेपात शेख यांनी केला आहे.
सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आयुक्त डांगे यांच्या नगर मनपातील नियुक्तीला 24 मे 2025 रोजी आक्षेप घेतला होता. त्यावर राज्य निवडणूक आयोगाने 4 जून 2025 रोजी नगर विकास विभागाला पत्र पाठवून डांगेंच्या नियुक्तीवर घेण्यात आलेल्या आक्षेपांची चौकशी करून व नियमानुसार कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले होते. पण त्यावर नगर विकास विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याने निवडणूक आयोगाने पुन्हा 10 ऑक्टोबरला नगर विकास विभागाला दुसरे पत्र पाठवून कार्यवाहीच्या सूचना केल्या होत्या. मात्र, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले. या पार्श्वभूमीवर, शेख यांनी निवडणूक आयोगाकडे पुन्हा 16 ऑक्टोबरला तक्रार करून आयुक्त डांगे यांच्यावर नगर विकास विभागाने काहीच कार्यवाही केली नसल्याने त्यांनी नगर मनपाची प्रभाग रचना करताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील व आ. संग्राम जगताप यांच्या दबावाला बळी पडून विरोधक उमेदवारांच्या प्रभागांची मोडतोड केल्याचा दावा केला व डांगे हे पक्षपातीपणे काम करतात, असेही म्हणणे मांडले. निवडणूक आयोगाने त्यांच्या या तक्रारीची तातडीने दखल घेतली व नगर विकास विभागाला तिसरे पत्र पाठवून तातडीने या प्रकरणाची सविस्तर चौकशी करून आणि नियमानुसार आवश्यक पुढील कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश दिले आहेत. राज्य निवडणूक आयोगाच्या तहसीलदार संगीता वराडे यांनी नगर विकास विभागाच्या कक्ष अधिकार्यांना काल सोमवारी (27 ऑक्टोबर) हे पत्र पाठवले आहे. आता या पत्रावर नगर विकास विभागाद्वारे काय कार्यवाही होते व राज्य निवडणूक आयोगाला काय अहवाल पाठवला जातो, याची उत्सुकता वाढली आहे.
पिंपरी चिंचवड मनपात सहायक आयुक्तपदी कार्यरत असताना यशवंत डांगे यांची कौटुंबिक कारणास्तव नगर मनपाच्या आयुक्त-प्रशासकपदी नियुक्ती करण्याची शिफारस पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी जुलै 2024 मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे केली होती तसेच नगरचे आमदार संग्राम जगताप यांनीही जुलै 24मध्येच शिंदे यांना पत्र पाठवून नगर मनपाच्या रिक्त आयुक्त पदी डांगे यांची नियुक्ती करण्याची शिफारस केली होती. या दोन्ही शिफारशींना सामाजिक कार्यकर्ते शाकीर शेख यांनी आक्षेप घेतला होता. त्यावर चौकशी व आवश्यक कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दोन पत्रे पाठवून दिले होते. पण नगर विकास विभागाने त्याकडे दुर्लक्ष केले. या पार्श्वभूमीवर, नगर मनपा निवडणुकीच्या प्रभाग रचनेनंतर शेख यांनी पुन्हा निवडणूक आयोगाकडे तक्रार करून आयुक्त डांगे यांची अन्यत्र बदली करण्याची व त्यांच्या जागी योग्य आणि सक्षम अधिकार्याच्या नियुक्तीची मागणी केली आहे. नगर मनपाच्या प्रभाग रचनेची मोडतोड पाहता डांगे यांच्या नेतृत्वाखाली होणार्या नगर मनपाच्या निवडणुकीत पक्षपात होऊन निवडणूक प्रक्रियेला गालबोट लागेल व निष्पक्षपातीपणे निवडणूक प्रक्रिया होणार नाही व त्याचा परिणाम विरोधक उमेदवारांना भोगवा लागेल, असा दावा केला आहे. यावर आता कार्यवाही करून अहवाल देण्याचे आदेश आयोगाने नगर विकास विभागाला दिले आहेत.
إرسال تعليق