नगर - भारताचा क्रांतिकारी कामगार पक्षाचे उमेदवार कॉम्रेड अविनाश साठे यांच्या उमेदवारीच्या घोषणे साठी गवळीवाडा, सिद्धार्थनगर, म्युनिसिपल कॉलनी आणि बौद्ध वस्ती या भागांतून भव्य प्रचारफेरी काढण्यात आली. प्रचारफेरीची सुरुवात गवळीवाड्या पासून करण्यात आली. जोरदार घोषणांनी आणि कॉम्रेड अविनाश साठे यांच्या प्रभावी भाषणाने रॅलीला उत्स्फूर्त सुरुवात झाली. परिसरातील कामगार, कष्टकरी, नागरिक मोठ्या संख्येने यावेळी सामील झाले.
या वेळी बोलताना कॉ. अविनाश साठे यांनी सांगितले की, आर डब्ल्यु पी आय च्या नेतृत्वात जनतेने 35 वर्षे जुना प्रलंबित पाणी प्रश्न सोडवला, डीपी मंजूर झाली, ड्रेनेज लाईन व अंशत: कॉंक्रिटीकरण झाले, शेकडो विद्यार्थ्यांचे शाळा प्रवेश करवले गेले. या सर्व ठोस जनकार्यांच्या आधारावरच जनतेच्या पाठिंब्याने ही निवडणूक लढवत असल्याचे त्यांनी मांडले.
या महानगरपालिका निवडणुकीत भारताचा क्रांतिकारी कामगार पक्ष हा कामगार-कष्टकऱ्यांचा स्वतंत्र राजकीय पर्याय म्हणून सहभागी होत आहे. आतापर्यंत कामगार-कष्टकरी जनतेने विविध भांडवली पक्षांवर पर्यायाअभावी विश्वास ठेवला; मात्र कामगार कष्टकऱ्यांच्या जीवनात कोणताही मूलभूत बदल झालेला नाही. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना, मनसे तसेच वंचित बहुजन आघाडी हे सर्व पक्ष भांडवलदार वर्गाच्या वेगवेगळ्या घटकांचे प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे सत्ता कोणाच्याही हाती असली तरी धोरणे ही भांडवलदारांच्या हिताचीच ठरतात.
कामगारांनी या भांडवली पक्षांचे वर्गचरित्र ओळखून कामगार-कष्टकऱ्यांची मजबूत वर्गीय एकजूट उभी करावी व भांडवली राजकारण नाकारावे, असे आवाहन त्यांनी केले. जनतेच्या सहमतीने व पाठिंब्यानेच आपण या निवडणुकीच्या मैदानात उतरलो असून कामगार-कष्टकऱ्यांचे पर्यायी, जनहिताचे क्रांतिकारी राजकारण उभे करत असल्याचेही त्यांनी सांगितले.
या प्रचारफेरीत मोठ्या संख्येने कामगार-कष्टकरी जनता सहभागी झाली. रॅलीचा समारोप पंचशील शाळेजवळ करण्यात आला.
إرسال تعليق