ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी माजी कुलगुरू डाॅ. सर्जेराव निमसे यांच्या अमृत महोत्सवात बोलताना पंडित नेहरु आणि डाॅ. निमसे यांचा जन्मदिन एकच म्हणे '१४ नोव्हेंबर'' असल्याचं सांगत पंडितजींच्या नगरशी असलेल्या ऋणानुबंधांचा उल्लेख केला. पंडितजींच्या जन्मशताब्दी वर्षाचा प्रारंभ शरद पवार हे मुख्यमंत्री असताना १४ नोव्हेंबर १९८८ रोजी त्यांच्याच प्रमुख उपस्थितीत नगर किल्ल्याच्या चार क्रमांकाच्या बुरूजावर झाला होता.
चले जाव आंदोलनात नगरच्याच किल्ल्यात स्थानबद्ध असलेल्या आचार्य नरेंद्र देव यांच्या हस्ते
भुईकोट किल्ल्याच्या नऊ क्रमांकाच्या बुरुजावर १५ आॅगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र भारताचा तिरंगा फडकविण्यात आला. पुढे नरेंद्र देव लखनौ विद्यापीठाचे कुलगुरू झाले. डाॅ. निमसे यांनाही या विद्यापीठाचं कुलगुरूपद भूषवण्याचा मान मिळाला. कुलगुरू झाल्यावरही नरेंद्र देव वर्गात जाऊन विद्यार्थ्यांना शिकवत असत. डाॅ. निमसे यांनी त्यांचा हा वारसाही पुढे चालू ठेवला...
पंडितजींना त्यांचे काही वाढदिवस कारावासात साजरे करावे लागले. त्यापैकी तीन वाढदिवस नगरच्या भुईकोट किल्ल्यात स्वातंत्र्य आंदोलनात त्यांच्या बरोबर शिक्षा भोगणारे अकरा सहकारी आणि जेलरनं साजरे केले.
चले जाव आंदोलन ८ ऑगस्ट १९४२ रोजी सुरू झालं. महात्मा गांधींसह बहुतेक राष्ट्रीय नेत्यांना ९ ऑगस्टला भल्या पहाटे अटक झाली. पंडित नेहरू, सरदार वल्लभभाई पटेल, मौलाना अबुल कलाम आझाद, आचार्य नरेंद्र देव, शंकरराव देव, गोविंद वल्लभ पंत, सय्यद मेहमूद, पी. सी. घोष, हरेकृष्ण माहताब, असफ अली, डॉ. पट्टाभि सीतारामय्या, आचार्य कृपलानी आदी बारा राष्ट्रीय नेत्यांना नगरच्या किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बगदाद महालाच्या एका भागात तयार करण्यात आलेल्या विशेष कारागृहात ('द कीप' असा उल्लेख ब्रिटिश करत असत.) स्थानबद्ध करण्यात आलं. प्रारंभीचे काही दिवस पत्रव्यवहारावर बंदी होती. मग पंडितजींनी कोठड्यांसमोरच्या रिकाम्या जागेत बगीचा तयार करायला सुरूवात केली. अर्धी विजार घातलेले पंडितजी कुदळ घेऊन स्वतः खोदकाम करत घाम गाळायचे. सरदार पटेल आणि अन्य काही मंडळी बागकामात त्यांना मदत करायचे. लवकरच तिथे गुलाबाचे ताटवे फुलले. पुढे पंडितजींनी याच किल्ल्यात 'द डिस्कव्हरी आॅफ इंडिया' हा ग्रंथ लिहिला.
१९४२, ४३ आणि ४४ मधील वाढदिवशी पंडित नेहरू याच किल्ल्यातील कोठड्यांमध्ये होते. पंडित नेहरूंनी या काळात लिहिलेली डायरी आणि मुलगी इंदिरा, बहीण बेट्टी यांना पाठवलेल्या काही पत्रांमध्ये वाढदिवसाचे उल्लेख आढळतात.
नगरच्या किल्ल्यातल्या पहिल्या वाढदिवसाबद्दल १३ नोव्हेंबर १९४२ रोजी पंडितजींनी डायरीत लिहिलं आहे – उद्या माझा वाढदिवस आहे. ५३ वर्षे पूर्ण केल्यानं मी थोडा भारावून गेलो आहे आणि थोडा नाराजही आहे. काळ पुढे सरकत जातो, तशी तरूणाईतील ऊर्जा आणि चैतन्य हळूहळू कमी होत जातं. वाढत्या वयाचा विचार मनाला निराश करतो. इतक्या वर्षांत माझ्या मनात साचलेल्या मोठ्या गोष्टी आणि उपक्रमांचं काय? वेळ आल्यावर मी त्यांच्यासाठी सक्षम होऊ शकेन का? मला मोठ्या प्रमाणात विधायक कामांची भूक आहे. तशी वेळ भारतावर नक्कीच येईल, पण माझ्यावर...?
१६ नोव्हेंबर १९४२ रोजी लिहिलेल्या पत्रात पंडितजींनी म्हटलं आहे -
...तर मी त्रेपन्न वर्षांचा झालो ! मागच्या वर्षी मी माझा वाढदिवस डेहराडूनच्या तुरुंगात घालवला. इंदू आणि सायकी मला भेटायला आले होते. त्यांनी फुलं आणि काही भेटवस्तू आणल्या होत्या. आमची मेजवानी केली. रणजीतही समवेत होता...
मी तुरुंगात किती वाढदिवस घालवले? मला वाटतं आठ. अजून किती घालवायचे आहेत?...
कारावासातील सहकारी सय्यद महमूदनं काल मला एक लांबलचक पत्र दिलं. त्याबरोबर फुलांचा गुलदस्ता आणि सुकामेव्याच्या पिशव्या. पत्र आपुलकीनं भारलेलं होतं. १९०९ मध्ये जेव्हा तो मला लंडनमध्ये पहिल्यांदा भेटला, तेव्हापासूनच्या आमच्या दीर्घ मैत्रीची नोंद त्यानं या पत्रात केली होती. इथले माझे आणखी एक सहकारी असफ अली यांनी मला एक सिगारेट केस दिली, जी त्यानं जेलरमार्फत स्थानिक बाजारामधून मागवली. तुरुंगात भेटवस्तू गोळा करणं सोपं नाही....
गोविंद वल्लभ पंतजींनी माझा वाढदिवस साजरा करण्यासाठी पुढाकार घेतला. प्रत्येकाला मला काही ना काही देता यावे, यासाठी त्यांनी एक मोठा हार आणि फुलांचे अकरा पुष्पगुच्छ तयार केले. मौलानांनी मला हार घातला. माहताब यांनी माझ्या सन्मानार्थ एक ओरिया भाषेतील कविता सादर केली. हारातील फुलांचा उपयोग नंतर आमचं जेवणाचं टेबल छान सजवण्यासाठी केला गेला. गुलाबाची फुलं बाउलमध्ये ठेवली होती. फुलांच्या आणि पानांच्या गुच्छात कागदापासून बनवलेला राष्ट्रध्वज अभिमानानं उभा होता. जेवणात एक पक्वान्नही होतं...
वाढदिवसानिमित्त काही पुस्तकं, सिगारेट, मध आणि रुमाल असलेलं पार्सल काही दिवसांनी पंडितजींना मिळालं.
वर्षभरानं पंडितजींचा ५४ वाढदिवसही नगरच्या किल्ल्यात साजरा झाला. त्याविषयीचा उल्लेख २० नोव्हेंबर १९४३ च्या पत्रात त्यांनी केला आहे - आणखी एक वाढदिवस आला आणि गेला. तुरुंगातील हा सलग चौथा वाढदिवस. बेट्टीनं मला काही पुस्तकं आणि अमृता शेरगिलची छापील चित्रं पाठवली. ती पाहून अमृताचा विचार मनात आला आणि वाईटही वाटलं.
महमूद यांनी सिगारेट बॉक्स आणि अन्य काही भेटवस्तू दिल्या. माझ्या वाढदिवसाला इतर कोणापेक्षा ते जास्त महत्त्व देतात असं दिसतं. पंतजींनी गेल्या वर्षीच्या कामगिरीची पुनरावृत्ती केली. त्यांनी मोठ्या संख्येनं फुलांच्या हारांची व्यवस्था केली. एक मोठा आणि डझनभर लहान. चहाच्या वेळी हार घालण्यात आले. मौलानांनी मोठा हार घातला. जेलरनंही कार्यक्रमात सामील होत मला हार अर्पण केला.
जेल सुपरिटेंडेट सँडकनं वाढदिवसासाठी केक पाठवला, ज्यावर ५४ चिन्हं रेखाटलेली होती! अशा प्रकारे दिवस निघून गेला आणि मला मोठं झाल्यासारखं वाटलं. गेल्या वर्षभरात मी किती बदललो? मला वाटतं, मी शारीरिक आणि मानसिकदृष्ट्याही बदललो आहे. शारीरिकदृष्ट्या तुलना करणं सोपं आहे - जवळजवळ १६ पौंड वजन कमी झाल्यानं मी सडपातळ दिसू लागलो आहे. आता माझं वजन १२७ पौंड आहे. मला हलकं वाटतंय. मी तंदुरुस्त आहे.
मानसिकदृष्ट्या? मला वाटतं, मी थोडा अधिक शांत आणि संतुलित झालो आहे. आत्मिक शांतता, ज्यामुळं जास्त काळ अस्वस्थ वाटत नाही. तथापि, कंटाळवाण्या दिनचर्येमुळे चैतन्यशक्तीचा अभाव जाणवतो. मला माहीत नाही, कदाचित हे दोन्ही असेल. पुढचा काळच काय ते ठरवेल...
पंडितजींचा नगरच्या किल्ल्यातील शेवटचा वाढदिवस १९४४ मध्ये आला. वाढदिवसाच्या आधी जेल सुपरिटेंडेंट सँडक एक पार्सल घेऊन आला. नेहमीप्रमाणे ते फोडलेलं आणि सेन्सॉर झालेलं नव्हतं. त्या पार्सलमध्ये होती तीन पुस्तकं आणि एक खास पत्र. ते पाठवलं होतं व्हाईसरॉय वेव्हल यांनी! या पत्राचा बोभाटा केला गेला नाही. निदान आपल्या काही सहकार्यांना या पत्राविषयी माहिती असावं, असं पंडितजींना वाटलं. मौलाना आणि वल्लभभाईंच्या कानावर ते ही गोष्ट घालणार होते, पण नंतर त्यांनी या पत्राविषयी मौलाना आणि गोविंद वल्लभ पंत यांना सांगितलं.
१४ नोव्हेंबर १९४४ रोजी आपल्या बहिणीला लिहिलेल्या पत्रात पंडितजींनी म्हटलं आहे -
दहा दिवसांपूर्वी मी तुझ्याकडे माझं शेफर फाउंटन पेन दुरुस्तीसाठी पाठवलं. हा माझा आवडता पेन आहे आणि मला वाटतं, मी तो दहा वर्षे सतत वापरला. आता त्याची निब फक्त चांगली राहिली आहे. माझ्याकडे इतर दोन पेन आहेत, परंतु ते चांगले नाहीत. त्यामुळे शेफर पेन दुरुस्त करून मला परत पाठव.
काल मला बारा रुमाल असलेली गोड भेट मिळाली.
माझे सर्व कपडे जीर्ण झाले आहेत. शिवल्यानंतर पुन्हा फाटू लागले आहेत. नूतनीकरणाची प्रक्रिया कायम आहे. काही प्रमाणात खादीच्या खराब गुणवत्तेमुळे, तसंच धोब्याच्या हाताळणीमुळं ते खराब होत असावेत, असं मला वाटतं. कदाचित पाण्यात मोठ्या प्रमाणात क्लोरीनही असेल. रुमाल टिकतात, कारण ते मी धुतो. त्यामुळे माझ्याकडे त्यांचा पुरेसा साठा आहे.
हे मी माझ्या वाढदिवशी लिहित आहे. या विशिष्ट दिवसाला इतर कोणत्याही दिवसापेक्षा जास्त महत्त्व का असावं, हे मला माहीत नाही. आणि तरीही अपरिहार्यपणे वाढदिवस म्हणजे एखाद्या व्यक्तीला जीवनाच्या प्रवासातील एक महत्त्वाची खूण मानली जाते. एक थांबण्याची जागा जिथून माणूस मागे आणि पुढे पाहतो...
१७ नोव्हेंबरला पंडितजींनी आपल्या डायरीत लिहिलं -
आणखी एक वाढदिवस आला आणि गेला. मी ५५ वर्षांचा झालो. कारावासातला हा माझा सलग पाचवा वाढदिवस. सँडकनं केक आणला. अहमदनगरमधील आमचे मारवाडी मित्र, फिरोदिया, जे कधी कधी फळे पाठवतात, त्यांनीही एक केक पाठवला. चिकन आणि भाजीपाला वापरून तयार केलेल्या पाईच्या वासानं आमची भूक चाळवली. आम्ही मेजवानी केली आणि त्यासाठी सँडक व जेलरलाही आमंत्रित केलं. पंतजींनी नेहमीप्रमाणे हार आणि पुष्पगुच्छ मांडले. पॅन्ट्रीमध्ये मदत करणाऱ्या रुक्वा या कच्च्या कैद्यानं स्वयंस्फूर्तीनं फुलांचा मांडव तयार केला.
...त्याचदिवशी व्हॉलीबॉल खेळताना माहताबच्या डाव्या हाताचं बोट फ्रॅक्चर झालं. माझ्या या वाढदिवसाची ती आठवण ठरली. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला एक्स-रे आणि प्लास्टर करण्यासाठी मिलिटरी हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं.
माझ्या वाढदिवसानिमित्त वृत्तपत्रांत निरनिराळे शुभेच्छा संदेश आले होते. त्यापैकी एडवर्ड थॉम्पसनच्या संदेशानं मला खूप प्रभावित केलं. त्यानं माझ्याबद्दल किती आपुलकी निर्माण केली आहे आणि कशासाठी असा प्रश्न मला अनेकदा पडतो. त्याने माझ्यात काय शोधले आहे? लोकांचं हे प्रेम आणि विश्वासाला मी खऱोखऱ पात्र आहे का?
नेहमीप्रमाणे डझनभर चांगले रुमाल मिळाले माझ्या वाढदिवसासाठी.
स्वातंत्र्य मिळाल्यानंतर बरेच बालदिन नगरच्या किल्ल्यात साजरे झाले, पण पंडितजींनी तयार केली, तशी गुलाबाची बाग नंतर काही तयार होऊ शकली नाही...
अहिल्यानगर म्हणजे जुन्या अहमदनगर शहरातील लालटाकीवर पंडित जवाहरलाल नेहरुंचा पूर्णाकृती पुतळा आहे. पंडितजींसमोर ध्वनिक्षेपक आहे आणि ते भाषण करत आहेत, अशा अविर्भावातला हा पुतळा आहे. १ मे १९५३ रोजी पंडितजींनी नगरच्या भुईकोट किल्ल्यावरील तीन क्रमांकाच्या बुरूजावरून भाषण केलं होतं. कदाचित हाच प्रसंग शिल्पकारानं लालटाकीवरच्या पुतळ्याच्या निमित्तानं साकारला असावा...
लालटाकीवरील पंडितजींच्या पुतळ्यासमोरचा माइक आणि किल्ल्यातील कोठडीतील त्यांची सोपकेस सापडत नाही. कुठे दिसली तर जपून ठेवा...
भूषण देशमुख
अहिल्यानगर
९८८१३३७७७५
(फोटो सौजन्य - श्री. मंदार साबळे)
إرسال تعليق