मख़दूम समाचार
१६.९.२०२३
छक्का,
हिजडा,
तृतीयपंथी,
थर्ड जेंडर
ते आज काही मैत्रिणी होण्यापर्यंतचा माझ्या समजेचा अबनॉर्मल ते नॉर्मल असा प्रवास. अजूनही अनेकजण यांच्याबाबतीत अबनॉर्मल आहेत. मला आधी फार भीती वाटायची यांची. कारण? माहीत नव्हतं. कदाचित अबनॉर्मल लोकांनी माझ्या डोक्यात सोडलेल्या काही कल्पना असतील. हे दिसले की लांबून पळायचो. या भीतीने अर्धे आयुष्य आपण एका समाजातल्या घटकांना दूर ठेवून बसलो, ते ही नॉनसेन्स कारणांमुळे.
माझ्या आयुष्यात जवळून पाहिलेली अशी मैत्रीण म्हणजे दिशा. दिशाला काही कार्यक्रमाच्या ठिकाणीच भेटणं ऐकणं झालेलं. तिचं एक व्याख्यान मरीन लाईन्सकडच्या एका हॉलमध्ये होतं. ती शारीरिक, मानसिक आणि सामाजिक आरोग्यावर बोललेली. तिनं मांडलेला तिच्या आयुष्याचा प्रवास ऐकून आपण अशा समाजात राहतोय याची अतोनात लाज वाटली शिवाय प्रचंड गिल्ट घेऊन बाहेर पडलो. समष्टीसह आणखी कार्यक्रमात पुढेही आम्ही अनेकदा भेटलो, बोललो, बोलत असतो. तिची समज, तिच्या कविता, तिची भूमिका कायच्या काय अफाट आहे. वंचित घटकांच्या भल्यासाठी तिचे विचार आणि कृती भल्या भल्यांना मातीत घालणारी आहे. तिच्या गोष्टी ऐकल्यानंतर आपण फारच जास्त अबनॉर्मल आहोत आणि तशाच समाजात राहतोय असं वाटलेलं.
शमीभा पाटील नावाची एक मैत्रीणही आहे फ्रेंडलिस्टमध्ये, खान्देशातील. टीसमध्ये शिक्षण घेतेय. तिनं दया पवार स्मृती पुरस्कार कार्यक्रमात सूत्रसंचालन केलेलं. कसला जबर कॉन्फिडन्स आणि वावर. तिच्याही पोस्ट बघून आपली अबनॉर्मलता अजून वाढलीय हे लक्षात येतं. छाया ताईसोबत तिच्याशी काही वेळचा संवाद झालेला तेवढाच. पण समज बेहतरीन.
रोज ट्रेनने येजा करत करताना ही नॉर्मल आपल्यासारखी व्यक्ती म्हणून असलेली लोकं दिसतात, भेटतात. कधी कधी संवाद करण्याचा प्रयत्न करत असतो. छोट्याशा संवादातूनही त्यांची सामाजिक, राजकीय समज डोक्याला मुंग्या आणणारी असते.
असो, हे लिहिण्याचं कारण म्हणजे ताली. रवी जाधवांनी दिग्दर्शित केलेली ताली वेबसिरीज पाहिली. सहा भागातली ही एका समुदायाच्या जगण्याची गोष्ट. सहा भागांमध्ये रवी जाधवांनी बऱ्यापैकी चांगली गोष्ट सांगितलीय. क्षितिज पटवर्धननं कमाल लिहिलंय. कुठेही सिरीज बोअर होत नाही. डोक्यात घुसत जाते हळुवार.
गौरी सावंत यांच्या स्टोरीज आणि मुलाखती वगैरे पाहिल्या वाचल्या होत्या, एकदा त्यांना मंत्रालयात भेटलोही होतो. त्यांनी अशा काळात केलेलं काम आणि उभारलेली चळवळ निश्चितच जबरदस्तय. त्यांच्या कामाबद्दल आणि चळवळीबाबत बऱ्याच गोष्टी गुगल, युट्युबवर अव्हेलेबल आहेतच. त्यांच्या आयुष्यावर आणि एका ऐतिहासिक लढ्यावर आधारलेली ताली.
नंदू माधव, हेमांगी कवीसह सगळ्यांनी जबरदस्त कामं केलीत. सुश्मिता सेनच्या आयुष्यातील हा एक मास्टरपीस आहे. जबरदस्त काम केलंय तिनं. तिला पाहताना ती सुश्मिता वाटतच नाही.
दिशानं खरंतर एक दीर्घ फिल्म त्या व्याख्यानातच सांगितली होती. कायदेशीर लढाईपर्यंतचा गौरीचा हा प्रवास म्हणजे तृतीयपंथीयांच्या आयुष्यातला एक ठिपका आहे. हा ठिपका रवी जाधवांनी गडद रुपात ठेवलाय. अजून यांच्या समस्यांची भलीमोठी रांगोळी तशीच आहे. यांनी ज्ञानाच्या बळावर काही गोष्टी जरूर बदलल्यात मात्र अजूनही शिक्षण, आरोग्य आणि प्रतिष्ठा या गोष्टीसाठी मोठा संघर्ष सुरुय. काही नकारात्मक गोष्टींवर लोकं बोलत असतात, त्या गोष्टी आपल्यासारख्या सो कॉल्ड नॉर्मल समाजात नाहीत का? हा प्रश्न आपण स्वतःला विचारुयात. बाकी ओव्हरॉल निगेटिव्हीटीमुक्त समाजाचं स्वप्न आपण उराशी बांधून आहोतच की...
असो, आपण आपलं अबनॉर्मल असणं सोडून या नॉर्मल व्यक्तींना नॉर्मल म्हणून जेव्हा पाहू तेंव्हाच आपणही नॉर्मल होऊ.
इस ताली की गूँज दूर दूर तक जाने के बजाए अपने दिल में उतर जाए तो बेहतर होगा.
ताली नक्की पहा, जिओ सिनेमावर फुकट आहे.
- निलेश झाल्टे
(लेखक 'मुंबई तक' मधे कार्यरत आहेत)
Post a Comment