माळीवाडा वेशीचे वारसदार - भुषण देशमुख

माळीवाडा वेशीचे वारसदार

ब्रिटिश सैन्यानं १८०३ मध्ये आक्रमण केलं, तेव्हा
ज्या वेशीनं नगर (सध्याचे अहिल्यानगर) शहराचं रक्षण केलं, ती माळीवाडा वेस आता थोड्याच दिवसांची सोबती आहे. तिच्या वारसदारांनाच ती अडगळ वाटू लागली आहे...

नगर शहराचं दक्षिणेकडंचं प्रवेशद्वार म्हणून ओळख असलेली माळीवाडा वेस, विशाल गणपतीचं मंदिर आणि या संपूर्ण परिसराला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. अहमदनगर शहराची मुहूर्तमेढ सन १४९० मध्ये जंग-ए-बाग लढाईतल्या विजयानंतर रोवली गेली. पुढे १४९४ मध्ये हे शहर निजामशाहीची राजधानी बनलं. तथापि, प्रत्यक्ष शहर वसण्यापूर्वी या परिसरात काही वाड्या, वस्त्या होत्या. नालेगाव, माळीवाडा, चाहुराणा खुर्द आणि बुद्रक हे त्यापैकी होत. माळी समाजाची वस्ती जास्त असल्यामुळे या भागाला माळीवाडा नाव पडलं असावं.

एकेकाळी नगर शहराला सगळ्या बाजूनं तटबंदी होती. मोगलांनी ताबा घेतल्यानंतर शहाजहान बादशहाचा नातेवाईक असलेला नगरचा किल्लेदार सर्जेखान यानं ही तटबंदी सन १६३१ मध्ये बांधली. निजामशाहीत बागरोजा, कोठला यासारख्या काही वास्तूंना कोट होते, पण सगळ्या शहराला नव्हते. शहराचा संस्थापक राजा अहमदशाहने सीना नदीकाठी जैता दरवाजा बांधल्याचा उल्लेख आहे. माळीवाडा वेशीच्या दोन्ही बाजूचे बुरूज आणि मध्यभागी असलेले व्याल शिल्प पाहता हाच तो जैता दरवाजा असावा, असं म्हणण्याला वाव आहे. पाच किलोमीटर लांब, चार मीटर उंच आणि दोन मीटर रुंदीच्या या भिंतीत एकूण अकरा दरवाजे होते. पूर्वेला झॆंडा दरवाजा (झेंडीगेट) आणि बोवा बंगाल दरवाजा, दक्षिणेला माळीवाडा आणि नंतर इंग्रजांच्या आमदानीत फर्ग्युसन गेट, पश्चिमेला नेप्ती आणि नालेगाव वेस, उत्तरेला दिल्ली दरवाजा, तोफखाना, सर्जेपुरा, मंगळवार (मंगलगेट) आणि इंग्रज आमदानीत किंग्जगेट अशी या दरवाजांची नावं होती. रस्तारूंदीकरणात नऊ दरवाजे नामशेष झाले, पण त्यांची नावं मात्र अजून घेतली जातात. दिल्ली दरवाजाही पाडण्याचे मनसुबे अनेकदा रचले गेले, पण हा दगडी दरवाजा त्या सर्वांना पुरून उरला.
माळीवाडा वेशीच्या आत महात्मा फुले यांचा अर्धपुतळा नवनीतभाई बार्शीकर यांच्या नगराध्यक्षपदाच्या काळात बसवण्यात आला. नगर जिल्ह्यासह महाराष्ट्रातील शेतक-यांना दिल्लीसह देशाची सहल घडवणारे कर्तबगार मंत्री बाळासाहेब देसाई यांच्या हस्ते या पुतळ्याचं अनावरण २० जुलै १९५९ रोजी झालं. तेव्हा महिलांसाठी आरक्षण नसतानाही नगरचं उपनगराध्यक्षपद विलुबाई इराणी भूषवत होत्या. या परिसराचं सुशोभीकरण खासदार दिलीप गांधी यांच्या निधीतून डिसेंबर २००० मध्ये करण्यात आलं, तेव्हा नगराध्यक्षपदी लता लोढा विराजमान होत्या. महात्मा फुले यांचा हा पुतळा पुण्याचे शिल्पकार पद्माकर केळकर (भालबा केळकरांचे भाऊ) यांनी घडवलेला आहे.

माळीवाडा वेशीच्या दर्शनी बाजूला क्रांतिस्तंभ उभारण्यात आला आहे, पण आता त्याची अवस्था भ्रांतीस्तंभासारखी झाली आहे. त्यावर लावलेल्या फरशा निघाल्या आहेत. अवतीभोवती झाडंझुडपं उगवली आहेत. स्वातंत्र्यसैनिकांची नावं असलेला शिलालेख २६ जानेवारी १९८२ रोजी चंद्रभान आठरे पाटील, प्रा. असीर यांच्या उपस्थितीत तिथं लावण्यात आला होता. तो स्तंभावरून काढून वेशीच्या आत लावला गेला. निदान त्यावरची अक्षरं रंगवली, तरी या स्वातंत्र्यसैनिकांची माहिती नव्या पिढीला होऊ शकेल. जिल्हा लोकल बोर्डाच्या पहिल्या महिला अध्यक्ष होण्याचा मान मिळवलेल्या थोर सामाजिक कार्यकर्त्या हिराबाई भापकर यांचा अर्धपुतळा वाडिया पार्कसमोर आहे. जवळच त्यांचं निवासस्थान आहे.

माळीवाडा वेशीच्या दोन्ही बाजूला काही अंतरावर १८०३ मध्ये झालेल्या इंग्रज-मराठा युद्धाची स्मारकं होती. महापालिकेच्या दवाखान्याशेजारी असलेल्या स्मारकाभोवती काही वर्षांपूर्वी लोखंडी जाळी बसवून त्यावर पोस्टर लावायला प्रतिबंध करण्यात आला, पण आता त्या जाळीच्या आत कचराकुंडी तयार झाली आहे. निम्मा शिलालेख कचर्‍यात गाडला गेला. इंग्रज सेनापती जनरल आर्थर वेलस्ली याच्या अधिपत्याखालील सैन्य वाळकीमार्गे किल्ल्यावर आक्रमण करण्यापूर्वी नगर शहराच्या माळीवाडा वेशीवर धडकलं. मद्रास बटालियनचे युरोपियन गोलंदाज, टिपू सुलतानला पराभूत केल्यानंतर मिळालेली म्हैसूरच्या महाराजांचे २४०० सैनिक, ३००० मराठा घोडेस्वार, शिवाय लेफ्टनंट जनरल स्टुअर्ड यांच्या अधिपत्याखालील खजिना, बैल आणि धान्याचा पुरवठा करणारी दोन पथकं ब्रिटिशांच्या सैन्यात होती. तेव्हा किल्ला द ग्रेट मराठा सरदार महादजी शिंदे यांचे दत्तकपुत्र दौलतराव शिंदे यांच्या ताब्यात होता. शिंद्यांकडील अरबी फौजेची एक तुकडी शहराच्या तटबंदीवर तैनात होती. घमासान लढाई झाली. जनरल वेलस्लीच्या हाताखाली लेफ्टनंट कर्नल हार्नेस व वॅलेस आणि कॅप्टन विझी होते. त्यांच्या सैन्यातील कँप्टन थाँमस हंबरस्टन मँकेंझी यांच्यासह कॅप्टन ग्रँट ले. अँडरसन, नाॅन कमिशन्ट आॅफिसर्स व अनेक सैनिक मारले गेले. कॅप्टन थाॅमसचे वडील १७८३ मध्ये झालेल्या इंग्रज-मराठा युद्धात कामी आले होते. तसा उल्लेख या शिलालेखात आहेत.

माळीवाडा वेशीच्या पूर्वेला लेप्टनंट विल्यम पेंडरसन याची कबर होती. त्याच्या स्मरणार्थ मद्रास नेटिव्ह इंन्फंट्रीच्या अकरावी रेजिमेंटच्या पहिल्या बटालियननं शिलालेख लावला होता. मागील काही वर्षात अनेक इमारती तिथं बांधल्या गेल्यानं ही कबर आणि त्यावरील शिलालेख कायमचा गाडला गेला असावा किंवा तेथून नाहिसा केला गेला असावा.

माळीवाडा वेशीच्या आत शहराचं ग्रामदैवत विशाल गणेश मंदिर आणि वेशीसमोर शनिमारूतीचं मंदिर व रस्त्याच्या मध्यभागी सय्यद बुर्‍हाण दख्खनी मशीद आहे. नगरकरांनी सर्वधर्मसमभाव असा जपला आहे. तिथून बाजार समितीकडे जाणार्‍या डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावर चिंचबनात नगर जिल्ह्यातील पहिला महिला पत्रकार आणि वकील ज्योत्स्ना त्रिभुवन यांचं घर होतं. 'विमेन्स फोरम' नावाचं नियतकालिक त्या चालवत असत. त्या आणि त्यांचे वडील उत्तम कवी होते. श्रमिकांसाठी निघत असलेल्या श्रमिक विचार या पाक्षिकाचं आणि लाल निशाण पक्षाचं कार्यालय वेशीच्या आत संत सावता महाराज मंदिरामागे आहे. दिवंगत कामगार नेते भास्करराव जाधव यांनी अनेक वर्षे श्रमिकचं संपादकत्व सांभाळलं. त्यांना मी पहिल्यांदा याच वास्तूतील कार्यालयात भेटलो होतो. आता ही इमारत पडायला आली आहे. त्यावरील फलकही सहज लक्षात येणार नाही, इतका पुसट झाला आहे.

माळीवाडा वेशीजवळ असलेल्या वडाच्या झाडाजवळून १ जून १९४८ रोजी महाराष्ट्रातील पहिली एसटी बस धावली. वडाच्या झाडाला घंटा बांधलेली असे. जिल्हा लोकल बोर्डाच्या मनोर्‍यावर असलेल्या घड्याळात आठचे ठोके पडताच पहिली एसटी नगरहून पुण्याला निघाली. त्या बसचे वाहक होते लक्ष्मणराव केवटे.  माळीवाड्यातच ते राहात. हेरिटेज वॉकच्या वतीने त्यांना नगर परिक्रमा पुस्तक आणि पुष्पगुच्छ देण्यात आला, तेव्हा त्यांनी एसटीच्या पहिल्या प्रवासाची आठवण सांगितली. एसटी सेवा सुरू होण्याआधा खासगी बसगाड्या असत. त्यांच्याकडून विरोध होण्याची शक्यता लक्षात घेऊन एसटी बसला पोलिस बंदोबस्त देण्यात आला होता. प्रत्यक्षात कुणाकडून विरोध तर झाला नाहीच, उलट सगळ्यांनी बसचं स्वागत केलं, सुवासिनींनी ओवाळलं, अशी आठवण लक्ष्मणरावांनी सांगितली. तेव्हा रस्ता काँक्रिटचा होता. त्यामुळं नगरहून पुण्याला केवळ अडीच-पावणे तासाता बस पोहोचत असे, असंही ते म्हणाले.

महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती मंडळाचे अध्यक्षस्थान भूषवलेले ज्येष्ठ साहित्यिक डॉ सदानंद मोरे यांचा जन्म माळीवाड्यात झाला. संत तुकारामांचे ते वंशज. बारा तोटी कारंजाकडे जाणार्‍या रस्त्यावर विश्वासराव काळे यांचं दुमजली घर आहे. इथं म्हणजे आजोळी २५ जून १९५२ रोजी डॉ. मोरे यांचा जन्म झाला. त्यांनी काही काळ नगरच्या न्यू आर्टस महाविद्यालयात प्राध्यापकी केली. नंतर ते विद्यापीठातील नोकरीमुळे पुण्यात स्थायिक झाले. मात्र, त्यांचे नगरशी अजून ऋणानुबंध आहेत.

नगर शहराच्या विविध भागांना सुमारे चारशे वर्षे खापरी नळानं पाणी पुरवलं जात होतं. गणपती मंदिराच्या परिसरात एक कारंजं होतं. ते आता नसलं, तरी तेथील जमिनीखाली पाण्याचा मोठा साठा अजूनही आहे. बारा तोटी कारंजं आता आतापर्यंत होतं. दोन वर्षांपूर्वी त्याच्यावर जेसीबी घालण्यात आला. या भागात इब्राहिम थिएटर होतं. ते खास तमाशासाठी बांधण्यात आलं होतं. सध्याच्या शिवम (आधीचं अप्सरा) थिएटरच्या जागी ते असण्याची शक्यता आहे. पण आता ते पाहिल्याचं कुणाला स्मरत नाही. गांधी हत्येच्या खटल्यातील एक आरोपी विष्णूपंत करकरे यांचं हॉटेलही माळीवाड्यात होतं. नगरमध्ये बटाटेवडे तयार करण्याची सुरूवात त्यांच्यापासून झाली.

माळीवाडा जिथे संपतो, त्या पंचपीर चावडी ते सबजेल या मार्गावर काही जुन्या वास्तू अजून दिसतात. निजामशाहीतील जलव्यवस्थापन तज्ज्ञ न्यायमतखान यांचं राजवाड्यासारखं निवासस्थान, हमामखाना इथं होता. आता केवळ दरवाजा आणि कमानी असलेल्या काही इमारती उरल्या आहेत. मशीद आणि दर्गा आहे. बेग पटांगणात एकेकाळी छान उद्यान होतं. आता तिथं राडारोडा पडलेला असतो. नाक मुठीत धरूनही दुर्गंधी थांबत नाही...

माळीवाड्यातील ब्राह्मणगल्ली, विळदकर गल्लीत अनेक जुने वाडे होते. आता त्यातले मोजकेच उरले आहेत. वाईकर वाडा छान आहे. विळदकर वाड्यात लहानपण गेलेले भालचंद्र आणि श्रीनिवास विळदकर पुढे मुंबईत स्थायिक झाले. विज्ञानाच्या क्षेत्रात त्यांनी मोठी कामगिरी केली. डॉ. श्रीनिवास विळदकर जिओलॉजिस्ट असून त्यांच्या अनुभवाचा मोठा उपयोग गुजराथ, मध्यप्रदेशसह जर्मनीसारख्या अनेक देशांनी करून घेतला आहे.
   
कुस्तीबरोबर राजकारणात ठसा उमटवत हमालांसाठी मोठं काम करणारे नगराध्यक्ष शंकरराव घुले माळीवाड्यातील पारगल्लीत रहात. या भागात दोन तालमीही पहायला मिळाल्या. गणपती राजवाडी तालिम विशाल गणपती मंदिराजवळच आहे, तर कौठीची तालिम विठ्ठल-रखुमाई मंदिराजवळ आहे. तिथे कवठाचं झाडं आणि कधी पाणी न आटणारा आड आहे. कवठाच्या झाडावरून या तालमीला कौठीची तालिम नाव पडलं असावं. आखाड्यातल्या लाल मातीला वेगळाच सुगंध असतं. त्यात लोणी मिसळलेलं असतं, शिवाय मल्लांनी गाळलेला घामही त्यात जिरलेला असतो. खलिफा म्हणून ओळखले जाणारे पंढरीनाथ रासकर, वस्ताद रंगनाथ पटवेकर यांनी अनेक मल्ल माळीवाड्यात घडवले. उपनगराध्यक्ष मल्हारराव गिरमे, ह. कृ. काळे अशी अनेक मोठी माणसं माळीवाड्यात होती.

माळीवाडा पंच मंडळाचं विठ्ठल-रखुमाई मंदिर वाड्यासारख्या वास्तूत आहे. पूर्वी मंगल कार्यालयासारखा त्याचा वापर होई. पंढरपूरमध्ये अशी अनेक मंदिरं कम मंगल कार्यालयं पाहिल्याचं मला आठवतं. बुवाजी बुवाचं स्मरण करून देणारी फरशी या मंदिरात पहायला मिळाली. कुलकर्णी नावाचे पुजारी या मंदिराची व्यवस्था पहातात.

माळीवाड्यात अनेक मंदिर आहेत. कपिलेश्वर मंदिराकडे जाताना आम्ही कोपर्‍यावरच्या लाकडी भिंती असलेल्या वास्तूत शिरलो. पूर्वी तिथं आयुर्वेद आणि बीएड महाविद्यालयाचे वर्ग भरत. जवळच असलेल्या एका घराच्या टेरेसवर पंचवीस फूट उंचीचा क्रिसमस ट्री उभा होता. जवळच नव्वद वर्षांचा लोखंडे यांचा देखणा वाडा आहे.

 प्रसिद्ध चित्र-शिल्पकार प्रमोद कांबळे हे सात-आठ वर्षे माळीवाड्यातील अप्पा विहारमध्ये रहात होते. त्यांच्या काही कलाकृती अजून तिथं पहायला मिळतात. अमन पाटील रस्त्यावर माशाची शिल्पं असलेली एक इमारत होती. तिला मच्छी बिल्डींग म्हणूनच ओळखले जायचे. काही वर्षांपूर्वी ती काळाच्या पडद्याआड गेली. या परिसरातील एका इमारतीवर वाघ आणि हरणं, तसंच कपिलेश्वर मंदिरावर सिंह पहायला मिळाले. एक बखळवजा जागेत छपाईंच जुनं ट्रेडल मशीन दिसलं. अशा वस्तु संग्रहालयात ठेवल्या, तर पुढच्या पिढ्यांना त्याचा संदर्भासाठी नक्की उपयोग होऊ शकेल....  

माळीवाड्याच्या कोपर्‍यावर वसंत टाकिज होती, सोलीबाबा हे तिचे मालक. इंग्रजी चित्रपट तिथे लागत. आता या टॉकिजच्या जागी व्यापारी संकुल उभे राहिले आहे. तिथून काही अंतरावर टिळकवाडीतील कौलारू घरात फुला-मुलांचे कवी रेव्हरंड नारायण वामन टिळक, लक्ष्मीबाई टिळक यांचं अनेक वर्षे वास्तव्य होतं. बालकवी त्यांच्याकडे रहात असत. ही वास्तू आणि तिथलं बोरीचं झाडंही आता राहिलेलं नाही.

माळीवाडा बदलतो आहे....नव्या बहुमजली इमारती उभ्या रहात आहेत. त्यांच्या उंचीपुढं वेस खुजी वाटू लागली आहे. काही का असेना, वेस आहे म्हणूनच नगर अजून आपलं गाव वाटतं...

-    भूषण देशमुख

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा