मख़दूम समाचार
अहमदनगर (प्रतिनिधी) २३.८.२०२३
शहरातील बहुचर्चित काटवन खंडोबा रस्त्याचे दुष्चक्र गेल्या ४ वर्षे झाले सुटण्याची चिन्ह दिसत नाहीत. स्टेशनरोड परिसर, आगरकरमळा, गायकेमळा व कल्याणरोड परिसरातील उपनगरे जोडणारा व वाहतूकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असा हा रस्ता आहे. जेणेकरून या भागातील लोकांचा वाहतुकीचा वेळ व खर्चामध्ये निम्म्याहून घट होऊ शकते. मध्यशहराला जोडणाऱ्या अनेक उपनगरांचा यामुळे सलग विकास होणार आहे परंतु या भागातील विद्यमान मनपा लोकप्रतिनिधींच्या हलगर्जीपणा व उदासीनता यामुळेच या रस्त्याचे शुक्लकाष्ट हटण्याचे चिन्ह दिसत नाही. या अत्यंत खराब रस्त्याच्या व पाडून ठेवलेल्या पुलाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे अपघात झाल्यास पुल खचून दुर्घटना झाल्यास प्रशासन प्रमुख आयुक्त व ठेकेदारावर सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश आगरकर यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राज्य मुख्य सचिव, जिल्हाधिकारी सालीमठ यांच्याकडे केली आहे. काटवन खंडोबा रस्ता व पाडून ठेवलेल्या अपघातग्रस्त पुलाचे काम तातडीने मार्गी लावावे अशी त्यांची आग्रही मागणी आहे.
ते पुढे म्हणाले की, आगरकर मळा भागातील वापरात व सुस्थितीत असलेला पूल गेल्या ४/५ महिन्यांपासून मनपा ठेकेदाराने पाडून ठेवला. अर्धवट पाडलेला पूल अत्यंत धोकादायक अवस्थेत आहे. या अर्धवट पाडलेल्या चिंचोळ्या पुलावरून महिला, शालेय विद्यार्थी, नोकरदार व या भागातील नागरिकांची जीव मुठीत धरून वाहतूक सुरू आहे. शहरात जाण्यासाठी हा मार्ग जवळचा आहे. पूल खचून व इतर दुर्घटना घडून जिवीतहानी झाली तर यास संपूर्णपणे प्रशासन प्रमुख आयुक्त, ठेकेदार व मनपा लोकप्रतिनिधी असणार आहेत. या भागातील दळणवळण सुध्दा ठप्प होणार आहे तरी या विषयामध्ये महापालिका आयुक्त व प्रशासन कधी गंभीर होणार आहे ? असा संतप्त सवाल भारतीय जनता पार्टीचे ऋषिकेश आगरकर यांनी विचारला आहे.
आयुर्वेद महाविद्यालय ते रेल्वे स्टेशन या रस्त्यासाठी आजवर अनेक आंदोलने महापालिकेत व रस्त्यावरसुद्धा झाली. सर्व आंदोलने येथील नागरिकांनी स्वयंस्फूर्तीने केली तरी त्यांना दरवेळी प्रशासनाने व लोकप्रतिनिधींनी वाटाण्याच्या अक्षताच हातात दिल्या. फक्त आश्वासनशिवाय काहीही पदरात पडले नाही. या रस्त्यासाठी ८ कोटींचा निधी राज्य सरकारने मंजूर करून ४ वर्ष झाली तरी महापालिका प्रशासनाकडून पुढील कार्यवाही करण्यात का विलंब होत ? याची चिंता सर्वसामान्य नागरिकांना तसेच येथील ज्येष्ठ नागरिक संघास पडली आहे . या भागातील लोकप्रतिनिधींकडून सुद्धा कोणत्याही प्रकारची अपेक्षा सर्व सामान्य नागरिकांनी करणे सोडून दिले आहे.
तरी महापालिका आयुक्त व प्रशासनाने या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामासंदर्भात तातडीने लक्ष घालून पुढील कार्यवाहीचे आदेश देऊन काम पूर्ण करावे, अशी मागणी ऋषिकेश आगरकर यांनी केली आहे.
Post a Comment