महाराष्ट्राचं राजकीय दैवत - शरद पवार🖊️ सलीमखान पठाण 9226408082

देशाचे माजी कृषिमंत्री, माजी संरक्षण मंत्री, राज्याचे माजी मुख्यमंत्री, राजकीय पटलावरील सर्वात धुरंदर नेते म्हणजे शरद पवार. आज त्यांचा वाढदिवस. त्यानिमित्ताने त्यांच्या जीवन कार्याचा वेध घेणारा हा लेख.*

ज्यावेळी महाराष्ट्राचा राजकीय, सामाजिक इतिहास लिहिला जाईल,तो शरद पवार यांच्या शिवाय सदैव अपूर्ण राहील हे सांगायची आवश्यकता नाही.पवार साहेब म्हणजे महाराष्ट्राच्या मातीतील एक असा हिरा आहे ज्याची चमक आणि कार्य जगभर पसरले आहे.
1967 साली महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री यशवंतरावजी चव्हाण साहेब यांच्या आग्रहास्तव काँग्रेस पक्षाने बारामतीमधून तत्कालीन स्थानिक सर्व काँग्रेस नेत्यांचा विरोध डावलून पवार साहेबांना आमदारकीचे तिकीट दिले.तरुणपणातील जमवलेल्या मित्रपरिवार कॉलेज जीवनातील सहकारी यांच्या जोरावर पवार साहेब त्यावेळी विधानसभेवर निवडून आले आणि तेव्हापासून आजपर्यंत त्यांनी कधी मागे वळून पाहिले नाही. काँग्रेस पक्षाच्या अनेक घडामोडींचे ते साक्षीदार आहेत. 
राजकारण करीत असताना त्यांनी आपल्या मतदार संघाकडे कधीच दुर्लक्ष होऊ दिले नाही आणि म्हणून राज्यातील सर्वात सुविधा असलेले शहर म्हणून बारामती ओळ्खली जाते. औद्योगिक आणि शैक्षणिक विकास काय असतो हे बारामती परिसरात गेल्यावरच कळते.
आपल्या कार्य कर्तृत्वाने पवार साहेबांनी आमदारकी पासून देशाच्या संरक्षण आणि कृषी मंत्री या पर्यंत सर्व पदे मिळवली आणि नुसती पदे भूषवली नाही तर त्या पदांना न्याय देण्याचा सदैव प्रसन्न केला.
कृषी हा साहेबांचा आवडता विषय. महाराष्ट्रातील शेती, शेतीचे यांत्रिकीकरण आणि शेतकऱ्यांचे मूलभूत प्रश्न यांचा त्यांचा गाढा अभ्यास आहे. देशाच्या मंत्रिमंडळात
अनेक महत्त्वाची खाती त्यांच्यापुढे नतमस्तक असताना त्यांनी कृषी खात्याची निवड केली. स्वर्गीय अण्णासाहेब शिंदे यांच्यानंतर महाराष्ट्रातून कृषी खात्याचे उज्वल नेतृत्व पवार साहेबांनी केले. शेतकऱ्यांच्या प्रती प्रचंड जिव्हाळा असलेला हा नेता राज्यातील शेतकरी सुजलाम सुफलाम होण्यासाठी सतत धडपडत असतो. पन्नास पेक्षा ही जास्त वर्षाच्या आपल्या राजकीय कारकिर्दीमध्ये महाराष्ट्राच्या जडणघडणीत अनेक महत्त्वाचे निर्णय पवार साहेबांनी घेतले, त्याबद्दल लिहायला बसलो तर अनेक पुस्तके तयार होतील . पवार साहेबांच्या राजकीय कारकिर्दीचा विचार करताना ढोबळमानाने काही विषयांचा आढावा पुढीलप्रमाणे घेऊ या .
राज्यातील शेतकऱ्यांना आधुनिक पद्धतीच्या सोयी सुविधा मिळाल्या पाहिजे . यासाठी आधुनिकतेची कास धरून परदेशातील शेतीचे अनेक प्रयोग त्यांनी आपल्या राज्यात केले. पवार साहेब सकाळी उठून शेतीसंबंधी विषयाचा अभ्यास करीत असताना या विषयातील जे ज्ञानवंत आहेत त्यांना थेट फोन लावून त्यांच्याशी विचारविनिमय करतात. राहुरी कृषी विद्यापीठाच्या अनेक तज्ञांना सकाळी पवार साहेबांचे फोन आल्याचे सर्वश्रुत आहे. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्याचा सातत्याने प्रयत्न पवार साहेबांनी केला आहे.
राज्याचे मुख्यमंत्री म्हणून तीन वेळा पदभार सांभाळणारे पवार साहेब राज्य सरकारी कर्मचाऱ्यांच्या बाबतीत खूपच दयाळू आहेत .1978 मध्ये पुलोदचे सरकार असताना राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना केंद्राप्रमाणे वेतन व भत्ते देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला व राज्यकारभार करताना सातत्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या हिताचे रक्षण करण्याचे कार्य केले. म्हणूनच या राज्यातील सर्वच शासकीय कर्मचारी हे आज पवार साहेबांना आपले दैवत मानतात . त्यांच्यामुळे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचे अनेक प्रश्न लीलया सुटले आहेत. मला आठवतंय 1989 साली पुण्याच्या एसपी कॉलेज मैदानावर महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे त्रैवार्षिक अधिवेशन भरले होते. मुख्यमंत्री म्हणून पवार साहेब त्याचबरोबर शिक्षण मंत्री कमल किशोर कदम आणि राज्याचे डझनभर मंत्री त्या व्यासपीठावर होते. चटोपाध्याय आयोग केंद्राप्रमाणे लागू करा अशी मागणी त्या वेळी समोर जमलेले दोन लाख शिक्षक करीत होते. कारण 290 रुपयाचा मूळ पगार थेट बाराशे रुपये होणार होता. प्रचंड घोषणाबाजी सुरू होती. पवार साहेब भाषणाला उभे राहिले आणि त्यांनी एकच प्रश्न केला जसा आहे तसा देऊ का ? कारण त्या आयोगामध्ये शिक्षकांसाठी काही अडचणीच्या तरतुदी होत्या.त्यातली एक महत्त्वाची तरतूद म्हणजे प्रत्येक पाच वर्षानंतर शिक्षकांच्या कामाचे मूल्यमापन करायचे व तो सक्षम असेल तर त्याला नोकरीत ठेवायचे आणि नसेल तर त्याला नोकरीवरून काढून टाकायचे अशी एक अट यामध्ये होती . या तरतूदी ला राज्यभरातील शिक्षकांचा विरोध होता . शिक्षकांनी आग्रह धरला ती अट काढून टाका . पवार साहेबांनी ती मान्य केली आणि चट्टोपाध्याय आयोग लागू करण्याची घोषणा केल्यानंतर एसपी कॉलेजच्या मैदानावर झालेला टाळ्यांचा प्रचंड कडकडाट आजही माझ्या स्मरणात आहे .
राज्यातील दलित समाजाला मानाचे स्थान प्राप्त करून देण्यासाठी मागासवर्गीयांच्या कल्याणाच्या अनेक योजना त्यांनी सुरू केल्या . मराठवाडा विद्यापीठाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांच्या काळात झाला . रामदास आठवलेंची सातत्याने पाठराखण करून त्यांचे नेतृत्व दलित समाजातून फुलवण्याचा प्रयत्न देखील पवार साहेबांनी केला. दलितांसाठीच्या अनेक योजना त्यांनी प्रत्यक्ष अमलात आणल्या आणि समाजातील विषमता कमी करण्याचा मोठा प्रयास केला.
                             महिला सक्षमीकरणासाठी त्यांनी ऐतिहासिक निर्णय घेतले. राजकारणामध्ये महिलांना 50 टक्के पदे देऊन विविध पदांवर त्यांना निवडून आणले. एवढेच नव्हे तर संपत्तीमध्ये सुद्धा महिलांना वाटा मिळाला पाहिजे. त्यासाठी कायदेशीर तरतूद केली. महिला शिक्षणासाठी, महिला सबलीकरणासाठी अनेक योजना आखल्या .
महिला आयोगाची स्थापना केली. पदवीपर्यंत मुलींना शिक्षण मोफत केले. उच्च शिक्षणासाठी वसतीगृहाच्या सुविधा मुलींसाठी, महिलांसाठी निर्माण केल्या.
नोकरीमध्ये तीस टक्के आरक्षण दिले. अशा पद्धतीने समाजाचा प्रमुख घटक असलेल्या महिलांना सुद्धा त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला.
एक आदर्श प्रशासक कसा असतो याची चूनुक पवार साहेबांनी अनेक वेळा दाखवली . राज्याचे प्रमुख म्हणून काम करताना सर्व खात्यांवर त्यांचं खूप बारीक लक्ष होतं . त्यांचे एक वैशिष्ट्य म्हणजे प्रत्येक तालुक्यात तालुक्यामध्ये अनेक कार्यकर्त्यांना ते आजही नावानिशी ओळखतात कार्यकर्त्यांची एक मोठी साखळी त्यांनी निर्माण केली आहे . काही कार्यकर्त्यांनी त्यांचा विश्वास सार्थ ठरविला तर काहींनी विश्वासघात ही केला .पण पवार साहेबांच्या मनामध्ये कोणाबद्दल आकस दिसून आला नाही . राजकीय तडजोडी करताना त्यांनी मानपानाला कधीच फार महत्त्व दिले नाही . छगन भुजबळ सारखे शिवसेनेत असणारे नेते राष्ट्रवादीमध्ये आणून त्यांनी शिवसेनेला सुद्धा नामोहरम करण्याचे काम केले .
 राजकारणातील त्यांचे स्थान आणि त्यांनी केलेली  राजकारणातील घोडदौड राज्यातील इतर कोणत्याही नेत्याला साध्य करता येणार नाही अशीच आहे .
पवार साहेब एक रसिक व्यक्तिमत्त्व आहे . साहित्यक्षेत्रात त्यांचा मित्रपरिवार खूप मोठा आहे साहित्यिकांच्या टीकेला त्यांनी कधी मनावर घेतले नाही . उलट साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे कार्य त्यांनी केले . प्रत्येक साहित्य संमेलन असो की नाट्यसंमेलन असो पवार साहेबांची हजेरी त्याठिकाणी असते .साहित्यिकांचा गौरव करणारी पिढी  त्यांनी निर्माण केली .त्यांच्या सहवासातील अनेक नेत्यांनी आपापल्या परिसरामध्ये साहित्यिकांना प्रोत्साहन देण्याचे काम केले आहे . त्याला कारणीभूत पवार साहेब आहेत . राज्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी अहोरात्र धडपड करणारा हा नेता खरोखर जाणता राजा आहे याबद्दल कोणाचेही दुमत नाही .
राज्याच्या राजकारणामध्ये पवार साहेबांबद्दल फारसा विश्वास दाखवला जात नाही . पवार साहेब बोलतात एक आणि करतात एक असं साधारणपणे म्हटलं जातं परंतु हे करीत असताना प्रत्येकाला संधी देण्याचे धोरण त्यांचे असते. विरोधकांशी कायम अंतरच ठेवले पाहिजे हे त्यांना मान्य नाही . म्हणूनच विरोधी पक्षातले अनेक नेते त्यांचे व्यक्तिगत मित्र आहेत आणि या मैत्रीच्या माध्यमातून त्यांनी राज्याचा आणि देशाचा विकास करणारे अनेक निर्णय घेतले आहेत .
त्याबरोबरच पवार साहेब क्रीडारसिक देखील आहेत . कबड्डी आणि क्रिकेट या खेळांमध्ये त्यांनी मोठे योगदान दिले आहे . कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष, मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष, बीसीसीआयचे अध्यक्ष आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर देखील आंतरराष्ट्रीय क्रिकेटबोर्डाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले आहे .हा सन्मान महाराष्ट्रातील इतर कोणत्याही नेत्याला प्राप्त झालेला नाही ही उल्लेखनीय बाब आहे . शिक्षण क्षेत्रासाठी ही त्यांचे मोठे योगदान आहे .शिक्षण तज्ञ चित्रा नाईक व इतर तज्ञांशी वारंवार सल्लामसलत करून राज्याच्या शैक्षणिक धोरण निश्चित करण्यामध्ये त्यांचा सिंहाचा वाटा आहे . 
पवार साहेबांबद्दल खूप लिहिता येईल .त्यांची राजकारणातील घोडदौड ही दैदिप्यमान अशीच आहे .
           ज्यावेळी त्यांना कॅन्सरचे निदा झाले .त्यावेळी अतिशय आत्मविश्वासाने त्यांनी या रोगाचा मुकाबला केला . डॉक्टरांकडून त्याची इत्थंभूत माहिती घेतली होती . त्याप्रमाणे त्यांनी आपले उपचार सुरू ठेवले मंत्रीपदावर असताना दिल्लीतील दवाखान्यात जाऊन केमो घेऊन थेट ऑफिस मध्ये जाऊन काम काज सुरु करणारे शरद पवार साहेब म्हणजे एक धाडसी व्यक्तिमत्व . त्यांचे कार्यालयीन सहकारी याबाबत आश्चर्य व्यक्त करतात. एवढा मोठा असाध्य आजार होऊन देखील पवार साहेबांची राजकीय कारकीर्द कुठे कमी झालेली नाही. मागील विधानसभेचे प्रचार काळात साताऱ्यातील भर पावसात झालेली सभा आणि त्या सभेने बदललेले राज्याचे चित्र हे सर्वांसमोर आहे .पायाला जखमा झालेल्या असताना सुद्धा निवडणुकीचा प्रचार आपण केला पाहिजे आपण जर घरात बसलो तर त्याचा पक्षावर विपरित परिणाम होईल याची जाण ठेवून परिणामाची पर्वा न करता सातत्याने पवार साहेब राज्यात फिरतात आणि यश संपादन करतात .
हेलिकॉप्टर मधून सर्वात जास्त प्रवास करणारा राज्यातील एकमेव नेता म्हणून शरद पवार यांचे नाव घेतले जाते . पवार साहेबांचे हेलिकॉप्टर राज्याच्या एखाद्या भागावरुन जात असते . त्या वेळी येथे कोणते गाव आहे कोणता जिल्हा आहे हे ते पायलटला सांगत असतात . अनेक तालुक्यातील कार्यकर्त्यांना ते नावानिशी ओळखतात . थेट संपर्क ठेवतात . प्रत्येकाला संधी देण्याचा त्यांचा नेहमी प्रयत्न असतो . जिल्ह्या जिल्ह्यात अनेक नेते त्यांनी निर्माण केले . सहकार क्षेत्रांमधील त्यांचे योगदान अतुलनीय असे आहे .
राज्यातील सहकारी कारखानदारी असो, सहकारी बँका, सहकारी संस्था , त्यांची सातत्याने पाठराखण करून सहकाराच्या माध्यमातून ग्रामीण भागातील प्रत्येक नागरिकाला, प्रत्येक कार्यकर्त्याला काम करण्याची संधी निर्माण करून देण्याचे महान कार्य त्यांनी केले आहे.
1993 साली लातूर जिल्ह्यात किल्लारी येथे झालेला भूकंप पहाटे झाल्यानंतर सकाळी सात वाजता तेथे पोहोचणारे मुख्यमंत्री पवार साहेब हे सर्वांचे स्मरणात आहेत. स्थानिक अधिकाऱ्यांना सुद्धा याची कल्पना होती. मात्र पवार साहेब फौजफाट्यासह सकाळी सात वाजता तेथे हजर होते. पंधरा दिवस तेथेच थांबून त्यांनी मदत कार्य केले आणि त्या भागातील जनतेला दिलासा देण्याचा प्रयत्न केला. गुजरात येथे झालेला भूकंप किंवा देशात अन्यत्र ठिकाणी आलेले नैसर्गिक आपत्ती असो त्यावेळी पवार साहेबांच्या सल्ल्याने केंद्र सरकारने सुद्धा या स्विकारल्या व नैसर्गिक आपत्ती निवारण कक्षाचे प्रमुख म्हणून त्यांची नेमणूक करण्यात आल्याचे सर्वश्रुत आहे . राज्यातील सर्व प्रकारचे प्रश्न सोडवून राज्याला प्रगतिपथावर नेण्याचे महान कार्य पवार साहेबांनी केले आहे. म्हणूनच हा महाराष्ट्र त्यांना कधीच विसरणार नाही . आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांचे हार्दीक अभिष्टचिंतन करताना ते शतायुषी व्हावेत आणि राज्याची व  देशाची सेवा त्यांच्या हातून पुढे घडावी हीच ईश्वर चरणी प्रार्थना. 

Post a Comment

أحدث أقدم

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा