स्वातंत्र्यानंतर तब्बल दोन तीन दशके शाहू महाराजांचे कार्य हे एक प्रकारे दडपले गेले होते. ते पुन्हा वर येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात शाहूंची महती समजण्यासाठी १९७० चे दशक उजडावे लागले - - डॉ. देविकाराणी पाटिल. राजर्षी शाहू छत्रपतींचा आज स्मृतीदिन !



राजर्षी स्मृतिदिन
◽ मख़दुम समाचार  ◽
६.५.२०२३


    आज शाहू महाराजांना जाऊन बरोबर ९८ वर्षे झाली. या शतकभराच्या काळात शाहूकार्याची महती आणि महत्व वाढतच निघाले आहे. पण हे महत्व वाढत आहे याचे एक प्रमुख कारण शाहूंचे कार्य, चरित्र अभ्यास करुन लोकांपर्यंत पोहचवणारे इतिहास अभ्यासक, संशोधक यांचे प्रयत्नही आहेत. अशाच शाहू चरित्रांचा त्रोटक आढावा या लेखात घेत आहोत.
    राजर्षी शाहू महाराजांची अनेक लोकांनी लिहलेली चरित्रे आपल्यासमोर आहेत. शाहू महाराजांवर जेवढे स्मारक ग्रंथ निघाले तेवढे आजपर्यंत कोणत्याही संस्थानिकावर किंवा शाहूकालीन व्यक्तीवर निघालेले नाहीत. शाहू चरित्र लिहण्याची सुरूवात ही शाहू महाराजांच्या काळातच आणि खुद्द शाहू महाराजांच्याच आज्ञेने झालेली होती हे खूप कमी जणांना माहित आहे. शाहू महाराजांना इतिहासाची लहानपणापासूनच आवड असल्यामुळे आणि शाहू महाराज जे काही कार्य करत होते त्या कार्याची व्यापकता आणि धोके हे त्यांना माहित असल्यामुळे पुढे जाऊन स्वतःचे चरित्र शेक्सपियरच्या नाटकातील 'यागी' या पात्रासारखे होईल आणि जे मूळचे शाहू महाराजांचे कार्य आहे ते विकृत पध्दतीने रंगविले जाईल. अशी शाहू महाराजांना शंका वाटत असल्यामुळेच  त्यांनी स्वतःच्या हयातीतच स्वतःचे चरित्र लिहण्याची जबाबदारी त्यांचे दिवाण, की जे शाहू महाराजांच्या लहानपणापासून प्रत्येक कार्यात, प्रत्येक गोष्टीत सहभागी होते त्या  रावबहाद्दूर रघुनाथराव सबनीस यांना दिली होती. तसेच त्यांनी 'दोन व्यक्तींची  १००-१०० रु. पगार देऊन चरित्राची साधने संकलित करण्यासाठी नेमणूक करावी.'  असा शाहू महाराजांनी दिलेला आदेश ही आज आपणासमोर उपलब्ध आहे. पण दुर्दैवाने महाराजांच्या काळात शाहू चरित्र जे शाहू महाराजांना अपेक्षित होते सबनीसांनी लिहावे ते लिहले गेले नाही. शाहू महाराजांच्या निधनानंतर कोल्हापूरच्या गादीवर राजाराम महाराज आले. काही काळातच दिवाण रावबहाद्दूर सबनीस यांनी दिवाण पदाचा राजीनामा दिल्यामुळे रावबहाद्दूर आण्णासाहेब लठ्ठे हे कोल्हापूरच्या दिवाणपदी आले. आण्णासाहेब लठ्ठे यांनी शाहू महाराजांचे पहिले दोन खंडातील Memories of His Highness Shri Shahu Chhatrapati Maharaja of Kolhapur ,  vol. I & II असे इंग्रजी मधील एक सुंदर चरित्र १९२४ मध्येच प्रकाशित केले. आणि त्याचेच मराठीतही भाषांतर 'श्रीमच्छत्रपति शाहू महाराज यांचे चरित्र' म्हणूनही १९२५ मध्येच प्रकाशित केले. आण्णासाहेब लठ्ठेंनी लिहलेल्या या पहिल्या शाहू चरित्रानंतर खूप वर्षे शाहू महाराजांच्यावर ग्रंथरुपाने काही लिहले गेले नाही अपवाद कुरणे, भास्करराव जाधव, भाऊराव पवार  यांची लहान पुस्तके व आठवणी आणि सत्यवादी, विजयी मराठा, राष्ट्रवीर, हंटर सारख्या शाहू अनुयायांनी केलेले लिखाण. यांनी लिहले तेही स्वतंत्र्यपूर्व काळात.   
(Image - Indrajit Sawant, Kolhapur)

स्वातंत्र्यानंतर तब्बल दोन तीन दशके शाहू महाराजांचे कार्य हे एक प्रकारे दडपले गेले होते. ते पुन्हा वर येण्यासाठी आणि महाराष्ट्राच्या सामाजिक, सांस्कृतिक क्षेत्रात शाहूंची महती समजण्यासाठी १९७० चे दशक उजडावे लागले. सन १९७० मध्ये डॉ. अप्पासाहेब पवार यांनी शिवाजी विद्यापीठात शाहू संशोधन केंद्राची निर्मिती केली त्याच्या माध्यमातून शाहू महाराजांच्या चरित्राची साधने प्रकाशित करण्यास सुरूवात केली. आज त्याचे दहा खंड प्रकाशित झाले आहेत. हे डॉ. अप्पासाहेबांनी केलेले कार्य शाहू महाराजांच्या विचारांचे पुनर्जीवन करणारे ठरले. १९७४ मधे शाहू जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी झाली आणि पुन्हा एकदा शाहू विचार मांडण्याची जणू स्पर्धाच निर्माण झाली. यातूनच अनेक ग्रंथ निर्माण झाले. लठ्ठे यांनी लिहलेल्या चरित्रानंतर पुन्हा असे सुव्यवस्थित चरित्र हे धनंजय कीर यांनी लिहिले (१९७९). त्यानंतर कृ. गो. सूर्यवंशी यांनी (१९८४), डॉ. रमेश जाधव (१९९७), डॉ. जयसिंगराव पवार (२००१)असे ग्रंथ निर्माण झाले. शाहू महाराजांची अनेक लहानसहान चरित्रे, हजार हजार पानांचे भले मोठे स्मारक ग्रंथ, भाषणांची, ठरावांची पुस्तके, यामध्ये मी (डॉ. देविकाराणी पाटील) आणि इंद्रजित सावंत यांनी लेखन संपादन केलेले चित्रमय चरित्र (२०१४). असे विविधअंगी साहित्य विविध भाषांत शाहूंच्या जीवनकार्यावर निर्माण झाले. ते खूप मोठ्या प्रमाणात लोकांपर्यंत पोहचले. या सर्व प्रयत्नामुळे आज शाहूकार्याचा डंका सर्व भारतभर गाजतोय. पण जसे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे चांगदेव खैरमोडे  यांनी तब्बल सहा खंडात जसे विस्तृत चरीत्र लिहले तसे शाहू महाराजांच्या सर्व बाजू मांडणारे शाहू महाराजांचे खंडात्मक चरित्र लोकांपर्यत आलेले नाही. असे शाहूंना अपेक्षित असणारे शाहू चरित्र लवकरच वाचकांच्या भेटीला येईल, अशी आशा या निमित्ताने करुया. धन्यवाद! 
- डॉ. देविकाराणी पाटील.
कोल्हापूर, महाराष्ट्र, 

Post a Comment

Previous Post Next Post

आपली भुमिका

...कारण आत्ताच्या काळात केंद्रातील, राज्यातील, महानगरपालिकेतील आणि आपल्या आजुबाजूच्या ग्रामपंचायतीतील सत्ताधारी पक्ष आणि विरोधीपक्ष यांची छुपी युती झालेली आपणांस दिसुन येत आहे. ते जनतेप्रती, जनहिताची कामे करताना दिसत नाहीत. फक्त आपल्याच लाभासाठी ते वरील सभागृहांमधे जाताना दिसत आहेत. या सभागृहांत जाताना ते लाखो करोडो रूपये खर्च करून जातात आणि तिथे ते आपल्या व आपल्या पोशिंद्या भांडवलदारांचीच कामे करताना दिसत आहेत. सद्यस्थितीत कोणताच विरोधीपक्ष सक्षमपणे काम करताना दिसत नाही. येत्याकाळात जनता सकारात्मक विचाराने एकजूट झाली पाहिजे म्हणून लोकशाहीच्या चौथ्या खांबाने म्हणजे पत्रकारीतेने जनतेप्रती संवेदना जागृत ठेवुन सक्षम विरोधीपक्षाची भुमिका निभावली पाहिजे.

WE ❤️ AHMEDNAGAR

फॉलोअर

किरण डहाळे

जगप्रसिध्द 'नगरी नगरी युट्युब चॅनेल'ला भेट देण्यासाठी 👆🏻 क्लिक करा.

प्रबोधनकार केशव सिताराम ठाकरे यांचे सर्व साहित्य येथे वाचा